आक्रमकतेची गरज

0
333

जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीला मतदारांकडून फुटीर शक्तींच्या बहिष्काराच्या हाकेला न जुमानता उत्साही प्रतिसाद मिळत असल्याने हवालदिल झालेल्या पाकिस्तानस्थित दहशतवादी शक्तींनी तेथील मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सशस्त्र हल्ले चढवायला सुरूवात केली आहे. जम्मूच्या अरनिया गावाजवळ सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाची गेले दोन दिवस लष्कराशी चकमक चालली आहे. काही निष्पाप नागरिकांचाही त्यात बळी गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांच्या पार्श्वभूमीवर घातपाताच्या इराद्यानेच हे सशस्त्र दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसले होते. पाकिस्तानी रेंजरनी त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी संरक्षण पुरवीत गोळीबार केला. त्याचा फायदा घेत लष्करी गणवेश परिधान केलेला सशस्त्र दहशतवाद्यांचा हा गट भारतीय सीमेत घुसला आणि एका लाल मोटारीतील तिघांना ठार मारून त्यांची कार पळवून पुढे निघाला. लष्कराच्या ठाण्यावर त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करून ते पुढे निसटले आणि ९२ इन्फ्रंट्रीच्या एका रिकाम्या बंकरमध्ये घुसून दडून राहिले. त्यांच्या निःपातासाठी काल लष्कराला शेवटी रणगाड्यांची मदत घ्यावी लागली. काश्मीर निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींच्या काल दुपारी उधमपूर आणि पूँछमध्ये सभा होत्या. उधमपूरपासून हल्ला झाला ते अरनिया केवळ ११० किलोमीटरवर आहे. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या प्रयत्नात होते याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांना काहीही करून काश्मीरमधील निवडणूक प्रक्रियेला बाधा आणायची आहे आणि त्यासाठी निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण होईपर्यंत असे आणखीही दहशतवादी हल्ले होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा तेव्हा दहशतवादी आपले अस्तित्व दाखवून शांतीवार्तेस बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न करतात. काठमांडूतील सार्क परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळण्याच्या दिशेने पावले टाकले जाण्याची शक्यता दिसून आल्याने दहशतवादी गट सक्रिय झालेले असावेत. सद्यपरिस्थितीत निवडणूक प्रक्रियेस खो घालण्याचीही त्यांची धडपड आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल वीस डिसेंबरला लागणार आहे, त्याच्या आधी अशा हल्ल्यांच्या प्रतिकारासाठी लष्कराने सज्ज राहणे आवश्यक असेल. मोदींची गेल्या २१ नोव्हेंबरला किश्तवाडमध्ये सभा झाली, त्याच्या आधल्या दिवशीही सीमेपलीकडून गोळीबार झाला होता. अरनियामध्येच गेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी रेंजरनी केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले होते. सातत्याने गोळीबार करून सुरक्षा दलांना विशिष्ट भागांमध्ये लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडायचे आणि दुसरीकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करू द्यायची ही पाकिस्तानची शक्कल फार जुनी आहे. सीमेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे निर्धोक सुरू आहेत आणि तेथून सातत्याने फिदायीन हल्लेखोर भारतात पाठवले जात असतात. जे चार दहशतवादी गेल्या दोन दिवसांच्या कारवाईत मारले गेले, तेही फिदायीन म्हणजे आत्मघाती हल्ल्यासाठीच भारतात घुसवण्यात आले होते. घातपाताचा त्यांचा बेत स्थानिक नागरिकांच्या दक्षतेमुळे तडीस जाऊ शकला नाही, पण अशा प्रकारे येणार्‍या काळात आणखी हल्ले होऊ शकतात त्याबाबत अधिक सतर्कता आणि दक्षता आवश्यक आहे. नुकत्याच गुजरातच्या समुद्रात काही नौका बेवारस सोडून दिलेल्या आढळल्या. त्यांच्यावरचे नोंदणी क्रमांकही खोटे होते. मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून आलेले दहा दहशतवादी एका नौकेतूनच भारतीय भूमीत दाखल झाले होते. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारचा प्रयत्नही होऊ शकतो. सातत्याने होणारे हे हल्ले रोखण्यासाठी भारत काय करणार आहे हा खरा प्रश्न आहे. अमेरिका पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालू शकते आणि पाक त्यावर चकार शब्द काढू शकत नाही हा दरारा भारत कधी निर्माण करणार? आपली बचावात्मक रणनीतीच हजारो निष्पापांच्या जीवावर उठते आहे. नूतन संरक्षणमंत्री पर्रीकर तरी त्यामध्ये परिवर्तन घडवतील काय?