आकेत ७९.८९% मतदान

0
107

आके, मडगाव येथील बूथ क्रमांक ८वर काल घेण्यात आलेल्या फेरमतदानावेळी ७९.८९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत झाले असून या बूथवरील ७९१ मतदारांपैकी एकूण ६३२ जणांनी मतदान केल्याची माहिती दक्षिण गोवा निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

आके येथील टी. बी. कुन्हा हायस्कूलमध्ये वरील मतदान केंद्राचे फेरमतदान कडक पोलीस बंदोबस्तात पार पाडले. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात करण्यात आली. सकाळपासून मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ पर्यंत ४६ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांनी उत्साहात मतदान केल्याने टक्केवारी ८० पर्यंत गेल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. महिलांबरोबरच नवमतदारांनी उत्साहात मतदान केले.
दि. ४ फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी झालेल्या मतदानावेळी आके केंद्र क्र. ८ वरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये प्रात्यक्षिकावेळी घातलेली मते केंद्र अधिकारी गोकुळदास नाईक यांनी काढून न टाकल्याचे दोन तासांनंतर निदर्शनास आल्यानंतर मतदान रद्द करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने या केंद्रावरील फेरमतदान दि. ७ रोजी घेण्याचा आदेश रविवारी दिला होता. या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, भाजपचे शर्मद पै रायतूरकर, आम आदमी पक्षाचे संतोष रायतुरकर रिंगणात आहेत. मतमोजणी ११ मार्च रोजी होणार आहे.