आकाशवाणी अर्थात रेडिओ

0
479

– संदीप मणेरीकर

‘कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रपद्यते…. उत्तिष्टो उत्तिष्ट गोविंद गरुडध्वज… श्री व्यंकटेश दैवे तव सुप्रभातम्’
किंवा
‘आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे’ किंवा
पहाटे सातच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणार्‍या प्रादेशिक बातम्या असोत वा त्याहीपूर्वी पहाटे साडेपाच वाजता ‘तव सुप्रभातम्’ असे स्वर मी शाळेत जात असताना कानावर पडत होते. प्रभातीचे रंग, शेतकर्‍यांसाठी हवामानविषयक अंदाज, प्रभातगीते, असे विविध कार्यक्रम आकाशवाणी अर्थात रेडिओवरून सुरू होते. आणि मी अंथरूणात जागा असून लोळत लोळत ते ऐकत होतो. मग मध्येच कधीतरी आई किंवा दादांची हाक ऐकू यायची. ‘उठा रे, शाळेत जायचं झालं…’ आणि मग आम्ही अंथरुणातून नाईलाजाने उठत असू. पहाटेपासून सुरू झालेला हा रेडिओ सकाळी साडेआठच्या बातम्या संपल्या की कधीतरी बंद व्हायचा. मात्र पणजी केंद्रावरून सुरु होणार्‍या ‘आकाशवाणी, जेल गोम्स कोकणीतल्यांन खबरो दिता’ एवढंच वाक्य ऐकू यायचं. कारण त्यानंतर आमची पळापळ सुरू व्हायची. सकाळी १०.३० वाजता शाळा असल्यामुळे आम्हांला ९.३० पर्यंत घरातून निघावं लागायचं. शाळा घोटगेवाडीला. दोन किमी चालत जावं लागायचं. त्यामुळे आम्ही पटापट पुढचं काहीच ऐकत नव्हतो. शनिवारी किंवा रविवारी घरी असल्यावर दुपारी दादा ११.४५ ला परत रेडिओ लावायचे. त्यावेळी शास्त्रीय संगीत लागायचं. धारवाड केंद्रावर, त्यावेळी पुन्हा रेडिओ सुरू व्हायचा. तो दुपारी दीडच्या बातम्या ऐकल्या की बंद. मग मात्र एकदमच संध्याकाळी सहाच्या दरम्यान, पुन्हा सांजधारा, विशेष सांजधारा, असे विविध कार्यक्रम लागायचे. संध्याकाळी मस्तपैकी गीतं लागायची. ती गीतं ऐकून मन तृप्त व्हायचं. त्यानंतर सातच्या बातम्या, बाजारभाव, पणजी केंद्रावरून प्रसारित होणारी मनपसंत गीतं. त्यासाठी तर आम्ही तळमळायचो. ‘हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे, सादर करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीची आणि पसंतीची गीतं ‘मनपसंत गीतं’ हे शब्द कानात प्राण आणून ऐकायचो. आणि मग ते सुंदर म्युझिक. आणि मग कोणाकोणाची नावं येतात ते ऐकण्यासाठी खूप अधीर असायचो. एकेक नाव ऐकता ऐकता मध्येच मणेरीकर असेही कोणीतरी असायचे. ते कोण हे आम्हांला अद्यापपर्यंत कळलेलं नाही. आई, दादा, भाई, मी बहीण संध्या अशी सारीजणं रेडिओभोवती बसायचो, ती गाणी ऐकत. एकदा तर सरळ दादांचंच नाव आणि शेजारच्यांचं नाव अशी बरीच मणेरीकरांची नावं पुकारली गेली. आणि त्यानंतर नाट्यगीताची फर्माइश होती. त्यामुळे ही नावं कोणी दिली असा आम्ही विचार करत होतो. तर दादांनी आमच्या शेजारी प्रकाशकाका म्हणून राहतात त्यांनी दिली आहेत असं ठामपणे सांगितलं होतं. उद्या सकाळी प्रकाश आमच्या घरी येतो सांगायला असं ते म्हणत होते. पण ते आले की नाहीत हे आम्हांला काही कळलं नाही. कारण आम्ही शाळेत निघून गेलो होतो. परंतु या आकाशवाणीवर दादांचं नाव आलं होतं एवढं नक्की, कारण मोर्लेबाग-घोटगेवाडी असा निवेदनकर्त्यांनी पुढे पत्ता सांगितला होता, म्हणजे ते आमचे दादाच होते.
क्रिकेट सामन्याचं ‘धावतं वर्णन’ ‘आँखो देखा हाल’ कॉमेंट्री जर रेडिओवर असली तर त्या वेळी आमच्या आनंदाला पारावारच रहात नव्हता. ‘उंचे उंचे पेड, प्रेक्षकोंसे खचाखच भरा हुवा मैदान’ किंवा ‘आसमान में बादल छाये हुए है’ ‘और ये गेंद’ अशा प्रकारचं वर्णन कॉमेंट्रेटर करत होते आणि एक प्रकारचा रोमांच अंगावर उभा रहात होता. हे कॉमेंट्रेटर अगदी रसभरीत वर्णन करीत असल्यामुळे डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभं रहात होतं. ‘बीस या बाईस कदमोंका लंबा रनअप’ असं म्हटलं की डोळ्यांसमोर हातात चेंडून घेऊन धावणारा तोच गोलंदाज उभा रहायचा. ‘बंदूक से निकली गोली की तरह गेंद बाऊंड्री लाईन के पार’ असं म्हटलं की अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जाणारा चेंडू उभा रहायचा. उभा रहायचा म्हणजे पळायचाच. आपल्या भारतीय संघाची फलंदाजी सुरू असेल, अशावेळी मध्येच ‘और ये…’ असं म्हणून थबकणारा त्यांचा आवाज हृदयाची धडधड वाढवत असे. नक्की काय झालंय ते कळायला मध्ये घेतलेली त्यांनी क्षणभर विश्रांती आम्हांला युगांची वाटायची. नक्की काय झालंय ते आम्हांला कळू दे असं आम्ही त्यांना म्हणायचो. कुठला शब्द आता हे उच्चारणार बहुतेक ‘आऊट’ असंच आमच्या मनात यायचं आणि त्याचवेळी ‘बालबाल बच गये’ किंवा ‘ये लगा सिक्सर’ असे काहीतरी शब्द यायचे आणि जीव भांड्यात पडायचा. आज हे सारं दूरदर्शनवर पहायला मिळतं आणि आज कॉमेंट्रेटर आपल्या शेजारीच बसलेले असतात. त्यामुळे सारंच आँखो देखा ‘हाल’ असतं. सचिन तेंडुलकरला हा बॉल कसा मारायचा किंवा कुठला बॉल त्याने सोडायला हवा होता इथपर्यंत सारे सल्ले त्याला बसल्या जागी मिळत असतात.
सकाळच्या वेळी विविध भारतीवर लागणारी ‘बिनाका गीतमाला’ हा तर त्यावेळचा शिखरबिंदू होता. नवनवीन हिंदी गीतांचा नजराणा त्यावेळी या गीतमालेतून मिळत असायचा. संध्याकाळी साडेसात वाजता लागणारी युवावाणी, किंवा कॉफी हाऊस रात्री लागणारी श्रुतिका, नभोनाट्यरुपांतर केलेली एखादी नाटिका, चर्चा, कीर्तन आज डोळ्यांसमोर ते सोनेरी दिवस उभे राहतात. खरंच किती सुंदर दिवस होते ते. केवळ कानांनी ऐकण्याचे पण तरीही रम्य दिवस ते.
बुधवारी रात्री दादा आम्हांला सांगायचे आज रात्री एक तास तुम्हांला नाट्यगीतं ऐकायला मिळणार. त्यावेळी रात्री दहा ते साडेदहा या वेळेत पुणे किंवा नागपूर केंद्रावरून नाट्यगीतं प्रसारित व्हायची आणि त्यानंतर साडेदहा ते अकरा मुंबई केंद्रावरून नाट्यगीत प्रसारित केली जायची. असा एक तास नाट्यगीतांचा बहर असायचा. आठवड्यातून एक दिवस मुंबईवरून ‘आपली आवड’ प्रसारित व्हायची. छोट्या मुलांसाठी सुरू असणारा किलबिल किंवा पणजीवरून प्रसारित होणारा ‘खळार मळार’ हा कार्यक्रम. दीपावलीच्या दिवशी पहाटे नरक चतुर्दशीचं कीर्तन तर आम्ही न चुकता ऐकायचो. नरकासुराचा वध झाला हे ऐकलं की घरात असलेलं रक्तचंदन आम्ही कपाळाला लावायचो. त्या आधी अभ्यंगस्नान आटोपलेलं असायचं. अधून मधून हे कीर्तनाचे कार्यक्रमही सुंदर रितीनं ऐकण्यास मिळत होेते. रात्रीची झोप तर आम्ही रेडिओवरून गाणी ऐकतच घेत होतो. मग ती आपली आवड असो किंवा चित्रपट संगीत असो.
रात्रीच वेळी शिट्‌ट्या मारू नयेत, सनई किंवा बासरी वाजवू नये, साप घरात येतात असं आजी सांगायची. पण ‘भातुकलीच्या खेळामधली’ किंवा ‘सखी मंद झाल्या तारका’ अशा गाण्यांत सनई किंवा बासरी वाजली की भीती वाटायची. डोळ्यांवरून मी पांघरूण घेऊन शातंपणे गाणी ऐकायचो पण माझ्या श्‍वासांचा आवाजही होऊ न देता.
कधी तरी दादा शास्त्रीय संगीत लावायचे. त्यावेळी ते फारसं आवडत नव्हतं. मुख्य म्हणजे कळत नव्हतं. पण नंतर द्रुत सुरू झालं की मजा यायची. अभिषेकी असोत वा वसंतराव देशपांडे यांची गीतं किंवा पं. भीमसेन जोशी यांचं शास्त्रीय गायन काहीही असलं तरी रेडिओची मजा काही औरच होती.
संध्याकाळच्या वेळी सुरू होणारे बाजारभाव आम्हांला ऐकायला दादा सांगत. पणजी केंद्रावरून गोव्यातील बाजारभाव सांगितले जात. त्यात सुपारीचा दर किती झालाय ते सांगितला जात असे. पण जेव्हा दादा तो भाव ऐकायला सांगत तेव्हा सुपारीचा दरच सांगत नसत. आणि मग दादांच्या तोंडून एखादी शिवीही कधी कधी बाहेर पडायची.
कधीतरी चुकून संगीत नाटकही प्रसारित होत असे. त्यावेळी मात्र आम्ही आवर्जून ते ऐकत असू. बर्‍याचवेळा दादा मळ्याला जातानाही रेडिओ घेऊन जात होते. त्यावेळी मात्र आम्ही अशी चांगली चांगली गाणी ऐकायला मुकत असू.
रेडिओवर बँड असायचे. टू बँड किंवा तीन बँडचा रेडिओ जरी असला तरी त्याच्यावरील स्टेशन्स मला कधी समजली नाहीत. आज असले हे रेडिओ गायब झाले आहेत किंवा त्यांचे खोके झाले आहेत. अतिशय अडगळीच्या ठिकाणी ते पडलेले आहेत. कधीतरी मला पणझी आकाशवाणीवर कथा सांगण्यासाठी बोलावलं जातं. त्यावेळी रेकॉर्डिंग झाल्यानंतर घरी फोन करून रेडिओ दुरूस्त करून घ्या, सेल बघा, अमुक दिवशी माझा कार्यक्रम आहे वगैरे सांगावं लागतं. आज जमाना चॅनेल्सचा आणि इंटरनेटचा आहे. मनोरंजनाचा खजिना समोर पडलेला आहे. पण तहान जशी पाण्यानं भागते तशी ती कोल्ड्रींक्सनं भागत नाही. तसंच मनोरंजनाच्या या अतिशय प्रचंड अशा खजिन्याला ती पाण्याची गोडी नाही. समुद्राचं पाणी तहान भागवूच शकत नाही. तसंच काहीसं झालंय. रेडिओवरून किंवा आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम मनाला जसे अत्यानंद देत होते तसे दृश्य स्वरुपात असलेले कोणतेच कार्यक्रम अत्यानंद सोडाच पण आनंद देऊ शकत नाहीत. चार-पाच वर्षं चालणार्‍या कंटाळवाण्या आणि रटाळ मालिकांनी कसली करमणूक होईल? एखादा सामना ऐकताना जी मजा यायची ती पाहताना येत नाही.
आकाशवाणी हे माध्यम खर्‍या अर्थानं संस्कार करणारं माध्यम होतं. कार्यक्रमांची निवड चोखंदळ असायची. आज संस्कारांपेक्षा टीआरपीवरच लक्ष केंद्रीत केलेलं असल्यामुळे आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मोतीचं ओघळणं सुरू होत आहे.