आईचे दूध हेच सर्वोत्तम दूध!

0
357
  • नित्याश्री अय्यर
    (गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स)

जन्मजात बाळ हे पहिल्या तासात खूप क्रियाशील आणि सावध असतं आणि त्यानंतर ते झोपी जातं. म्हणून जर बाळाला आईजवळ ठेवलं आणि स्तनपान देण्याचा प्रयत्न केला, तर बाळ दूध ओढण्याची क्रिया लवकर शिकून घेतं.

आईच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्वे, कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि इतर क्षार असतात जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ते स्वस्त असते. ते सहज उपलब्ध होते. त्यामुळे त्यासाठी काही तयारी करावी लागत नाही.

आईच्या दुधावर बाळाचं पोषण होणं हे आपली पाळंमुळं निसर्गात कशी घट्ट रोवली गेली आहेत याचं द्योतक आहे. यशस्वी स्तनपान हे बाळाला वाढविण्याचे एक महत्त्वाचे कौशल्य असून ते शिकून घेऊन त्याचा सराव केला पाहिजे.
सामान्य प्रसूती झाल्यानंतरच्या अर्ध्या तासात आणि सिझेरीयन झाल्यानंतर एका तासातच बाळाला स्तनपान दिले गेले पाहिजे. त्यापूर्वी दिलं जाणारं मधपाणी, उकळलेलं पाणी किंवा ग्लुकोजचं पाणी हे बाळाला मुळीच देऊ नये, शिवाय ओआरएस किंवा मल्टीविटामिन्स जे डॉक्टरांनी द्यायला सांगितले असेल! मधपाणी वगैरे दिल्यामुळे फक्त बाळाची तहान शांत होईल, पण त्यामुळे बाळाचा दूध ओढण्याचा उत्साह कमी होईल आणि त्यामुळे त्याला डायरिया किंवा इतर जंतांमुळे होणारा संसर्ग होऊ शकतो. आईला झोपेचे इंजेक्शन जरी दिलेले असेल तरी बाळाला स्तनपान करवू शकतो. जन्माच्या वेळी बाळाची दूध ओढण्याची शक्ती सगळ्यांत जास्त असते ज्यामुळे आईला पान्हा फुटून दूध येण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.
स्तनपान लवकर का? ..
१. जन्मजात बाळ हे पहिल्या तासात खूप क्रियाशील आणि सावध असतं आणि त्यानंतर ते झोपी जातं. म्हणून जर बाळाला आईजवळ ठेवलं आणि स्तनपान देण्याचा प्रयत्न केला, तर बाळ दूध ओढण्याची क्रिया लवकर शिकून घेतं.
२. हे तितकंच खरं आहे की बाळाला लवकरात लवकर जर स्तनपान करविले तर आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्या प्रक्रियेला गती मिळते.
३. दूधाची निर्मिती आणि स्रोत हा प्रोलॅक्टीन आणि ऑक्सीटोसीन उत्तेजित झाल्यामुळे होते.
४. त्यामुळे आई आणि बाळामधील बंध घट्ट होण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते. आई आणि बाळाचा थेट स्पर्श झाल्यामुळे जन्मजात शिशुला ऊब मिळते ज्याला ‘कांगारू मदर केअर’ असे म्हटले जाते.

सुवर्ण दूध – कोलोस्ट्रम – बाळासाठी पहिली लस ः
प्रसूती झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसात, घट्ट आणि पिवळसर द्रव सस्तन ग्रंथींमधून स्रवलं जातं. हे नियमित येणार्‍या दुधापेक्षा वेगळं असतं. ते थोड्या प्रमाणात म्हणजेच १० ते ४० मिलि. इतकेच येते आणि त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. कोलोस्ट्रममधील फॅटचे प्रमाण हे नियमित दुधापेक्षा कमी असते. त्यामध्ये लॅक्टोजची तीव्रताही कमी असते. कोलोस्ट्रम ही बाळासाठी पहिली लस मानली जाते कारण त्यात इंटरफेरॉन नावाचा घटक असतो ज्याची अँटीव्हायरल क्रिया असते. तसेच त्यामध्ये व्हायरल रोग जसे देवी, पोलिओ, गोवर आणि फ्लूच्या विरुद्ध लढणार्‍या अँटीबॉडीज असतात. कोलोस्ट्रममध्ये मोठ्या प्रमाणात संरक्षक घटक असतात जे बाळाच्या पचनसंस्थेची वाढ झपाट्याने व योग्य प्रकारे घडवून आणतात आणि ते बाळाची पहिली शी म्हणजेच मल बाहेर काढण्यास मदत करतात.

लॅक्टोजेनेसीसची प्रक्रिया
अवस्थांतर दूध (ट्रान्झिशन मिल्क) ः प्रसूतीनंतरच्या दोन आठवड्यांमध्ये दूधाच्या प्रमाणात वाढ होऊन त्याचे रूप आणि स्वरूप बदलते. त्यालाच ट्रान्झिशन मिल्क म्हणतात. त्यातील इम्युनोग्लोबीन आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते आणि फॅट आणि साखरेचे प्रमाण वाढते. कोलोस्ट्रम आणि त्यानंतरच्या ट्रान्झिशन दूधाचे स्तनपान जर बाळाला न चुकता करवले तर संसर्ंगजन्य रोगांमुळे होणारे बालमृत्यू कमी होतात. दूधाचे स्वरूप बाळ किती वेळपर्यंत दूध घेतो त्या कालावधीतही बदलत असते.

फोरमिल्क ः जे दूध स्तनपानाच्या सुरुवातीच्या काळात येते त्याला फोरमिल्क म्हणतात. ते पाण्यासारखे असते व त्यात फॅटचे प्रमाण खूप कमी असते जेव्हा की लॅक्टोज साखर, प्रॅथिने, व्हिटामिन्स, क्षार आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते बाळाची तहान भागवतं.

हिंडमिल्क ः हिंडमिल्क हे स्तनपान सुरू केल्याच्या थोड्या वेळानंतर येते ज्यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते व ते बाळाची भूक शमवते आणि फोअरमिल्कपेक्षा जास्त ऊर्जा प्रदान करते. ज्या बाळांना हे दोन्ही प्रकारचे दूध दिले जाते ते व्यवस्थित झोपतात आणि निरोगी वाढतात.
आईचे दूध विरुद्ध फॉर्मुला दूध ः
आईच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात जीवनसत्वे, कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि इतर क्षार असतात जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. ते स्वस्त असते. ते सहज उपलब्ध होते. त्यामुळे त्यासाठी काही तयारी करावी लागत नाही. ते पचण्यास सुलभ असते. आईचे दूध हे उष्ण, पातळ, गोड, जंतुमुक्त असून त्याला त्याचा असा एक विशिष्ट वास असतो. त्यामध्ये जवळजवळ ८८% पाणी असते जे बाळाकरता पुरेसे असते. म्हणून निरोगी बाळाला पाणी देणे गरजेचे नसते. फॉर्मुला दूध हे बाळाच्या सगळ्या गरजा खचितच भागवू शकत नाही जे आईचे दूध पूर्ण करू शकते. त्यात कुठल्या ना कुठल्या पोषक घटकाची कमतरता असते किंवा एखादा घटक त्यात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात राहू शकतो. तसेच ते दूध महाग असते. ते तयार करण्यासाठी वेळ लागतो आणि ते जंतुमुक्त होण्यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते. दूध देण्याची बाटली जंतुमुक्त करावी लागते आणि स्वच्छता पाळावी लागते. जर पाणी आणि फॉर्मुल्याचे प्रमाण योग्यप्रकारे घेतले गेले नाही तर बाळ निरोगी राहूू शकणार नाही.

म्हणूनच स्तनपान हे बाळासाठी सर्वोत्तम आणि सुयोग्य आहार आहे. आईच्या दुधात लॅक्टोज साखर ही जास्त प्रमाणात असल्यामुळे ती बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी मदतगार ठरते. जी मुले स्तनपानावरच पोसली जातात त्यांना मज्जासंस्थेचे आजार होत नाहीत. ज्या देशात आईच्या दुधावर पोसलेली मुले जास्त प्रमाणात असतात त्या देशातील वृद्धांना मज्जासंस्थेचा आजार – मल्टीपल स्न्लेरोसीस होण्याचे प्रमाण कमी असते. स्तनपानावर वाढलेल्या मुलांना एक्झिमा किंवा अस्थमा क्वचितच होताना दिसतो. स्तनपानावर असणारी मुले बाटलीने दूध पिणार्‍या मुलांपेक्षा क्वचितच आजारी पडतात. डब्लूएचओनुसार विकसनशील देशात, बालकांचा मृत्यु दर हा बाटलीने दूध पिणार्‍यांमध्ये स्तनपानावर वाढलेल्या मुलांपेक्षा दहा पटीने जास्त आहे. आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात ज्या रोग उत्पन्न करणार्‍या जंतूंना जसे पोलिओ, फ्लू, टायफॉइड ताप, डायरिया, न्युमोनिया, खोकला इत्यादी. नष्ट करतात. जेव्हा की बाटलीच्या दुधावर असलेली मुले सहा पटीने जास्त या रोगांना बळी पडू शकतात. स्तनपानावर वाढलेली मुले जास्त एकाग्र, क्रियात्मक, आत्मविश्‍वासपूर्ण असतात आणि त्यांचे त्यांच्या भावनांवर चांगले नियंत्रण असते. याचाच अर्थ असा आहे की बाळाच्या मेंदू आणि मनाच्या वाढीसाठी आईचे दूधच योग्य आहे.
स्तनपानासाठी असे ठराविक वेळापत्रक नाही, कारण दुधाची निर्मिती, बाळाच्या दूध ओढण्याच्या सवयी आणि बाळाच्या पोटाची क्षमता ही प्रत्येक बाळाच्या वेगळ्या असतात. स्तनपान सुरू केल्याच्या काही दिवसांनंतर दूध पिण्याची वेळ आणि दोन स्तनपानांमधला वेळ आपोआप नियमित होत जाईल. पहिल्या सहा महिन्यात फक्त स्तनपानावर बाळ राहिल्यास त्याच्या आयुष्याची सुरुवात चांगली होते.

स्तनपान करण्यात मातांना प्रवृत्त करणे ही सामाजिक जबाबदारी असून प्रत्येक मातेला प्रेरणा देण्याची गरज असते आणि पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्यासाठी आधाराची गरज असते, तसेच ते पहिले सहा महिने फक्त स्तनपान देण्यासाठी प्रेरित करणेही तितकेच गरजेचे असते.