आंतरराष्ट्रीय योगदिन राज्यात उत्साहात

0
115

गोव्यात काल आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त राज्यातील सर्व बाराही तालुक्यात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मंत्रीगण, विविध सरकारी खात्यांचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच राज्यातील जनतेने योग शिबिरांना हजेरी लावली. योग दिनानिमित्त सरकारी कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रवींद्र भवन आदी ठिकाणी योग शिबिरे संपन्न झाली.
योग दिनानिमित्त राज्यातील प्रमुख कार्यक्रम ताळगाव येथील समाज सभागृहात आयोजिण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे हजर होते. या प्रमुख कार्यक्रमात विद्यार्थी, सरकारी अधिकारी व नागरिक मिळून ३५० जणांनी भाग घेतला.

स्वतः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सचिव जे. अशोककुमार, क्रीडा संचालक अंजली शेरावत, आरोग्य संचालक डॉ. संजय दळवी, शिक्षण संचालक नागराज होन्नेकेरी, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, आयुष विभागाचे उपसंचालक डॉ. दत्ता भट, गोवा योग अकादमीचे प्रमुख व योग गुरू डॉ. सूरज काणेकर यांच्यासह विविध विद्यालयांचे विद्यार्थी व नागरिक मिळून सुमारे ३५० जणांनी या प्रमुख कार्यक्रमात भाग घेतला.

गोवा पर्यटन खाते, कला आणि संस्कृती खाते, केंद्रीय आयुष मंत्रालय, भारतीय पर्यटन, सांख्यिकी आणि नियोजन तसेच सर्व केंद्रीय खात्यांचे कर्मचारी यांच्यावतीने पाटो-पणजी येथील संस्कृती भवनमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान मोदींमुळे जगभरात
योगाचा प्रसार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे देशात तसेच जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार झाल्याचे ते म्हणाले. आता भारताबरोबरच जगभरातील लोक मोठ्या संख्येने योगाकडे वळू लागले असल्याचे त्यांनी नमूद केले. योगाचा प्रचार व प्रसार यासाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी केलेल्या कार्याचाही राणे यांनी यावेळी उल्लेख केला.

नृत्य शैलीत
योगासन सादरीकरण
यावेळी डॉ. जुझे पेरेरा व समुहाने संगीताच्या तालावर नृत्याच्या शैलीत आसनांचे सुंदर असे सादरीकरण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आरोग्य संचालक जे. अशोककुमार, क्रीडा संचालक अंजली शेरावत, शिक्षण संचालक नागराज होन्नेकेरी, आयुषचे उपसंचालक डॉ. दत्ता भट, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, गोवा राज्य योग अकादमीचे प्रमुख व योग गुरू डॉ. सूरज काणेकर आदी मान्यवर हजर होते.

गोमेकॉत रुग्णांना योगाच्या
शिक्षणाचा विचार ः विश्‍वजित
राज्यात झालेल्या ताळगाव येथील मुख्य कार्यक्रमात आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, योग हा मन आणि शरीर यांच्यात संतुलन घडवून आणणारा सेतू आहे. नियमित योगाभ्यासामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते आणि म्हणूनच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना त्यांना झालेल्या आजारावर विजय मिळवता यावा यासाठी त्यांना योगाचे शिक्षण देण्याचा विचार आहे, असे ते म्हणाले.