अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबत निर्णयाचे स्वागत

0
71

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी सन्मानपूर्वक निवडण्याबाबतच्या गेल्या ८ एप्रिल रोजीच्या ठरावावर नुकतेच येथील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी दोन तृतियांश मताधिक्याने या ठरावाला मंजुरी मिळाली. या निर्णयाचे साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे.
सदर ठरावाला सहमती मिळवण्यासाठी सर्व संबंधित साहित्य संस्था व महामंडळांशी चर्चा करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाने याबाबत आग्रही भूमिका घेतली. तर मराठा साहित्य परिषदेने या ठरावास विरोध दर्शविला. तथापि अन्य संस्थांनी पाठिंबा दर्शविल्याने निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

साहित्य क्षेत्रातील योगदान उच्च कोटीचे असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक दिग्गज साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदापासून वंचित राहत होते. मात्र आता अशा दिग्गज साहित्यिकांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळणे शक्य होणार आहे.
संमेलनाध्यक्ष निवडणुकीमुळे राजकारण, आरोप, वाद निर्माण होत होते. त्यामुळे दिग्गज साहित्यिक यापासून अलिप्त राहणे पसंत करीत होते.