अ. भा. उपकनिष्ठ बॅडमिंटन रँकिंग स्पर्धा मडगावात

0
214

गोवा बॅडमिंटन संघटनेतर्फे मडगाव शटलर्स क्लब आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिल्यांदाच गोव्यात अखिल भारत उपकनिष्ठ रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १५ ऑक्टोबरपर्यंत मडगाव येथे ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
स्पर्धा १३ व १५ वर्षांखालील वयोगटातील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरीत विभागात खेळविण्यात येणार आहे. पात्रता फेरीचे सामने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत फातोर्डा, केपे येथील मल्टिपर्पज हॉल, चिखली स्टेडियम, बिट्‌स पिलानी इन्स्टिट्यूट आणि दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय मिळून एकूण १७ कोर्टवर खेळविले जातील. मुख्य स्पर्धा १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत फोर्डा येथील मल्टिपर्पज हॉलमध्ये खेळविली जाणार असून एकूण ३८६ स्पर्धक पात्रता फेरीतून मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरतील.

काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, गोवा बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी नरहर ठाकुर, संदीप हेबळे, वामन फळारी आणि ऑस्कर सिल्वेरा यांच्या उपस्थितीत ुुु.सेरलरवाळपींेप.ळप या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. या संकेतस्थळावर वरील स्पर्धेविषयीची दैनंदिन माहिती देण्यात येईल.

यावेळे बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सरकारतर्फे या स्पर्धेसाठी आयोजकांना पूर्ण सहकार्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे सुंदर शेट्टी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. तसेच देशभरातील ५० तांत्रिक अधिकारी या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम करतील. स्पर्धेसाठी बक्षिसे व इतर मिळून एकूण २० लाख खर्च अपेक्षित आहे.

स्पर्धेसाठी आयोजन समितीची निवड करण्यात आली असून ऑस्कर सिल्वेरा हे आयोजन सचिव म्हणून काम पाहतील. तर वामन फळारी, नरहर ठाकुर, संदीप हेबळे, लक्ष्मीकांत केनावडेकर, कांसिओ मस्कारेन्हास, लीओनेल फर्नांडिस, आयूब सी. के. आणि सेबी फेर्राव हे अन्य सदस्य आहेत. विनायक कामत, रॉय अथायदे आणि प्रदोष सिलिमखान हे तांत्रिक समितीचे प्रमुख म्हणून काम पाहतील.