अहिल्याबाई होळकरांची स्मृती जागवणारे : माहेश्‍वर

0
340

– सौ. पौर्णिमा केरकर

भारत देशाचे हृदय असेच ज्याला संबोधले जाते तो प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश. नैसर्गिक प्रसन्नता, वैभवशाली इतिहास, वन्य प्राणिजीवन, वास्तुशिल्पकला, डोंगराळ प्रदेशातील दाट जंगल, कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण मंदिरे, बौद्ध धर्मीयांची पवित्र स्थाने, एकापेक्षा एक सरस शिल्पमंदिरे यांनी हा प्रदेश एवढा समृद्ध आणि दिमाखदार स्वरूपात आपल्यासमोर येतो की त्या प्रदेशाचा दिमाख आणि लावण्य एकदा तरी अनुभवायलाच हवे हा विचार मनात सतत येत राहतो. स्वस्थता लाभत नाही. आपोआपच मग तिथली काही स्थळं हेरून मन गुंतून राहते.पर्यटनदृष्ट्या मध्य प्रदेशचा जेव्हा विचार येतो तेव्हा त्याची कलात्मक सौंदर्याविष्काराची श्रीमंती नजरेत भरते. इंदौरला मुक्काम करून तिथून अगदी जवळ असलेली म्हणजे पन्नास ते सत्तर कि.मी.च्या परिघात असलेली स्थळे सहजपणाने पाहता येतात. त्यांत मांडू, बारा ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्‍वर, उज्जैनमधील महांकाळेश्‍वर, सांची स्तूप व माहेश्‍वर या व इतर अनेक स्थळांना सौंदर्याच्या अधिष्ठानाबरोबरीनेच शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास-संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे ही स्थळं केवळ सौंदर्याचा साक्षात्कार घडवीत नाहीत तर आपल्या महत्तम परंपरेविषयीचे सजग आत्मभान देतात. आपण कोठे होतो व आज आपली वाटचाल कोठे चाललेली आहे याचा विचार करायला लावणारा हा वारसा कितीही वेळा पाहण्याचा प्रयत्न केला तरी पुरे वाटणारच नाही. मध्य प्रदेशातील ‘माहेश्‍वरी’ या स्थळाविषयीसुद्धा असेच काहीसे मनभर जाणवत राहते.
मध्य प्रदेशच्या प्रवासात नर्मदेची अनेकविध रूपं पाहता आली. असंख्य धार्मिक स्थळांची बांधकामं या नदीच्या काठाकाठांनी झालेली आहेत. विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांतून उगम पावलेली नर्मदा व तिच्या काठावर वसलेले ‘माहेश्‍वर’ मध्य प्रदेश आणि राजस्थानचा अनोखा संगम संस्कृती, भाषेच्या माध्यमातून दर्शविताना दिसते. माहेश्‍वरीची प्रसिद्धी सर्वदूर पोहोचली ती अहिल्याबाई होळकर यांच्या तेथील वास्तव्यामुळेच. तेथील प्रसिद्ध ‘माहेश्‍वरी साडी’ ही तर खास ओळख ठरलेली आहे महिला सबलीकरणाची. एखादा प्रांत आपल्या मातीची ओळख लघुउद्योगाच्या माध्यमातून इतर प्रांताला जेव्हा करून देतो तेव्हा इतरांसाठी ती प्रेरणा असते. माहेश्‍वरीला जाताना साड्यांचे आकर्षण होतेच, त्याबरोबरीनेच एका साध्यासुध्या सतेज, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, डोळ्यांत स्वाभिमान, कर्तव्याची चमक असलेल्या अहिल्याबाई होळकरांची शौर्यगाथा ज्या परिसराने अनुभवली, त्या परिसराच्या स्पर्शाने मलाही थोडेसे त्या कालखंडात जाऊन शोध घ्यायचा होता. या बाईने आपल्या वाड्यातच चौवीस शक्तिपीठांपैकी एका विद्यावासिनी शक्तिपीठाची उपासना केलेली होती. कालिमातेचेच रूप असलेल्या विद्यावासिनीची तिने नुसतीच अंधश्रद्धाळू वृत्तीने पूजाअर्चा केलेली नव्हती तर त्यातील समाजभान तिने जागृत ठेवलेले होते हे तेथील प्रत्येक वस्तूच्या माध्यमातून जाणवत राहते. माहेश्‍वरीचे वेगळेपण काय तर अहिल्याबाई होळकरांचा जुना वाडा जो आजही तेवढाच नेटका आणि शिस्तबद्धरीत्या काळजीपूर्वक राखून ठेवलेला आहे. नर्मदेवरच्या घाटपरिसरातून नर्मदेचे धीरगंभीर रूप पाहता गूढत्व, सौंदर्य, कर्तव्यदक्षता, शौर्य, स्वाभिमान, धार्मिकता, दानशूरपणा, समाजभिमुखता यांचे असंख्य तरंग मनात उमटतात. एका नकळत्या वयात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चोंडी गावच्या माणकोजी शिंद्यांची मुलगी अहिल्या ही सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एकुलत्या एक पुत्राची- खंडेरावाची- भार्या बनून कीर्तिशालिनी झाली. होळकरांची सून झाल्यानंतरच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक वलये प्राप्त झाली. कर्तबगार, धार्मिक व उदार वृत्तीचा मायेचा ओलावा लाभलेला सासरा व कणखर, करारी सासू गौतमाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाईत आमूलाग्र बदल झाला. पती सहवासाचे सुख दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला अर्धवटच आल्याने आयुष्यातील काटेरी वाट त्यांनी सासू-सासर्‍याच्या धिरावरच सुरुवातीला चालण्याचा प्रयत्न केला. माहेश्‍वरीच्या निमित्ताने मी अशी एक जागा बघितली की जिथे स्त्रियांच्या आत्मसन्मानाची दखल घेतली जात होती. मध्ययुगीन कालखंडात स्त्रियांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहता या परिसरात मात्र सात्विक सोज्वळता भरून राहिलेली दिसली. खंडेरावांच्या चितेवर सती जाण्याच्या तयारीत असलेल्या अहिल्येला तिच्या सासर्‍यानीच तिच्या राजकीय कर्तव्याची जाणीव करून देत तिला या विचारापासून परावृत्त केले. तत्कालीन काळखंडातील त्यांचे हे पुरोगामित्व आज आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरते. सुनेला वाचायला, लिहायला शिकवले. घरची कामे, फौजेची व्यवस्था, वसुली, शत्रूच्या हालचालींवरची नजर या सार्‍यांचीच शिकवण तिला दिली ती तिची पारख करूनच. सासर्‍याच्या मृत्यूनंतर त्या एकाकी पडल्या खर्‍या, पण सासर्‍याने त्यांना खर्‍या अर्थाने कर्तबगार व आत्मनिर्भर बनविल्याने येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला त्यांनी मोठ्या हुशारीने, आत्मविश्‍वासाने तोंड दिले. तिचे शांत संयत रूप, परमेश्‍वरावरील निस्सिम श्रद्धा या कामी तिला महत्त्वाची ठरली याची साक्ष माहेश्‍वरीला भेट दिल्यानंतरच आपल्याला पटते. अहिल्याबाईंनी माहेश्‍वरीला राज्याच्या राजधानीचे ठिकाण हलविले व तेथूनच त्यांनी राजकारण केले. खरेतर अहिल्याबाई होळकरांचा अठ्ठावीस वर्षांचा कालखंड हा राजकारणापेक्षा समाजकारणाचाच अधिक होता हे त्यांनी केलेल्या तत्कालीन कामावरूनच लक्षात येते. घरातील धार्मिक वातावरण, उपासतापास, व्रतवैकल्ये यांच्यात जरी दिवसाचे काही तास त्यांचे जात असले तरी त्यातून त्यांची डोळस श्रद्धाच अधोरेखित होते.
धनगरासारख्या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला. मध्य प्रदेश तर घनदाट जंगलांनी व्यापलेला. भिल्ल, गोंडसारख्या डोंगराळ प्रदेशात ती वावरणारी. या आदिम जमातीला विश्‍वासात घेऊन व्यापारी व त्यांच्यात सामंजस्याचे वातावरण निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजवैभव उपभोगताना कसल्याही तर्‍हेचा लोभ मनामध्ये न बाळगता निरलसता त्यांनी सदैव जोपासली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंतचा त्यांचा दिनक्रम आदर्शवादी असाच होता. अडलेल्या-नडलेल्यांसाठीचा मदतीचा हात त्यांनी आपल्या अखत्यारित कधी आखडता घेतला नाही की स्वतःसाठी काही राखून ठेवले नाही. त्यांचा चौसोपी राजांगणाने युक्त असा वाडा म्हणजे एक धार्मिक स्थळच आहे. स्वयंपाकघरापासून ते थेट बैठकीच्या खोलीपर्यंत सर्वत्रच देवघर भरून राहिलेले आहे. शंकराची निस्सिम भक्ती त्यांनी आपल्या हयातीत केली. नर्मदेच्या काठावर अतिशय कलापूर्णतेने उभारलेले शिवमंदिर त्याची साक्ष पटवते. या मंदिरातच त्यांना भगवान शिवशंभोचा साक्षात्कार झाला असे सांगितले जाते.
एक कलासक्त व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाईंना इतर जनांच्या कलेची, पांडित्याची तेवढीच कदर होती. त्यांच्या सहवासात विद्वान ज्योतिषी वावरायचे, त्याचप्रमाणे कलाकार, प्रवचनकारसुद्धा होते. त्याही काळातील त्यांचे वैचारिक वैगळेपण, महिलांकडे, समाजाकडे, गरजू प्रजेकडे पाहण्याची वृत्ती त्यांच्याविषयीचा आदर अधिक द्विगुणित करते. त्यांनी केलेले मंदिरांचे जीर्णोद्धार, बांधलेली मंदिरे, धर्मशाळा, विहिरी, अन्नछत्रे यातून त्यांचे सामाजिक कार्य ठळक होत जाते.
माहेश्‍वर हेच ठिकाण अहिल्याबाईंची कर्मभूमी ठरली. याला कारणही नर्मदा ठरली असावी. नर्मदेच्या काठावर व माहेश्‍वरीला इतर ठिकाणी त्यांनी यात्रेकरूंसाठी घाट बांधले, इतर सुविधा पुरविल्या, मंदिरांची रचना केली, एवढेच नाही तर माहेश्‍वरी साडीच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करणारे अनेक उपक्रम त्या काळात राबविले. ‘माहेश्‍वरी साडी’ आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरात स्वतःचा आगळावेगळा लौकिक सांभाळून आहे. त्यामागे ‘होळकर’ हे नाव आहे. हातमागावरती साडी विणण्यासाठी अहिल्याबाईंनी १७६५ मध्ये गुजरातमधून कुशल साडी विणणार्‍या विणकर्‍यांना बोलावून घेऊन माहेश्‍वरीतील महिलांना रोजगार मिळावा या हेतूने त्यांना हातमागावर साडी विणण्याचे कसब शिकविले. खरेतर तत्कालीन काळातील हा एक फार मोठा विचार आहे. स्वतःच्या कल्पकतेतून त्यांनी केलेल्या साड्यांची निर्मिती ही एक माहेश्‍वरची खास ओळख बनलेली आहे. होळकर कुटुंबीयानीच ‘रेहवा सोसायटी’च्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख तर टिकविलीच, त्याबरोबरीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, त्यांच्यातील स्वाभिमान, आत्मविश्‍वास दृढ करण्याची जबाबदारीसुद्धा पेलली. जवळजवळ एक लाख मीटर कापडाची निर्मिती इथे दरवर्षी होते. खास विणकरांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण, कमी खर्चात आरोग्य सेवा व इतरही अनेक सोयीसुविधांची रचना गेल्या कित्येक वर्षांपासून पुरविण्यात येत आहे. आज मध्य प्रदेशाचा दौरा करताना जाणकार महिलांना माहेश्‍वरी साडी हटकून आठवते. माहेश्‍वरी म्हणजे पार्वती. महेश या नावावरूनच हे नाव या शहराला पडलेले आहे. मारवाडी बनियांची पोटजात असलेल्या या शहराने शेकडो वर्षांपासून पंजाबी, गुजराती, मराठी, तेलगू, बंगाली या प्रादेशिक भाषांची जपणूक केलेली दिसते. महादेवाचे उपासक असलेले माहेश्‍वरचे लोक हे मूळचे राजस्थानातले असले तरी सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यांच्या खुणा या शहरात जागोजागी दिसतात. मुळातच हे लोक कष्टाळू तेवढेच कलात्मक बोटांचे. यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ‘माहेश्‍वरी साडी.’ असंख्य कलाकुसरींच्या आकर्षक डिझाईनच्या साड्या घेण्यासाठी महिलावर्गाची पावले आपोआपच माहेश्‍वरीकडे वळतात. बाजारपेठेपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला होळकरांचा वाडा मग पाहावाच लागतो. त्यानंतर मग नजरेस पडतात नर्मदेचा विहंगम घाट. याच घाटावर एकेकाळी ऋषीमुनी स्नानसंध्या उरकायचे, ध्यानधारणा, जपतप करायचे याची आठवण झाली की आपोआप नतमस्तक व्हायला होते. पेशवा घाट, कालेश्‍वर, रावणेश्‍वर, काशीविश्‍वेश्‍वर, राजराजेश्‍वर, पंढरीनाथ, लक्ष्मी मंदिर, देवी अहिल्या पुरातत्त्व संग्रहालय हे सर्वच अनुभवता येते. होळकर किल्ल्यावरून घाटावरती जाण्याच्या मार्गावर अहिल्याबाई आणि सरदार विठ्ठलराव यांच्या स्मृतीच्या छत्र्या समोरासमोर स्थित असलेल्या दिसतात. काही वर्षांपूर्वी माहेश्‍वरीमधील लोक लघुउद्योगाच्या माध्यमातून पुढे आलेले होते. आज त्यांच्यातील कित्येक कर्तबगार लोकांनी स्वतःचे मोठमोठे उद्योगधंदे व कारखाने उभारलेले दृष्टीस पडतात. बिडला, सोमाणी, दामाणी ही काही परिचयाची नावे त्यांच्याशी निगडीत दिसतात.
प्रवास हा फक्त एका स्थळाचा नसतो किंवा तेथील भौगोलिक, नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेऊन परतीचा मार्ग क्रमायचा याच्यापुरतासुद्धा नसतो. प्रवासाचे कार्यक्षेत्र मर्यादित केले तर कोठेतरी आपल्या सर्वार्थाने परिपूर्ण होण्यासाठीच्या मार्गाला कुंपण घातल्यासारखे होते. अहिल्याबाईंनी भगवान शिवशंकराची मनोभावे सेवा केली. त्याच्या पूजाअर्चेत त्यांच्या हयातीत कधी खंड पडला नाही. असे असले तरी समाजकार्यातही त्या कधी मागे पडल्या नाहीत. नर्मदेने त्यांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रेरणा दिलेली आहे. नर्मदेच्या अथांग प्रवाहाशी अहिल्याबाईंचे जीवनही समरस झालेले होते. नर्मदेप्रमाणेच चढ-उतारांचा, संघर्ष-समस्यांचा, वेदना-संवेदनांचा प्रवास त्यांनी अनुभवला होता. आप्तस्वकीयांचे काळजाला पीळ पाडणारे प्रसंग अनुभवीत नर्मदेप्रमाणेच त्या प्रवाही राहिल्या. आजही माहेश्‍वर अहिल्याबाईंंचा त्याग, त्यांची सेवा, भक्ती आणि दानशूरपणाचे प्रतीक बनून राहिलेले आहे.