अस्मितेच्या राजकारणातील पुढचा टप्पा

0
127
  • ऍड. असीम सरोदे

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात चर्चेत असणारे संभाजी भिडे गुरुजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रायगडावर ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार करण्याचा संकल्प सोडला असून त्यासाठी ते त्यांच्या धारकर्‍यांना आवाहन करत आहेत. खरे पाहता, सुवर्ण सिंहासन करण्याचा विचार हा अस्मितेच्या राजकारणातील पुढचा टप्पा आहे. खरे तर शिवरायांचे विचार कृतीत येणे अधिक महत्त्वाचे आहे.

मनोहर उर्ङ्ग संभाजी भिडे गुरुजी हे सध्या महाराष्ट्रभरात भाषण देत ङ्गिरताहेत. त्यांनी अलीकडेच अहमदनगर येथे एक घोषणा केली आहे. त्यानुसार आगामी दीड वर्षात रायगडावर महाराजांसाठी सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यासाठी सर्वसाधारणपणे १३९४ किलो सोने लागणार आहे. हे सर्व सोने ते त्यांच्या ‘धारकर्‍यां’ मार्ङ्गत जमा करणार असून कोणत्याही प्रकारची सरकारी मदत घेणार नाही असेही त्यांनी जाहीर केले आहे. यानिमित्ताने सोने, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी भिडे जे सांगण्याचा प्रयत्न करताहेत त्या सर्वांबाबत विचारमंथन करण्याची गरज आहे.

सर्वांत पहिला मुद्दा म्हणजे, महाऱाष्ट्रातील राजकारण, समाजकाऱण आणि एकुणच धर्मकारण व जातीव्यवस्था प्रदूषित करण्याचे प्रमाण अलीकडील काळात प्रचंड वाढले आहे. यामध्ये काही लोक अगदी स्पष्टपणे दोषी असल्याचे दिसून येते आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे ही समाजाची गरज बनली आहे.

सोन्याबाबत विचार करायचा झाल्यास, प्राचीन काळापासून सोने हा मौल्यवान धातू म्हणून ओळखला जातो. तो धातू आहे, पण त्याला मानवाने अतिमहत्त्व दिल्याने वादविवादापलीकडे जाऊन सोने मिळवण्याच्या लालसेने रक्तपातही होतो. समाजात, कुटुंबात कलह निर्माण होतो, इतके हे महत्त्व सोन्याला दिले गेले आहे. समाजात वावरताना विविध पातळ्यांवर विविध हक्कांसाठी काम करताना मला स्पष्ट मत मांडावेसे वाटते की, या धातूला दिलेले महत्त्व जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार कधीच कमी होणार नाहीत. सोने आर्थिक सुबत्तेचे प्रतीक मानले जात असले तरीही ती अत्यंत दिखाऊ आणि भौतिकवादाला चालना देणारी गोष्ट आहे हे देखील मान्य करावे लागले.

पुढचा मुद्दा म्हणजे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सर्व गोष्टी केल्या जातात, त्यांनी समाजातील विविध स्तरांतील लोकांना उभे करण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांच्या आयुष्यात सुवर्णकाळ आणण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच शिवाजी महाराजांना लोकमान्यता मिळाली. म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते. शिवाजी महाराज सातत्याने एक चमकणारा आणि न मावळणारा विचार प्रवाह आहे असेही आपण म्हणू शकतो. शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आणि देशातील अनेक लोकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले आहेत. ते अजरामर चिरंतन विचारात राहणार आहेत. अशा वेळी त्यांना या भौतिक स्वरुपाच्या सोन्याच्या सिंहासनाची काहीही जरूर नाही हे समजून घेतले पाहिजे.

हृदयात, वर्तणुकीत आणि कृतीत म्हणजेच आचरणात शिवाजी महाराज आणण्याचे सोडून विकृत मागण्या किंवा अस्मितांचे राजकारण करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. संभाजी भिडेंच्या ह्या मागणीकडे एक छुपा अजेंडा म्हणूनच पाहिले पाहिजे, असे माझे मत आहे. मुळातच, संभाजी भिडे सध्या गुंतागुंतीचे व्यक्तीमत्व म्हणून चर्चिले जात आहेत. मात्र एक म्हण विसरता कामा नये ती म्हणजे ‘चकाकते ते सर्वच सोने नसते.’ सोन्यासारख्या अनेक व्यक्ती समाजात आहेत. धर्माच्या बुरख्याआडून वार कऱणार्‍या, धर्मांमध्ये, जातींमध्ये तेढ निर्माण करणार्‍या या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करू दिला जाऊ नये हे खरे तर लोकांनी ठरवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांक़डे लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याची स्वतःची एक संकल्पना होती. त्या अर्थाने ते ‘आकर्षक’ व्यक्तिमत्व होते. त्यांचा कसलाही छुपा अजेंडा नव्हता.

शिवरायांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हणून ओळखले जाते, कारण महाराष्ट्राच्या २० किलोमीटर समुद्रकिनार्‍याचा, बेटांचा अत्यंत सुंदर, कल्पक वापर महाराजांनी दूरदृष्टी ठेवून केला. भारतीय नौदल प्रसिद्ध आहे, त्यामागे शिवाजी महाराजांचा आरमार घडवण्याचा भविष्यवेधी दृष्टीकोन आहे. आज त्याचाच ङ्गायदा आपल्याला होत आहे हे नाकारता येणार नाही. शिवाजी महाराज हे पूर्णतः धर्मनिरपेक्ष राजे होते. सर्व धर्मांना सामावून घेणारा माणूस महान होऊ शकतो हेच त्यांच्या जीवनचरित्रावरून शिकता येते. मुसलमानांनाही त्यांनी सामावून घेतले होते आणि सरसेनापतीपदी त्या धर्माची व्यक्ती विश्‍वासाने नेमली होता. शिवाजी महाराजांसाठी प्राण प्रणाला लावणारे अनेक मुसलमान सैनिक, सेनापती इतिहासात दिसतात. दुर्दैवाने संभाजी भिडेंसारखी माणसे नेहमीच त्यांना हिंदूंच्या कोंदणात बसवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे पूर्णतः चुकीचे आणि समाजाची दिशाभूल करणारे आहे.
शिवाजी महाराज स्वतः महिलांचा खूप सन्मान करीत होते. महिलांच्या हक्कांबद्दल अत्यंत जागरुक आणि कृतीशील असणारा तो राजा होता. महिलांवरील अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही अशीच प्रतिमा घेऊन ते आयुष्यभर जगले. आपल्या स्वराज्यातील लोकांनाही त्यांनी याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शिवाजी महाराजांना भौगोलिक परिस्थितीची उत्तम जाण होती. अत्यंत विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण अशी ‘गनिमी कावा’ नावाची संकल्पना त्यांनी मांडली आणि कमी सैन्यात मोठमोठ्या संख्येतील शत्रूला पराभूत करण्याची किमया साधून दाखवली.
अशा या सदासर्वकाळ महान असणार्‍या राजासाठी – छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुवर्ण सिंहासन निर्माण कऱण्याची जी कल्पना मांडली गेली आहे त्याला माझ्या मते विरोधच केला पाहिजे. लोकांनीच हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, शिवाजी महाराजांना सुवर्ण सिंहासनाची गरज नाही. ते तमाम मराठी जनांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. त्यांना भौतिक सुवर्णसिंहासनाची गरज नाही. लोकांच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. मात्र समाजातीलच काही जण भावनिक आवाहनांना भुलून अशा लोकांच्या या प्रतिकात्मकतेला बळी पडतात. त्यांची केवळ दिशाभूल केली जाते. म्हणूनच संभाजी भिडे गुरुजी किंवा त्यांच्यासारख्या प्रवृत्ती असतील यांच्याबद्दल गांभीर्याने विचार नक्कीच केला पाहिजे. त्यांचा छुपा अजेंडा समजून घेतला पाहिजे. त्यांना अस्मितेचे राजकारण करायचे आहे हे जनतेने जाणून घ्यायला हवे.

तमाम मराठी जनता शिवाजी महाराजांवर प्रेम करत असली आणि त्यांचे नाव घेऊन जगत असली तरीही त्यांचे विचार कृतीत आणणे कठीण आहे. त्यामुळेच आज ङ्गक्त झेंडे, पताका, शर्ट आणि गाड्यांवर ‘राजे तुम्ही कधी येणार’ ची साद घालण्यात आपण धन्यता मानत आहोत. या सर्व गोष्टी भावनिक पातळीवर आदर करण्याच्या असल्या तरीही त्याला वास्तविकतेची जोड नाही.

एकूणच, सुवर्ण सिंहासन करण्याचा विचार हा अस्मितेच्या राजकारणातील पुढचा टप्पा आहे. लोकांनी या कोणत्याही राजकारणाला बळी न पडता शिवाजी महाराजांचे विचार कृतीत येणे आणि ते सातत्याने तळपत राहणे हाच विचार करणे आवश्यक आहे.