असे आले स्वातंत्र्य दारी…

0
119

– शरत्चंद्र देशप्रभू
गोवा मुक्तीला पन्नास वर्षे उलटून गेली आणि जाणवले की व्यग्रमनाला काळाच्या गतीचे संकेत मिळत नाहीत. तसे पाहिले तर आमचे कुटुंब सरंजामशाहीत वाढलेले. आजोबांपासून सरकारी नोकरीत स्थिरावलेले. त्यामुळे गोवा मुक्तीसंग्रामात आमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध यायचा प्रश्नच नव्हता. गोवा मुक्तीच्या वेळी मी किशोरावस्थेत पदार्पण केलेले. परंतु मुक्तीपूर्व काळात होऊ लागलेल्या सुप्त बदलाचे पडसाद माझ्या संवेदनशील मनावर उमटलेले आणि स्थिरावलेले.
पेडण्याच्या शांत रूपाला पहिल्यांदा तडा गेला, तो गोवा मुक्ती चळवळीने जोर धरल्यावर. १९५४ साल असावे. शेजारच्या राज्यात जाण्या – येण्याच्या वाटा बंद झाल्या. आझेंत मोंतेरोच्या दडपशाहीने उग्र रूप धारण केलेले. अत्याचाराच्या खर्‍याखोट्या बातम्या तसेच वदंता वावटळीसारख्या कानावर आदळत होत्या. सरकारची वक्रदृष्टी असलेल्या नागरिकांनी रातोरात महाराष्ट्राच्या हद्दीत स्थलांतर केले. प्रत्येक दिवस कोणती ना कोणती भयानक बातमी घेऊनच उगवायचा. अमक्याला मारहाण झाली, तमक्याला अटक झाली अन् याला तडीपार केले. दुसर्‍या बाजूने स्वातंत्र्य चळवळीतील लोकांबद्दल पण अशाच अफवा पसरवल्या जात. चळवळीला लागणारा पैसा उभारण्यासाठी याला धमकी दिली, त्याला लुटले, अमक्या जमीनदाराला पत्रातून बॉम्ब पाठवला. वेळीच सुगावा लागल्यामुळे जमीनदार बचावला, वगैरे विविध किस्से दबक्या आवाजात ऐकू येऊ लागले. सरकारने आफ्रिकन सैनिक म्हणजे खाप्य्रांची फौज भद्रगडावर तैनात केल्याच्या अफवा पण पसरल्याचे आठवते. हे लोक नरभक्षक असल्यामुळे त्यांना एका मोठ्या पिंजर्‍यात बंद करून ठेवल्याची अफलातून अफवा पण पसरली होती. स्वातंत्र्याविषयीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख असलेली नाटके सेन्सॉर केली जाऊ लागली. कै. मामा वरेरकरांचे ‘करीन ती पूर्व’ नाटक ऐन रंगात आले असताना बंद पाडले गेल्याचे आठवते. तसेच डिचोलीला मावरिश पेगाद हा आदमिनिस्ट्रादोर जातीने हजर राहून नाटके बंद पाडण्याचा कार्यक्रम कठोरपणे राबवत होता. वडिलांना सेक्रेटरी असल्यामुळे सरकारी नियमानुसार या पेगादची साथ करावी लागत असे. सरकारी नोकरीशी इमान राखावे की सांस्कृतिक वारसा जपावा अशा द्विधा अवस्थेत वडिलांनी ते दिवस काढले.
त्याकाळी शालेय पाठ्यपुस्तकातील देशभक्तीपर मजकुरावर पण बंदी आली होती. नंदुरबारच्या हुतात्मा झालेल्या शिरीषकुमारवरचा मजकूर तसेच महात्मा गांधींवरच्या कवितेवर जाड पुठ्‌ठ्याचे आवरण टाकले होते. व्यक्तिस्वातंत्र्यावर असलेले निर्बंध जास्तच आढळले होते.
पणजीत त्या काळी आमचे वास्तव्य कै. दाजी रेडकरांच्या चाळवजा घरात होते, त्यावर दिल्ली व मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या बातम्या दबलेल्या आवाजात ऐकण्यासाठी गोवा मुक्तीसंग्रामाविषयी सहानुभूती असलेले लोक गोळा होत. परंतु पोर्तुगीज पोलिसांची गस्त असल्यामुळे घरमालकाची व बातम्या ऐकणार्‍यांची अवस्था बिकट व्हायची. बेती पोलीस स्टेशनवर केलेल्या सशस्त्र हल्ल्याची बातमीही लोकांना रेडिओद्वारे कळल्याचे आठवते.
आमच्या आजोबांना जरी भारतीय नेत्यांविषयी आदर असला तरी त्यांचा पिंड चळवळीशी केव्हाच सुसंगत नव्हता. गोवा मुक्ती चळवळीतील बंदीवानांच्या हालअपेष्टा आजोबांच्या सरकारी नोकर असल्यामुळे कानावर पडलेल्या. हे सारे आजोबांच्या आवाक्यापलीकडचे, पण स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांचे संबंध सलोख्याचे. श्री. आल्व्हस् परेरा हा सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक दसरोत्सवाच्या निमित्ताने आमच्या घरी राहून मुक्तीप्रवर्तक पत्रके वाटून गेला होता. यालाच पणजीतील भारत लॉज या निवासी खाणावळीत आमच्यासमक्ष अटक झाल्याचे अजून स्मरते. जेवण संपेपर्यंत पोलीस दोन्ही बाजूंनी सक्त पहारा देत होते. तो प्रकार पाहून आम्ही मुले हबकून गेल्याचे आठवते.
पेडण्यातील कितीतरी लोकांनी गोवा मुक्तीसंग्रामात योगदान दिलेले. कै. मदनसाहेब देसाई, कै. वसंत (सेनापती) देसाई, कॉम्रेड नारायण देसाई, नारायण नाईक, कै. लक्ष्मण सावळ देसाई अशा कितीतरी व्यक्तींनी आयुष्याची होळी करून मुक्तीसंग्रामात स्वतःला झोकून दिले होते.
जय हिंद चळवळीने जोर धरल्यावर वातावरण तापू लागले. सगळे जण जरी वरकरणी शांत वाटत असल्याचे भासवत असले, तरी मने अस्वस्थ होती. एका बाजूने चळवळीने जोर धरला होता, तर दुसर्‍या बाजूने आझेंत मोंतेरोची दडपशाही वाढू लागली होती. आमचे कुटुंब सरकारदरबारी वजन असल्यामुळे निर्धास्त होते, परंतु मोंतेरोच्या क्रूर व्यक्तिमत्त्वाचा सर्वांनीच धसका घेतलेला. पेडण्यात कै. सीताराम शेणवी देसाईंच्या घरात बिर्‍हाड करून असलेल्या प्रतिष्ठित डॉक्टर देसाई कुटुंबाला मारहाण झाली आणि लोक बिथरले. आजोबा, वडिलांची मनःस्थिती दोलायमान झाली. पेडण्यात राहायचे की रातोरात सातार्ड्याला मुक्काम हलवायचा याचा निर्णय होत नव्हता. यात जोखीमही होती. सर्व कुटुंबीय एकाचवेळी सीमेपार व्हायची गरज होती. कोणी मागे राहिला तर पोलिसी अत्याचाराचा बळी ठरला असता. मोंतेरोजी छळण्याची तीच खासीयत होती. देवावर भार ठेवून लोक दिवस कंठत होते.
अशाच परिस्थितीत वडिलांची पणजीला बदली झाली आणि आम्ही कालापूरला कालापूर – ताळगाव आडमार्गावर बिर्‍हाड थाटले. शेजारी सुप्रसिद्ध हौशी रंगभूमीवरील नट कै. जयकृष्ण भाटीकर होते. सिनारी कुटुंबीय जवळच राहात होते. तो ऐतिहासिक दिवस उगवला. आम्ही सकाळी उठून मुखमार्जन करण्याच्या तयारीत होतो आणि आकाशात दोन तीन विमाने कर्कश आवाज करीत घरघरत होती. त्यानंतर आला बॉम्ब फेकल्याचा आवाज. लगेच कुठून तरी बातमी आली की बांबोळीचे दळणवळण केंद्र विमानातून बॉम्ब फेकून उद्ध्वस्त केले गेले. भाटीकर पती पत्नीचा जीव टांगणीला, कारण त्यांचा मुलगा रेडिओवर इंजिनिअरच्या हुद्द्यावर होता व त्याला रात्रपाळी होती. बॉम्बफेक बांबोळी की आल्तिनो रेडिओ केंद्रावर असा संभ्रम झाल्याने भाटीकर दांपत्याचा मूक आक्रोश साहजिकच! एकच हाहाःकार !! मुरगाव बंदर व दोनापावल जेटीच्या बाजूने बॉम्बचे आवाज ऐकू येत होते. आवाजाने आमच्या खिडक्यांची तावदाने थरथरत होती. नंतर कानावर आले की, भारतीय लढाऊ युद्धनौका ‘विक्रांत’ ही गोव्याच्या सागरी हद्दीत दाखल झाली होती. शेवटी ‘अल्बुकर्क’चा प्रतिकार तोकडा पडला व बॉम्बफेकीचे आवाज बंद झाले. रस्त्यावर जिथे तिथे ‘जयहिंद’चे नारे दिले जात होते. हिरव्या गणवेषातील भारतीय सैनिक ट्रक, जीप व इतर अवजड वाहनांनी गस्त घालत असल्याचे चित्र दिसत होते. लोक घोळक्या – घोळक्याने रस्त्यावर फिरत होते. उत्साह ओसंडून चालला होता. स्वप्न साकार झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता.
गोवा मुक्तीनंतरचा भारतीय प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी १९६२ रोजी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सारे पणजी शहर तिरंगामय झालेहहो मुक्तीनंतरचा हा पहिलावहिला राष्ट्रीय सोहळा कोवळ्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेला. नंतर विधानसभा, लोकसभा निवडणुका झाल्या. मगो. युगो हे स्थानिक पक्ष निवडून आले. कॉंग्रेसचा धुव्वा उडाला. ओपिनियन पोल संघराज्याच्या बाजूने लागला. परत झालेल्या निवडणुकीत स्थानिक पक्षच निवडून आले. कालांतराने राष्ट्रीय पक्षात विलीन झाले. गोवेकरांनी घटकराज्य आल्याचे पाहिले, मगो, कॉंग्रेस, भाजपा प्रणित राजवटी पाहिल्या. स्वातंत्र्यामुळे अधिकार आले, निर्णयप्रक्रिया वेगवान झाली, तसा प्रगतीचा वारू जोमाने दौडू लागला. या घोडदौडीमुळे किती पल्ला गाठला, किती धुरळा उडाला आणि काय पायदळी तुडवले याचा ठोकताळा मांडला तर आजवर आपण काय कमावले व कायम गमावले त्याची प्रचीती येईल. गोव्याला आता पुनर्मुक्तीची गरज आहे. हे आव्हान कोण स्वीकारणार?