असामान्य निवडणुकीचा असामान्य निकाल

0
135
  • देवेश कु. कडकडे

दर वेळी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाजपाला राजकीय अस्पृश्य मानणार्‍या पक्षांचे दिवस आता संपले आहेत. त्यांना मतदारांनी कठोर इशारा दिला आहे. त्यामुळे अशा विषयांवर आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. कारण यावेळी भाजपाला देशातील सर्व भागांतून आणि सर्व थरांतून मतदान केल्याचे समोर येत आहे..

सध्या देशात निवडणुकींच्या निकालांबद्दल गल्लीबोळांतून चर्चा चालू आहे. दावे – प्रतिदावे होत आहेत. या असामान्य निवडणुकीचा तितकाच असामान्य निकाल लागल्याने अनेक राजकीय विश्‍लेषकांची झोप उडाली आहे, कारण निवडणुकीपूर्वी सगळीकडे महागठबंधनाची चर्चा चालू असल्याने मोदी केवळ २५० च्या आसपास जागा जिंकतील असाच सर्वांचा अंदाज होता. नोटबंदी, जीएसटी, राफेलचा घोटाळा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी मोदी हटावची मोहीम जोरदार राबवली होती, परंतु त्यांचा बार तसा फुसका ठरला. मतदार प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांना धडा शिकवत असतो. २०१४ साली त्यांनी आघाडी युग संपले असे संकेत दिले होते. या आधी ८ निवडणुकांनंतर अनेक पक्षांनी मिळून मिलीजुली सरकारे बनवली. मात्र २०१४ सालानंतर केंद्रात आणि राज्यात एखादा अपवाद वगळता एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले.

या पाच वर्षांच्या काळात मोदी सरकारवर विविध क्षेत्रांतून टीकेचा भडीमार झाला. अल्पसंख्यांकांचे विरोधी, उद्योगपतींना झुकते माप देऊन शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारे, दलितांवर अत्याचारांना प्रोत्साहन देणारे, सैनिकांच्या नावावर मते मागणारे सरकार अशी कठोर टीका झाली. परदेशी वृत्तपत्र माध्यमांतून मोदी हे देशाला तोडणारे नेते आहेत अशीही जहरी टीका झाली. मात्र भारतीय मतदारांनी मोदी हे देशाला तोडणारे नाहीत, तर जोडणारे नेते आहेत, सर्व भारतीयांना एका सूत्रात जोडणारे सत्ताचालक आहेत हेच या निवडणुकीमधून दाखवले आहे, कारण यावेळी भाजपाचा विजय संपूर्ण भारताच्या भागातून झालेला असून हा विजय राष्ट्रवाद, देशाची सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांना मिळालेला भरघोस प्रतिसाद आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍यांना मिळालेली ही सणसणीत चपराक आहे. धर्मनिरपेक्ष भूमिका मांडणार्‍यांनी त्याचा इतका कहर केला की केवळ हिंदू धर्मावर टीका म्हणजेच धर्मनिरपेक्षता असते का, अशी चर्चा होऊ लागली. भाजपाला यावेळी १४ हून अधिक राज्यांत ५० टक्क्यांहून जास्त मते मिळाली, तसेच ज्या २२४ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली, त्यातील १२१ जागा या उत्तर भारतातील आहेत. या निवडणुकीत भाजपाला प. बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. केरळ, तेलंगणमध्ये जागा कमी मिळाल्या तरी मतांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे भाजप हा आता पूर्णपणे राष्ट्रीय पक्ष झाला आहे, हे आता विरोधी पक्षांना मान्य करावेच लागेल.

मोदींनी केवळ पत्रकार परिषद न घेता थेट ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ही निवडणूक केवळ मोदींच्या अवतीभवती फिरत राहिली. २०१४ साली आणि यावेळी मोदींसाठी तेच मुद्दे आणि तेच विरोधक होते. ही निवडणूक १९७१ सालची पुनरावृत्ती आहे, कारण त्यावेळी इंदिरा गांधींनी ‘गरीबी हटाव’ ही मोहीम प्रचारातून मांडली होती, तर विरोधी पक्षांनी ‘इंदिरा हटाव’ अशी भूमिका घेतली होती, मात्र त्यावेळी मतदारांनी विरोधी पक्षाला हटवले आणि इंदिराजींना स्पष्ट बहुमत दिले. यावेळी विरोधी पक्षांनी मोदींच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेच्या विरोधात ‘मोदी हटाव’ हा एककलमी कार्यक्रम राबवला. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते आपला उद्देश केवळ मोदींना सत्तेवरून खेचणे हाच असल्याचे प्रचारात सांगत होते. कोणत्याही परिस्थितीत मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधींनी पंतप्रधानपदाच्या दाव्यातून माघार घेतल्याचे कॉंग्रेस पक्षाने जाहीर केले. कारण नसताना ‘मोदी हटाव’ हा नारा देणार्‍या चंद्राबाबू नायडू, ममता, मायावती, अखिलेश यादव, केजरीवाल यांना मतदारांनी चांगलाच मार दिला. एका वर्षाआधी चंद्राबाबू यांनी सत्तेतून बाहेर पडत भाजपची साथ सोडली, तेव्हा त्यांनी एका तर्‍हेची राजकीय आत्महत्या केली होती, कारण आता त्यांच्या पक्षाचे नाव सांगणारा लोकसभेत एकही खासदार नाही. या रणधुमाळीत फक्त एकच नेते अजिंक्य राहिले, ते ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. त्यांनी मोदीला साथ दिली नाही आणि विरोधी पक्षाच्या मागेही गेले नाहीत किंवा आघाडीत सामील होऊन पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहिली नाहीत. त्यांनी आपले राज्य राखण्यास महत्त्व दिले. जर तुम्ही कोणाच्या विरोधात नसाल तरी अगदी कसोटीची वेळ आली तरी तटस्थ राहणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी मोदींना केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. ते भाजपा आणि कॉंग्रेस गठबंधन या दोघांपासून अलिप्त राहिले. म्हणून या त्सुनामीत नवीन पटनाईक एकटेच तरले. एका व्यक्तीचा द्वेष करून केवळ सूडबुद्धीने पेटलेल्या लोकांना सामान्य मतदार त्यांना कधीच साथ देत नाही, तर सहानुभूतीच्या मागे जातो. डावे कम्युनिस्ट सध्या तरी राजकीय पटलावरून नामशेष झाल्याचे दिसत आहे. प्रियांका गांधींचा राजकारणातील प्रवेश यावेळी मतदारांना फारसा रुचलेला दिसत नाही. उलट महागठबंधनाची मते यामुळे विभागल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांना मोठा धक्का बसला. मुस्लिम महिलांनी तीन तलाकाच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतदान केल्याचा संभव आहे. अर्थात हे अजून स्पष्ट झालेले नाही तर तो एक अभ्यासाचा विषय आहे.

या देशात विकास, रोजगार यावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर केवळ धर्म, जातीच्या नावाने मतांचे धु्रवीकरण करून निवडणुका जिंकता येतात, हा विरोधी पक्षाचा भ्रम यावेळी पुरता ढासळला. सपा-बसपाचे गठबंधन केवळ जातीनिहाय रणनितीवर अवलंबून असते. धर्म, जात, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण यावर राजकारण करणार्‍यांच्या विश्‍वासावर पाणी फेरले गेले. विकास, राष्ट्रवाद, जनसामान्यांच्या हिताच्या योजना, यावर निवडणुका जिंकता येतात हे मोदींनी दाखवून दिले. देशातील नव्या ९ कोटी मतदारांना धर्मनिरपेक्षता, धर्म,जातीपातीचे राजकारण यावर मुळीच सोयरसुतक नाही. त्यांना विकास, राष्ट्रवाद ह मुद्दे पटतात. आजचा युवा वर्ग इंटरनेट वापरणारा मतदार आहे. तो स्वतःची मते विचार करून मांडतो. तो सुशिक्षित आहे. त्याला कोणही भ्रमित करू शकत नाही. दर वेळी धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाजपाला राजकीय अस्पृश्य मानणार्‍या पक्षांचे दिवस आता संपले आहेत. त्यांना मतदारांनी कठोर इशारा दिला आहे. त्यामुळे अशा विषयांवर आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. कारण यावेळी भाजपाला देशातील सर्व भागांतून आणि सर्व थरांतून मतदान केल्याचे समोर येत आहे. भाजपाची मते ६ टक्क्यांनी वाढली आहेत. विरोधी पक्षाचे ९ भूतपूर्व मुख्यमंत्री यावेळी पराभूत झाले. भाजपाच्या या यशाचे श्रेय सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजनांना आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रश्‍नावर देशाला कठोर निर्णय घेणारा नेता हवा असेही देशवासियांनी यावेळी अधोरेखित केले आहे.

आज एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने घोडेबाजाराला स्थान राहिले नाही. हे यश त्यांच्या डोक्यात न जाता पाय जमिनीवर ठेवून जनतेच्या अपेक्षांना आणि विश्‍वासाला सार्थ ठरेल, असे काम करेल अशी आशा बाळगूया, तरच भविष्यात आपला भारत एक सशक्त देश म्हणून उभा राहील.