असली, नकली उत्पादने शोधून काढणारे सॉफ्टवेअर आणणार : गावडे

0
89

ब्रँडेड उत्पादनातील असली आणि नकली उत्पादने शोधून काढणारे अत्याधुनिक सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.

पाटो पणजी येथील संस्कृती भवन सभागृहात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात मंत्री गावडे बोलत होते. यावेळी नागरी पुरवठा खात्याचे सचिव रूपेश कुमार ठाकूर, राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे, दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप सावईकर, गंगाराम मोरजकर, रोलंड मार्टीन, भारत गॅसचे संदीप पवार, नागरी पुरवठा खात्याचे संचालक महेश खोजुर्वेकर, साहाय्यक संचालक फ्रॅकलीन फेर्राव, अमिता नायक सलत्री उपस्थित होते.

ग्राहकांची ब्रँडेड उत्पादनाच्या खरेदीमध्ये फसवणूक होत आहे. मोठ मोठ्या मॉलमध्ये सुध्दा ब्रँडेड उत्पादनाच्या नावाखाली नकली उत्पादनाची विक्री होत आहे. ग्राहक ब्रँडेड उत्पादनातील असली व नकली उत्पादन ओळखू शकत नाहीत. ब्रँडेड उत्पादनातील असली व नकली उत्पादन ओळखणारे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हे तंत्रज्ञान खरेदी करण्याचा विचार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. आजच्या डिजिटल मार्केटींगच्या जमान्यात ग्राहकांना खरेदीच्यावेळी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ग्राहक जागृतीबाबत शालेय, महाविद्यालयातून पातळीवर जागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. या कार्यक्रमात रूपेश ठाकूर, रोलंड मार्टीन, निवृत्त न्यायमूत्ती बाक्रे, निवृत्त न्यायमूर्ती सावईकर यांनी मार्गदर्शन केले. नागरी पुरवठा खात्याच्या सीटीझन चार्टरचे प्रकाशन मंत्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रेशन दुकानांत
५ कि.चा गॅस सिलिंडर
राज्यातील स्वस्त धान्य दुकानात ५ किलो गॅस सिलिंडर विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. गॅस कंपन्यांच्या साहाय्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा गॅस सिलिंडर व्यावसायिक दराने विक्री केला जाणार आहे, अशी माहिती संचालक खोजुर्वेकर यांनी दिली.