असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः…

0
274

– प्रा. रमेश सप्रे
अर्जुन व कृष्ण यांच्यातलं नातं अतिशय मधुर आहे. अर्जुनाकडून ते भक्त-भगवंत असं आहे. तर भगवंत अर्जुनाला सखाच मानतात. सख्यभक्तीचं उदाहरण म्हणजे श्रीकृष्णार्जुन! परस्पर सख्य भावानं जोडलं गेल्यामुळे ‘श्रीकृष्णार्जुन’ असा जेव्हा उल्लेख होतो त्यावेळी श्रीकृष्ण आणि अर्जुन; श्रीकृष्णाचा अर्जुन (नि अर्जुनाचा कृष्ण). तसंच श्रीकृष्णच अर्जुन नि अर्जुनच श्रीकृष्ण असे अनेक अर्थ होतात. अन् विविध प्रसंगातून हे सर्व अर्थ व्यक्त होत असतात.गीतेतही श्रीकृष्णार्जुन यांच्यातील नात्याला तसेच त्यांच्यातील गीतासंवादाला अनेक भावनांचे पदर आहेत. याचा सर्वाधिक प्रभाव दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या संजयावर पडलाय. म्हणूनच गीतेच्या शेवटी न राहवून तो आंधळ्या धृतराष्ट्रास सांगतोय, ‘तो अमृतमधुर असा श्रीकृष्णार्जुनांमधला संवाद आठवून पुनःपुन्हा रोमांच उभे राहताहेत’.
अर्जुनानं अगदी पोटातून (केवळ ओठातून नव्हे) अनेक प्रश्‍न विचारलेयत अन् त्याला आपल्या हृदयातून (केवळ डोक्यातून नव्हेत) अशी उत्तरं भगवंतानं दिलीयत.
मनाच्या चंचलतेबद्दलचा नि मनावर नियंत्रण मिळवण्यातल्या अडचणींसंबंधीचा प्रश्‍न असाच आर्त नि उत्कट आहे- ‘चंचल, घुसळून उसळी मारणार्‍या (प्रमाथी) बलवान अन् हट्टी जिद्दी मनाला आवरायचं कसं?’
या प्रश्‍नाला तितकंच उत्स्फूर्त नि प्रभावी उत्तर भगवंतानं दिलंय- ‘अभ्यास नि वैराग्य यांनी मनाला निश्चित आवरता येतं’. इतकंच नाही तर भगवंत पुढे म्हणतात – ‘मनाला जर वश करता आलं नाही (असंयतात्मना) तर ध्यानयोग किंवा गीतेत सहाव्या अध्यायाच्या शेवटी म्हटलंय त्याप्रमाणे आत्मसंयोग शक्यच नाही’. ज्यावेळी भगवंताला स्पष्ट शब्दात काहीतरी सिद्धांत किंवा सूत्र सांगायचं असतं तेव्हा तो ‘इति मे मतः’ किंवा ‘इति मे मतिः’ असे शब्द वापरतो. ‘असं माझं मत आहे तर असं माझं निश्चित, विचार करून बनलेलं मत (मति) आहे’.
आणखीही एक पद्धती आहे जी आपलं विधान(म्हणणं) पटवून द्यायची एक प्रभावी युक्ती आहे. अन्वय – व्यतिरेक (थिसिस – अँटीथिसिस) उदा. एकी (ऐक्य)मध्ये आपला उद्धार आहे तर बेकीमध्ये (फाटाफुटीत) आपला अधःपात (विनाश) आहे. ‘युनाईटेड वुई स्टँड, डिव्हायडेड वुई फॉल्!’ अर्जुनाच्या महत्त्वाच्या प्रश्‍नाला भगवंतानं असंच अन्वय-व्यतिरेक पद्धतीनं उत्तर दिलंय.
– मनावर नियंत्रण न आणणार्‍याला (असंयतात्मना) ध्यान (आत्मसंयम) योग अवघड आहे. पण स्वाधीन, नियंत्रित मनाच्या व्यक्तीला तो प्राप्त करणं सोपं आहे (अवाप्तुम् शक्यः) … अति मे मतिः म्हणजे असं माझं ठाम, अनुभवाअंती बनलेलं मत आहे.
आता प्रश्‍न असा आहे, की असा अभ्यास कसा करायचा नि असं वैराग्य कसं मिळवायचं?
यापूर्वी आपण अभ्यास करणार्‍या नि वैराग्यवृत्तीच्या निरनिराळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींची नावं पाहिलीयत. आता हे साधन करण्याचे काही उपाय बघू या.
* अभ्यास ः या शब्दात दोन छोटे पण खूप महत्त्वाचे शब्द आहेत. अभि आणि आस! अभि म्हणजे शुभ, कल्याणकारी अन् आस म्हणजे तळमळ, ध्यास. चांगल्या, कल्याणकारी कल्पना सत्यात साकारण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी अभ्यास हवा. तो शाळा-कॉलेजातील परीक्षांसाठीच नको तर इतर जीवनावश्यक किंवा जीवन समृद्ध बनवणार्‍या कौशल्यांच्या प्राप्तीसाठी अभ्यास हा लागतोच. पोहणं, सायकल चालवणं, इतर अनेक गोष्टी ज्या जीवन अधिक सुलभ, संपन्न, इतरांना प्रेरणादायी बनवतात. त्या सार्‍या चुटकीसरशी, क्षणात किंवा अल्प प्रयत्नानं साध्य होत नाहीत. म्हणून अभ्यास हवा. म्हणजे पुन्हा पुन्हा अक्षरं गिरवली पाहिजेत, कविता पाठ केल्या पाहिजेत, गणितातली – विज्ञानातली सूत्रं, समीकरणं (फॉर्म्युले नि इक्वेशन्स) पुन्हा पुन्हा वाचून, पाठ करून लक्षात ठेवून त्यांचं उपयोजन (ऍप्लिकेशन) जमलं पाहिजे.
पण साधा स्वयंपाक करणं; बागकाम-शेती करणं; कपडे शिवणं किंवा वेशभूषा करणं; सौंदर्य वृद्धीसाठी जी दुकानं (ब्यूटी पार्लर्स) असतात त्यातही अभ्यास हवाच असतो.
* अभ्यासासाठी अर्थातच हवी मनाची स्थिरता नि एकाग्रता. त्यासाठी ध्यानयोग, असं गीतेचं म्हणजेच भगवान श्रीगोपालकृष्णाचं सांगणं आहे. अभ्यासासाठी मनाची पूर्वतयारी आवश्यक आहे. कोणती पूर्वतयारी?
एकलव्यानं धनुर्विद्येच्या अभ्यासासाठी जी पूर्वतयारी केली होती ती आदर्श होती. सर्वप्रथम त्याच्या मनात धनुर्विद्या शिकण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण झाली. द्रोणाचार्यांच्या आश्रमातील पांडवकौरवादी विद्यार्थ्यांचा अभ्यास तो कुतुहलानं पाहत होता. त्याची तळमळ त्याला स्वस्थ बसू देई ना. धाडस करून गुरू द्रोणाचार्यांकडे जाऊन त्यानं त्यांचा शिष्य बनण्याची इच्छा व्यक्तही केली. पण तो राजघराण्यातील क्षत्रिय नव्हता. त्यामुळे आश्रमात राहून विद्या मिळवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नव्हती.
आता एकलव्यानं पुढची पायरी गाठली. डोकं गुरू द्रोणाचार्यांच्या पायावर ठेवलं असतानाच त्यानं मनोमन निर्धार केला- धनुर्विद्या शिकण्याचा! आपल्या मानलेल्या गुरूंना आनखशिख म्हणजे पायांपासून मस्तकापर्यंत नीट पाहून घेतलं. त्या न्याहाळण्यातून किंवा निरीक्षणातून गुरूंची चैतन्यप्रतिमा प्रत्यक्षापेक्षा अधिक उत्कटतेनं त्याच्या मनावर कोरली गेली. अरण्यात येऊन एकांतात त्या मनातल्या प्रतिमेनुसार मातीची प्रतिमा तयार केली गुरू द्रोणाचार्यांची! त्या प्रतिमेला, नव्हे तिच्यातील जिवंत सद्गुरूंना अनन्यशरण जाऊन अभ्यास केला. आतूनच सारी प्रेरणा, मार्गदर्शन मिळत गेलं. एक प्रकारचा हा विकास होता अंतर्दृष्टीचा नि यातून प्रकट झालं अंतर्ज्ञान! आता त्याच्या धनुर्विद्येच्या कौशल्यविकासाला मर्यादा नव्हती. पूर्णत्वाकडे जाण्याचा त्याचा अभ्यास, ध्यास नि प्रवास सुरू झाला होता.
ध्येयाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ध्येय हा मुक्काम (मंजिल, डेस्टिनेशन) नाहीये तर तो एक अखंड चालू राहणारा प्रवास आहे. पूर्णत्वाची प्राप्ती होईपर्यंत हा प्रवास चालू राहणार आहे. वाटेत अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत. अनेक दिव्ये पार करावी लागणार आहेत. पण तोही अभ्यासाचाच भाग असणार आहे. भुंकणार्‍या कुत्र्याच्या तोंडात त्याला अजिबात जखमा वा वेदना होऊ न देता मारलेले उभे बाण हे त्याचा अभ्यास पूर्णत्वाकडे झेपावत असल्याची खूण होती. त्याचप्रसंगी प्रत्यक्ष गुरू द्रोणाचार्यांनी त्याची घेतलेली सत्त्वपरीक्षा, मागितलेली गुरूदक्षिणा आणि अतिशय समर्पण भावनेनं एकलव्यानं धनुर्विद्येत सर्वांत महत्त्वाचा व आवश्यक असलेला पण सद्गुरूंनी दक्षिणारूपात मागितल्यामुळे उत्स्फूर्तपणे दिलेला आपला उजव्या हाताचा अंगठा… या सर्व घटना एकलव्याच्या जीवनातील कळसाकडे नेणार्‍या होत्या.. अभ्यासाची पूर्णता दाखवणार्‍या होत्या.. स्वतः एकलव्याला कुशल धनुर्धरापेक्षाही महान् बनवणार्‍या होत्या.
एकलव्याच्या अभ्यासाचा हा खरोखर कळसबिंदू (क्लायमॅक्स) होता. एकलव्याच्या या सविस्तर वर्णन केलेल्या धन्यकृतार्थ जीवनात अभ्यासाच्या सर्व पैलूंचं दर्शन होतं. बाहेरचा अभ्यास म्हणजे त्यानं निरनिराळ्या दिशांना, निरनिराळ्या कोनातून, निरनिराळ्या गतीनं मारलेले असंख्य बाण हा होता. ती त्यानं रात्रंदिवस दीर्घकाल केलेली तपश्‍चर्याच होती. पण याच्या जोडीला आतला अभ्यासही होता जो अधिक महत्त्वाचा होता. यात ज्ञान मिळवण्याची अनावर इच्छा, कुतुहल, तळमळ, आर्तता, उत्कटता, श्रद्धा, शरणागती, समर्पण, अथक प्रयत्न, ध्येयावर कायम स्थिर असलेली (फोकस्ड) दृष्टी, विद्या मिळवण्याचा निर्धार, गुरुंवर अथांग विश्‍वास नि अपार श्रद्धा या सार्‍या गुणांचं नाव आहे एकलव्य. या नावातच एकतानता, एकाकारता, एकरूपता, एकजीवता नि एकात्मता या पैलूंचं दर्शन होतं. एकाग्रता, एकचित्तता असल्याशिवाय हे शक्य नाही. हे शब्द अर्थ समजायला जरी अवघड वाटले तरी त्यांच्यातला भाव समजायला सोपा आहे. हा भाव म्हणजे एकलव्य. जसा गोकुळातील गोपींचा जिवंत भाव म्हणजेच श्रीकृष्ण होता. एकलव्य पुरस्कार देताना किंवा एकलव्य अध्यापनवर्ग सुरू करताना केवळ कौशल्य-विकास नव्हे तर व्यक्तिमत्त्वाचा ‘गुणविकास’ नि चारित्र्याचा ‘भावविकास’ या दोन्ही पैलूंकडे लक्ष द्यायला हवं. या एका उदाहरणात भगवंतांना अपेक्षित असलेल्या अभ्यासविषयक सर्व पैलूंची झलक पाहायला मिळते. असो.
मन आवरण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण आणून ते एकाग्र बनवण्यासाठी आवश्यक असलेली भगवंतांनी दुसरी गोष्ट सांगितलीय – वैराग्य!
मनाची एकाग्रता काय अर्जुनाकडे कमी होती? उगीच का त्यानं यापूर्वी विद्यार्थी असताना घेतलेला तो पक्ष्याच्या डोळ्याचा वेध; द्रौपदी स्वयंवरप्रसंगी जिंकलेला तो अवघड पण (परीक्षा); विराट राजाच्या गायी पळवल्यानंतर बृहन्नडा (धड ना पुरुष, धड ना स्त्री अशा) अवस्थेत सार्‍या कौरववीरांना पराभूत करण्याचा केलेला पराक्रम या सार्‍या गोष्टी एकाग्रतेशिवाय नि प्रदीर्घ अभ्यासाशिवाय साध्य झाल्या नव्हत्या. पण याशिवाय अर्जुनाकडे आणखी एक आवश्यक गुण होता तो म्हणजे वैराग्य!
अनेक प्रसंगी कळत-नकळत अगदी सहजपणे अर्जुनाच्या वैराग्याची परीक्षा झाली होती. स्वतःच्या बळावर जिंकलेली तेजस्विनी द्रौपदी, आईनं असावधपणे म्हटलं तरीही सर्व भावांची होऊ दिली. विरक्त असल्याशिवाय हे शक्यच नव्हते.
इंद्राच्या राजसभेत बेभान होऊन नृत्य करणारी उर्वशी रात्रीच्या एकांतात आपलं सर्वस्व अर्जुनाला समर्पण करण्यासाठी आली असताना कुरुवंशाची मूळ स्त्री (महामाता उर्वशी, पुरुरव्याची पत्नी) म्हणून तिला शरणपूर्वक केलेला नमस्कार! ही साधी कृती नव्हती. अत्यंत मोहाचा व सहज साधता येणारा तो क्षण होता. पण अर्जुनाची विरागी वृत्ती सावध होती. सजग, जिवंत होती. अर्जुनाला सर्वांत श्रेष्ठ धनुर्धारी या वैराग्यवृत्तीनंच बनवलं.
एकाग्रता, गुरूला पूर्ण शरणागती, अक्षरशः रात्रंदिवस धनुर्विद्येला पूर्णत्व आणण्यासाठी केलेला अभ्यास या गोष्टी अर्जुनानं केव्हाच आत्मसात केल्या होत्या. अन् म्हणूनच बाणानं अंधारातही लक्ष्याचा वेध (शब्दवेध) घेण्याची कला नि ब्रह्मास्त्राचा प्रयोग नि उपसंहार (अस्त्रे परत घेणं) अशा गोष्टी फक्त अर्जुनालाच प्राप्त झाल्या होत्या. गुरूवर्य द्रोणाचार्यांनी आपला पुत्र अश्‍वत्थामा यालासुद्धा इतकी धनुर्विद्या शिकवली नव्हती.
संन्यास, वैराग्य, मोक्ष किंवा मुक्ती याबद्दल आपल्या मनात समज कमी नि गैरसमजच अधिक आहेत. फार नकारात्मक, गूढगंभीर अर्थ आपण या शब्दांचे आपल्या मनात घट्ट केले आहेत. संन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग, वैराग्य म्हणजे सर्व भोगांचा नि उपभोगांचा त्याग अशा कल्पना अत्यंत चुकीचा नि अशास्त्रीय आहेत.
संसार सोडून अरण्यात जाणं हा संन्यासही नव्हे नि वैराग्यही नव्हे. वैराग्य ही केवळ कृती नाही तर ती कृतीला प्रेरणा देणारी वृत्ती (ऍटिट्यूड) आहे. या वैराग्यभावनेत ‘मुक्तसंग समाचर|’ या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे संग, आसक्ती (ऍटॅचमेंट) यांचा त्याग आहे. ‘भोगासंगे कुठे न गुंतावे’ अशी जीवनशैली म्हणजे वैराग्य. यात संसार, प्रपंच, सुखोपभोग, नातेसंबंध, कर्तव्य यापैकी कशाचाच त्याग नाहीये तर त्यातच बुडून डुंबत राहणं, त्यात लालसा, आसक्ती निर्माण होऊन त्या भोगांना चिकटून राहणं, मनाच्या पातळीवरही देहभोग व वासनांचाच संग टिकवणं या गोष्टी त्याज्य मानल्या आहेत.
प्रपंच नि परमार्थ या दोन्ही जीवनध्येयात अभ्यास नि वैराग्य यांना पर्याय नाही. कारण मनोजयाशिवाय जीवनाचं कल्याण नि इतरांची सेवा (परोपकार नव्हे तर ‘शिवभावे जीवसेवा’) अशक्य आहे. प्रपंच नि परमार्थ किंवा संसार आणि अध्यात्म या केवळ एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हेत नि एकाच रथाची दोन चाकंही नव्हेत तर ते आहेत एकाच जीवनपक्ष्याचे दोन पंख! अभ्यास नि वैराग्य हे मनोनिग्रह (मनावर नियंत्रण), मनोजय, मनःशांती यासाठी आवश्यक असे दोन पंख आहेत. एका पंखानं उडणार्‍या पक्ष्याची कल्पनाही करता येत नाही. या दोन्ही गुणात दर्शन होतं ते गरुडाच्या अभ्यासाचं नि हंसाच्या वैराग्याचं! चातकाच्या अनन्यतेचं, चकोराच्या एकनिष्ठेचं नि चक्रवाकाच्या आर्ततेचं, अगदी स्वतःच्या राखेतून पुनरुज्जीवित होणार्‍या फिनिक्सच्या दुर्दम्य जिद्दीचं अन् हो, संसारातील आसक्तीच्या भूमीला स्पर्शही न करणार्‍या नि अखंड आध्यात्मिक आनंदाच्या अवकाशात विहार करत असलेल्या त्या होमा पक्ष्याच्या चिरंतन मुक्तीचंही…!