अष्टपैलूंत बेन स्टोक्स नंबर १

0
109

इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स याने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याला दुसर्‍या स्थानी ढकलत आयसीसी कसोटी अष्टपैलूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या विंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात संयमी १७६ व दुसर्‍या डावात केवळ ५७ चेंडू ७८ धावा कुटलेल्याचे फळ त्याला मिळाले आहे. फलंदाजांच्या यादीत त्याने वैयक्तिक सर्वोत्तम तिसरे स्थान मिळविले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ पहिल्या व भारताचा विराट कोहली दुसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख मार्नस लाबुशेन व स्टोक्स यांचे समान ८२७ गुण झाले आहेत.

दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी स्टोक्स अष्टपैलूंच्या यादीत जेसन होल्डरपेक्षा ५४ गुणांनी मागे होता. कसोटी संपल्यानंतर मात्र स्टोक्स ३८ गुणांनी पुढे आहे. इंग्लंडने ११३ धावांनी जिंकलेल्या या कसोटीत स्टोक्सने ३ बळीदेखील घेतले होते. स्टोक्सच्या झंझावातामुळे सलग १८ महिने अव्वल स्थान भूषवल्यानंतर होल्डरची दुसर्‍या स्थानी घसरण झाली. २००६ साली मे महिन्यात अँडी फ्लिटंॉफ पहिल्या स्थानावर होता. यानंतर पहिला क्रमांक मिळवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. एप्रिल २०१८ साली दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने ५१७ गुण मिळवले होते. यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक ४९७ गुण घेणारा स्टोक्स हा पहिलाच खेळाडू ठरला.

इंग्लंडच्या अन्य खेळाडूंनादेखील फायदा झाला आहे. पहिल्या डावात कुर्मगतीने १२० धावा जमवलेल्या डॉमनिक सिबली याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ३५वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर गोलंदाजांमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने ‘टॉप १०’मध्ये पुनरागमन केले आहे. ब्रॉडने दोन्ही डावांत प्रत्येकी ३ बळी घेतले होते. ब्रॉड्‌च्या टॉप १०मधील प्रवेशामुळे जेम्स अँडरसन याची ११व्या स्थानी घसरण झाली आहे.

वेस्ट इंडीजचा विचार केल्यास दोन्ही डावात अर्धशतकी वेस ओलांडलेल्या शमार ब्रूक्स याने कारकिर्दीतील सर्वोत्तम ४५वे स्थान आपल्या नावे केले आहे. अष्टपैलू रॉस्टन चेज याने गोलंदाजांमध्ये दोन क्रमांकांची सुधारणा करत ३१वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास फलंदाजी विभागात चेतेश्‍वर पुजारा (-१, आठवे स्थान) व अजिंक्य रहाणे (-१, दहावे स्थान) यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचे सातवे स्थान कायम आहे.

दुसर्‍या कसोटीतील विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत तिसरे स्थान मिळवता आले आहे. विंडीजवरील दुसर्‍या कसोटीतील विजयामुळे इंग्लंडने ४० गुणांची कमाई केली. त्यामुळे त्यांना न्यूझीलंडला मागे टाकता आले. या क्रमवारीत भारताचा संघ पहिल्या व ऑस्ट्रेलियाचा दुसर्‍या स्थानावर आहे.