अशी ही फसवाफसवी!

0
225
  •  सौ. अमिता नायक-सलत्री

आपल्या समाजात पसरलेला एक व्यथित करणारा रोग म्हणजे बनवाबनवी आणि फसवाफसवी. दिवसेंदिवस या सामाजिक रोगाची भयानकता अधिकच उग्र होत चालली आहे आणि आपण गोमंतकीय अगदी सहजपणे या ठकबाजीला बळी पडत आहोत. प्रिय ग्राहक हो, आता तरी जागे व्हा आणि फसलाच असाल तर विनामूल्य सेवेसाठी ग्राहक समेट समितीकडे या… जिथे तुम्हाला काहीही कोर्ट फी न भरता न्याय मिळेल. लक्षात ठेवा, ही सरकारी सेवा आहे!

चंगळवाद-भोगवाद-अश्‍लीलता-बीभत्सता… अशा या कित्येक अमानवी गोष्टींबरोबरच आपल्या समाजात पसरलेला एक व्यथित करणारा रोग म्हणजे बनवाबनवी आणि फसवाफसवी. दिवसेंदिवस या सामाजिक रोगाची भयानकता अधिकच उग्र होत चालली आहे आणि अगदी सहजपणे आपण गोमंतकीयही या ठकबाजीला बळी पडत आहोत.

‘जागो ग्राहक, जागो!’सारख्या जाहिराती आपण विविध प्रसारमाध्यमांतून वाचतो, ऐकतो, पाहतो. ग्राहकाला जागरुक करण्याचे जे काम सार्‍या जगभर चाललेले आहे, त्याचे खरे श्रेय जाते अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांना. त्यांनी १५ मार्च १९६२ या दिवशी ग्राहक हक्कांची अंमलबजावणी केली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून १५ मार्च हा दिवस सार्‍या जगभर ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क चळवळीमध्ये ऐक्य आणि दृढता राखली जावी, हा त्यामागचा उद्देश आहे. २४ डिसेंबर १९८६ रोजी हा ग्राहक हक्क कायदा आपल्या देशामध्ये मंजूर केला गेला. म्हणून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आपल्या गोव्यात या फसवाफसवीच्या गोष्टी ऐकता असे दिसून येते की, या ठकबाजीला आपले गोवेकरही फशी पडत आहेत. याला तीन कारणे आहेत- १) आपण कुणावरही सहजपणे विश्‍वास ठेवतो, २) आपण फसवले जात आहोत याची आपल्याला जाणीवच होत नाही, ३) तसे कुणी आपल्या लक्षात आणून दिले तर आपण म्हणतो ‘असू दे, जाऊ दे आता, कोण लागेल त्यांच्या मागे? आणि कोण जाणार कोर्टात त्यांच्याविरुद्ध भांडायला… माझे नशीबच ते. जाऊ दे, गेले पैसे ते गेले…’ वगैरे वगैरे.
या आपल्या अति मवाळ स्वभावामुळे आज कित्येक गोमंतकीय वेगवेगळ्या प्रकारे फसवले जात आहेत. ‘एकदाच पैसे भरा, तीन वर्षांनी तुम्हाला ते दुप्पट होऊन मिळतील’असे सांगत कित्येक एजंट आपल्याला भुलवितात. आपल्यालाही झटपट पैशांचा मोह होतो. आपण मग त्यात पैसे गुंतवतो. एक वर्षानंतर दुसरा हप्ता भरा, असे सांगणारे पत्र येते. पुढील दोन वर्षांत हेच सांगणारी आणखी दोन पत्रे येतात. आपण अगदी चक्रावून जातो. अरे, त्या एजंटने एकदाच पैसे भरा असे सांगितले होते. मग हे काय? आपण याचा जाब विचारायला त्या एजंटला जेव्हा फोन करतो तेव्हा तो फोन दुसराच कोणीतरी घेऊन आपल्याला सांगतो, ‘‘सर, त्या एजंटने आमची नोकरी सोडली.’’ अरे देवा! म्हणत आपण अगदी मुकाट्याने राहिलेले हप्ते भरतो. नाही भरले तर आपण आधी जे भरले होते, ते मिळविण्यासाठी आपल्याला कित्येक खेपा तर घालाव्या लागतातच, शिवाय कितीतरी वर्षांनंतर आपल्याला ते पैसे मिळतात. अर्थात आपण भरलेल्या रकमेतले केवळ अर्धेच पैसे आपल्याला मिळालेले असतात.

अशाच एका फायनान्स कंपनीतल्या एका ठकसेनाने तीन सिव्हिल इंजिनिअर्सना फसवले. ही अगदी अलीकडची घटना. मेरशी येथील तीन तरुण मित्र. तिघानीही सिव्हिल इंजिनिअरिंग केली. त्यांचा विचार झाला की आपण तिघेही मिळून प्रारंभी एक छोटंसं बांधकाम करायला सुरुवात करू. तिघेही गरीब कुटुंबातले. त्यामुळे कुठल्याही बँकेतून कर्ज घेणे त्यांना भाग होते. तो विचार चालू असतानाच त्यातील एकाला बड्या फायनान्स कंपनीतून फोन आला- ‘तुम्ही आधी प्रत्येकी फक्त ५० हजार रुपये भरा, आम्ही तुम्हाला प्रत्येकी पाच लाख रुपये कर्ज देऊ.’ त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याने ही गोष्ट आपल्या दोन्ही मित्रांना सांगितली. लगेचच त्या तिघांनी आपल्या कुटुंबीयांकडून पैसे जमविले आणि ते या कंपनीत गेले. तो ठकसेन त्यांच्याशी इतका गोडगोड आणि आर्जवी वागला की नकळत या तिघांनीही तो सांगेल तसे कित्येक फॉर्मस्‌वर पटापट सह्या केल्या. एका महिन्याच्या आत तुम्हाला प्रत्येकी पाच लाख रुपये दिले जातील असेही त्याने सांगितले.

एक महिना, दोन महिने, तीन महिने गेले तरी या तिघांना त्या कंपनीकडून काहीच पत्र वा फोन वगैरे आला नाही. बँकेत जाऊन बघतात तर त्यांच्या अकाऊंटवर पैसेही जमा झालेले नव्हते. मग ते तिघेही त्या कंपनीत गेले आणि वरील प्रकाराची त्यांनी विचारणा केली. ओ गॉड…! त्यांना अगदी धक्कादायक माहिती मिळाली. एक तर त्या ठकसेनाने तिथली नोकरी सोडली होती. कंपनीच्या नियमाप्रमाणे नोकरी सोडून गेल्यावर कारवाई करण्यास त्यांना मनाई होती. शिवाय त्या ठकसेनाने या तिघांचीही प्रत्येकी नऊ लाखांची पॉलिसी केली होती. प्रत्येक वर्षी त्यांनी पन्नास हजार रुपयांचा प्रिमियम भरायचा, असे त्यांनी १८ वर्षांपर्यंत भरत राहायचे. १८ वर्षांनंतर त्यांना त्यांनी भरलेले नऊ लाख आणि त्यावर त्यांना काय मिळेल तो बोनस, अशा त्यांच्या ‘टर्मस् ऍण्ड कंडिशन्स’ आणि या कॉन्ट्रेक्टवर त्यांनी सह्या केल्या होत्या. आधी भरलेले पन्नास हजार रुपये हा त्यांचा पहिला हप्ता होता. तिघांनीही त्या कॉन्ट्रेक्टवर सह्या केल्याने ग्राहक मंचकडे ही तक्रार येऊनही त्यांना काहीच न्याय मिळू शकला नाही.

कर्ज काढून आणि कुटुंबीयांकडून घेऊन प्रथम भरलेले पन्नास हजार रुपयेही असेच हवेत तरंगत राहतील. कारण एक तर १८ वर्षांपर्यंत पन्नास हजार भरत राहायचे आणि मध्येच बंद केले तर सगळेच मुसळ केरात! शिवाय त्याला कंपनी जबाबदारी नाही. या टर्मस् व कंडिशन्स जाणून न घेता अगदी आंधळेपणाने त्या तिघांनी सह्या केल्या आणि अशा प्रकारे ते तिघेही सुशिक्षित तरुण अगदी सहजपणे फसले गेले!
गोव्यातील एका वर्तमानपत्रात आंध्र प्रदेशची एक जाहिरात आली. तीस हजार रुपये ‘अमुक’ बँकेत भरा आणि द्रोण तयार करण्याची मिशनरी मिळवा. तयार केलेले द्रोण तीच कंपनी विकत घेईल, असेही त्यात लिहिले गेले होते. पेडणे येथील एका गरीब घराण्यातील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवकाने आपल्या आईच्या सोन्याच्या बांगड्या विकून तेवढे पैसे बँकेत भरले. एका महिन्यानंतर ती मशीनरी त्यांना पाठविली गेली. पण तीस हजार रुपये किमतीची अशी ती मशीनरी वाटत नव्हती. त्यानंतर द्रोणसाठी लागणारा कच्चा माल तुम्हाला पाठवितो, त्यासाठी अजून तीस हजार रुपये बँकेत भरा, शिवाय द्रोण कसे तयार करावे, यासाठी आम्ही तिथे एक ट्रेनर पाठवू, त्याचा प्रवासखर्च म्हणून १२ हजार रुपये बँकेत भरा, असेही त्या युवकाला सांगण्यात आले. त्या बिचार्‍या युवकाने कशीबशी पैशांची जुळवाजुळव करून ते सर्व पैसे त्या बँकेमार्फत त्या कंपनीकडे पाठविले. पण एवढे सगळे पैसे मिळाल्यावरही त्या कंपनीने या युवकाला कच्चा माल तर पाठवला नाहीच, ट्रेनरलाही पाठविले नाही अन् आपले फोन नंबरही बदलले. त्यामुळे या युवकाला त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होत गेले. ग्राहक मंचाकडे ही तक्रार आलेली आहे. पोलिस खात्याच्या मदतीने वरील ठकसेनांना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आम्हा सुशिक्षित स्त्रियांनाही स्वस्तातल्या मस्त साड्या मिळविण्याचा मोह होतोच होतो. वर्तमानपत्रातली जाहिरात वाचून वास्को येथील एका महिलेने तसे पैसे भरले. साड्यांबरोबर एक पर्स आणि अजून एक भेटवस्तू त्यांनी गिफ्ट म्हणून देण्याचे जाहीर केले होते. सगळे पैसे भरल्यावर या महिलेला त्या तीनही साड्या कुरियरने आल्या. उघडून बघते तर त्यांचा दर्जा एवढा हलका होता की भरलेल्या रकमेचा पाव हिस्सासुद्धा त्यांची रक्कम भरत नव्हती. आणि पाण्यात घातल्यावर त्यांची काय दशा होईल याचीही कल्पना करवत नव्हती. शिवाय त्यांनी जाहीर केलेले कुठलेच गिफ्ट त्यांनी साड्यांसोबत पाठवले नव्हते. या तक्रारीची दखल ग्राहक समेट समितीने घेतली आहे. त्यासंबंधी चौकशी चालू आहे.

अलीकडच्या काळात ‘भुलभुलैय्या’ करणार्‍या विविध प्रदर्शनांना आपल्या गोव्यात ऊतच आलेला दिसून येतो. अशाच एका प्रदर्शनात एका सुशिक्षित आणि धनाढ्य माणसाने एक ‘लेग-मसाजर’ विकत घेतला. अलीकडे आपल्या जवळच्या माणसांकडून असे पाय चेपून घेणे वगैरे पूर्णपणे थांबले आहे. ते मायेचे बंधच तुटले आहेत. त्यामुळे ही सारी कामे मशिनद्वारे करण्याचे फॅड आलेले आहे. तर असा हा महागडा लेग-मसाजर त्या व्यक्तीने विकत घेतला आणि केवळ एक आठवडा त्याने तो वापरला. लगेचच त्यात काहीतरी बिघाड झाला आणि तो मसाजर बंद पडला. एवढा शिकलेला असूनही त्या ग्राहकाने त्या मशिनवाल्याकडून वॉरंटी-गॅरंटी कार्ड घेतले नव्हते. उलट ‘जर हे मशिन बिघडले तर त्यात विकणार्‍याला दोषी धरू नये’ अशा स्टेटमेंटवर न वाचता त्याने सहीही केली होती. एकदा प्रदर्शन संपले की कुठे तुम्ही त्या विकणार्‍यांना ट्रेस करू शकता! शिवाय ग्राहक हक्क कायद्याप्रमाणे जर तुम्ही मॅन्युअल न वाचता त्यावर सह्या केल्या तर ग्राहक समेट समिती तुम्हाला कशी काय न्याय मिळवून देऊ शकते बरे!

विविध एअरवेज आणि टूर्स-ट्रॅव्हल्सविरुद्धही ग्राहक समेट समितीकडे तक्रारी येतच असतात. एकजण विमान प्रवास करणार होता. काही विशिष्ट कारणांमुळे विमान उड्डाण झालेच नाही. त्याबाबतीत प्रवाशांना काहीच कळविले गेले नाही. उड्डाण विलंब आणि उड्डाण रद्द ही दोन्ही कारणे प्रवाशांना नीट सांगितलीच गेली नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय तर झालीच, शिवाय त्यांचे पैसेही अजून परत केले गेलेले नाहीत.
विविध बिल्डर्स, वाहन कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या, शेअर्स वगैरेंच्या तक्रारीसुद्धा ग्राहक समितीकडे येतच असतात. एकरकमी पैसे देऊन विकत घेतलेले विविध कंपन्यांचे मोबाईल फोन धड चालत नाहीत याच्याच सुमारे शंभर तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत. फ्रीज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप, टीव्ही यासंबंधीही कित्येक तक्रारी ग्राहक समेट समितीकडे आलेल्या आहेत. शिवाय वीज खाते, बी.एस.एन.एल., पी.डब्ल्यू.डी., विविध बँका, सहकारी बँका यांच्याविरुद्धही कित्येक तक्रारी आहेत. विविध वेबसाईटवर पैसे भरून फसलेले लोकही येथे येतच असतात.

एका चॅनलवर आपल्या एका आवडत्या हिरोने केलेली ‘अमुक यंत्र घ्या आणि भरपूर पैसे घरात जमा करा’- ही जाहिरात बघून डिचोली येथील एका गरीब तरुणाने पस्तीस हजार रुपये देऊन ते यंत्र खरेदी केले. यंत्राच्या मॅन्युअलवर लिहिल्याप्रमाणे १५ दिवसपर्यंत त्याची त्याने पूजाही केली. पण घरचे दारिद्य्र काही संपेना. शेवटी आपण फसवलो गेलो आहोत, याची त्याला जाणीव झाली. ही तक्रार ग्राहक समेट समितीकडे आली. लगेचच पोलिस खात्याची मदत घेऊन त्या विक्रेत्याला पकडून ग्राहक समेट समितीने त्या गरीब युवकाला त्याने खर्च केलेले पस्तीस हजार रुपये, शिवाय दोन हजार रुपये नुकसान भरपाईही मिळवून दिली.

आपण बँकेत पैसे ठेवतो. पूर्वीचे विश्‍वासाचे दिवस आता संपले आहेत. आपले अकाऊंट, पैसे वेळोवेळी तपासत जा. असाच एक तरुण जेव्हा आपला अकाऊंट अपडेट करायला गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याच्या नावे एक कर्ज घेतले गेले आहे आणि दर महिन्याला त्याच्या अकाऊंटमधले पैसे कापले जात आहेत.
ग्राहक समेट समितीने पूर्ण चौकशी केली असता त्याची बनावट पण अत्यंत हुबेहुब अशी सही करून त्याला को-बॉरोअर (श्युअरिटी) बनवून एकाने त्या बँकेतून कर्ज घेतले आणि त्याने कर्ज न फेडल्याने याचे पैसे बँक कापू लागली. अर्थात या सर्वाची कसून चौकशी झाली आणि चार बँक ऑफिसर्सना सस्पेंड करण्यात आले. शिवाय त्या तरुण तक्रारदाराचे सर्व पैसे (मूळ रक्कम, त्यावरील त्या काळाचे व्याज आणि नुकसान भरपाई) त्याच्या खात्यावर जमा झाले.

विविध सौंदर्यप्रसाधनांमध्येसुद्धा लबाडी केली जात आहे. अशाच एका लबाड विक्रेतीने वेबसाईटवर एक जाहिरात दिली. ‘काळे आहात? पूर्ण गोरे करतो!’ कुडतरी येथील एक बिचारी काळीसावळी मुलगी या जाहिरातीला बळी पडली. एक लाख रुपये भरून तिने त्यांच्याकडून वेगवेगळे ब्युटीप्रॉडक्टस् विकत घेतले. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसार तिने आपल्या चेहर्‍यावर ७५ इंजेक्शन्सही टोचून घेतली. त्याचा इतका चिचित्र आणि भयंकर परिणाम झाला की तिचा चेहरा पूर्णपणे जळून गेला. ग्राहक समेट समितीने व्यवस्थित सापळा रचून भटकळ येथील त्या बाईला पकडले आणि तिच्याकडून नुकसानभरपाई आणि व्याजासकट सर्व पैसे वसूल करून घेतले. ब्युटीपार्लर्सबाबतीतही अशा अनेक तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत.

एका नौसैनिकाबाबत घडलेली ही फसवणुकीची घटना. तो आपल्या पगाराचा काही हिस्सा आईवडिलांसाठी दर महिन्याला पाठवत होता. त्याचा पगार एका विशिष्ट सरकारी बँकेत जमा व्हायचा. मात्र काही दिवसांनी पैसे काढताना या नौसैनिकाला आढळून आले की त्याचे पैसे कोणीतरी त्याच्या खात्यातून काढतो आहे. त्याने जेव्हा ही गोष्ट बँक अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली, त्यावर बँक अधिकार्‍यांनी ‘तू पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तक्रार दाखल कर’ अशी त्याला सूचना केली. खरे तर त्याची चौकशी बँक अधिकार्‍यानीच करणे आवश्यक होते. पण त्यांनी ती टाळली आणि हा बिचारा सैनिक पोलिसस्थानकात तक्रार द्यायला गेला.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांनीही त्याची दखल घेतली नाही. शेवटी हा सैनिक ग्राहक मंचाकडे आला. त्याने केलेल्या तक्रारीची प्रत जेव्हा ग्राहकमंचाकडून बँकेला आणि पोलीस खात्याला गेली, आणि यावर उत्तर द्या म्हणून सांगितले गेले, तेव्हा बँक आणि पोलीस खात्याच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले.

ग्राहक समेट समितीने काही दिवसांतच त्याचे ते सारे पैसे, त्यावरील व्याज बँकेला द्यायला भाग तर पाडलेच, शिवाय त्या सैनिकाला जो मानसिक त्रास झाला, त्याला कितीतरी फेर्‍या बँकेत, पोलिस स्थानकात आणि ग्राहक मंचच्या कार्यालयात घालाव्या लागल्या, पैसे वेळेवर घरी न गेल्याने त्याच्या कुटुंबीयांची जी वाताहत झाली, या सर्व कारणांबद्दल त्याला नुकसान भरपाईही ग्राहक समेट समितीने मिळवून दिली. या गोष्टीला निष्काळजीपणा म्हणायचा, कसले फिक्सिंग म्हणायचे, की बिचार्‍या सैनिकाचे दुर्देव म्हणायचे? काहीही असो, त्या सैनिकाने सतत या प्रकरणाचा पाठपुरावा चालू ठेवला म्हणून आम्ही त्याचे मनःपूर्वक अभिनंदनही केले.
तर अशी ही शेकडो उदाहरणे आहेत या बनवाबनवीची, फसवाफसवीची! प्रिय ग्राहक हो, आता तरी जागे व्हा आणि फसलाच असाल तर विनामूल्य सेवेसाठी ग्राहक समेट समितीकडे या… जिथे तुम्हाला काहीही कोर्ट फी न भरता न्याय मिळेल. लक्षात ठेवा, ही सरकारी सेवा आहे!