‘अवती-भवती’ सुखी माणसाचे जीन्स व टी-शर्ट

0
270
  • अंजली आमोणकर

… त्यांना एकवेळ कुटुंबाच्या जबाबदार्‍यांचा विसर पडेल पण समाजकल्याणाचा कधीही नाही. भौतिक सुखांपेक्षा समाजाकरता करत असलेल्या वणवणीत ते सुख शोधतात. एखादा वसा घेतल्याप्रमाणे, पिढ्यान्‌पिढ्या समाजकल्याणाकरता झोकून देतात. त्यातच परमोच्च सुख मानतात. तेव्हा त्या सुखाला काय म्हणावं??

लहानपणी अभ्यासक्रमाच्या पुस्तकात एका राजाची गोष्ट होती जो ‘सुखी माणसाचा सदरा’ शोधण्याकरता वणवण फिरतो. सदा आनंदी राहणार्‍या व्यक्तिलादेखील- ‘काय, सुखी माणसाचा सदरा सापडलाय की काय!’- असं म्हटलं जातं. दिवसागणिक सुखाची परिभाषाच बदलली आहे. जे पूर्वी सुख होतं, ते आता ‘चैन’ सदरात मोडतं आणि पूर्वी केवळ ‘गरज’ म्हणून असायचं ते आताच्या दिवसात मिळून गेलं, तर ते ‘सुख’ होऊन जातं. नातवंडांना सांभाळणारे आजी-आजोबा, पूर्वी मायेची गरज म्हणून बघितले जायचे. आता तसे आजी-आजोबा मिळाले तर इतरेजन लगेच ‘तुमची काय बुवा ‘चैन’ आहे’ असं म्हणून टाकतात. सुटीच्या दिवशी कुटुंबातल्या लोकांना वेळ देणं ही सुखाची व्याख्या होती. पण आता कुटुंबाकरता थोडासा वेळ काढणं ही ‘कंपल्सरी जबरदस्ती’ होऊन बसलीय.

काळाप्रमाणे वेळ बदलते व वेळेप्रमाणे माणूस… त्यामुळे पूर्वीच्या सर्व संकल्पना मोडीत निघाल्यास, खरोखरीच काहीच वावगे नाही. कारण सुखाची व्याख्यापण काळानुसार बदलणार हे ओघाने आलेच. शेवटी सुख तरी काय, मानण्यावर आहे. एकाचं सुख जर मार्च महिन्यातली बॅलन्स-शीट टॅली झाली हे असेल तर दुसर्‍याचे सुख तामिलनाडूमध्ये अमकातमका पक्ष जिंकला हे असू शकते. ज्याला आनंदी व सुखीच रहायचंय त्याला बारक्यातली बारकी गोष्ट सुद्धा सुखी करू शकते व ज्यांना कायम तोंड उतरवून दुःखीच रहायचंय त्यांना … व्हॉट्‌सऍपच्या माझ्या फोटोला कमी लाईक्‌स मिळाले व अमक्या-तमक्याच्या फोटोला जास्त लाईक्‌स मिळाले… हे कारणही पुरू शकतं. बाकी उरलेला वेळ जीवनातल्या मोठ्या-मोठ्या कुरबुरी असतातच.

देवापुढे हात जोडले की प्रत्येक माणूस आधी मागतो ते सुख! मग प्रत्येकाची सुखाची संकल्पना वेगवेगळी का असेना! नुसती संकल्पनाच नाही तर या सुखाला चक्क जाती असतात. तुमचा विश्‍वास बसणार नाही. पण चक्क माणसाने तयार केलेल्या जातींप्रमाणेच जाती असतात!! दुसर्‍याच्या सुखात सुख मानणारी व देवाकडे दुसर्‍याकरताच सुख मागणारी ही सगळ्यांत उच्च जात, उच्च वर्ण, उच्च गोत्र व उच्च गण!! त्यानंतर स्वतःकरता सुख शोधणारे आपण सगळे मध्यम जातीत पडतो व दुसर्‍याच्या दुःखात-त्रासात-हलाखीत सुख शोधणारे ते सर्व नीच जातीत पडतात. या जातीत सर्व मत्सरी, क्रूर, नीच, अधम, अत्याचारी, सत्यानाशी (व दहशतवादींपासून पुढे सर्व शिव्या इथे घालाव्यात) वगैरे वगैरे लोक पडतात. यांत एक उप-जातही आहे. सर्व सुखं हात जोडून समोर उभी असताना भलत्याच, संबंध नसलेल्या गोष्टींकरता ओढून-ताणून दुःखी होणार्‍यांची जात. घरात सर्व सुखं असताना, मजेत आयुष्य जात असताना, पॅलेस्टाईनचे पंतप्रधान आपल्या भाषणात असं का म्हणाले?.. नासाच्या अंतरिक्ष- भरार्‍यांपायी प्रदूषणाची वाढती पातळी.. आफ्रिकेच्या जंगलातली मोडतोड किंवा क्युबामध्ये होणारी हिमवादळे… असल्या विषयांवरून अस्वस्थ व दुःखी होणार्‍यांची जात!! अन् कोणाचीही पर्वा न करता केवळ आणि केवळ समाजसेवेत स्वतःला आजन्म वाहून घेणार्‍यांची जात! तिथे त्यांना एकवेळ कुटुंबाच्या जबाबदार्‍यांचा विसर पडेल पण समाजकल्याणाचा कधीही नाही. भौतिक सुखांपेक्षा समाजाकरता करत असलेल्या वणवणीत ते सुख शोधतात.

एखादा वसा घेतल्याप्रमाणे, पिढ्यान्‌पिढ्या समाजकल्याणाकरता झोकून देतात… त्यातच परमोच्च सुख मानतात… तेव्हा त्या सुखाला काय म्हणावं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब आमटे यांच्या कुटुंबाचं देता येईल!! यांचे ‘सदरे’… सुखी माणसांचे सदरे म्हणता येतील का? नाहीतरी आताच्या पिढीत सदरे घालतं कोण? शोधायचं असेल तर सुखी माणसाचा टी-शर्ट व जीन्स पँट शोधायला हवी.
माणूस सुख कशातही शोधू दे… ते कितीही मोठं वा लहान असू दे… अगदी रव्याचा कण सापडल्यावर मिळणारं मुंगीचं कणभर सुख असू दे, नाहीतर मंगळावरच्या अंतराळयानाच्या यशस्वी मोहिमेपायी शास्त्रज्ञांना झालेलं मोठ्ठं सुख असू दे… पण ते इतरांसोबत वाटता आलं पाहिजे. अगदी कितीही व्यक्तिगत असलं तरी… शेवटी देवाबरोबर तरी नक्कीच शेअर करता आलं पाहिजे. सर्वांसमोर ते मिरवायचं की नाही हा ज्याचा-त्याचा खाजगी, आवडीचा वा स्वभावाचा प्रश्न आहे. अर्थात ‘सुख मिरवा’ हे कोणाला सांगावं लागत नाही. पुरुषांना नाही, बालकांना तर नाहीच नाही. पण सुखी प्राण्यांमधल्या उच्च जातीत हा शो-ऑफ नापसंत केला जातो. निर्व्याजपणे समाजसेवा करत रहायची व त्यांतच सुख शोधत रहायचं हेच त्यांचं ब्रीद असतं. दुःख चव्हाट्यावर आणून गळे काढत, त्याची जाहिरात करून सहानुभूती मिळवण्यापेक्षा सुखाची जाहिरात केलेली केव्हाही बरी. बहिणाबाई सांगूनच गेली आहे ना….
‘‘माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबरी टांगलं,
माजं दुक, माजं दुक तळघरात कोंडलं…’’
एक मात्र अगदी खरं की या सुखाच्या हव्यासापोटीच, जगाचं चक्र चालत राहिलं आहे. सुखाकरता कामाची गरज, गरजेपोटी नवेनवे शोध, शोधांपायी आणखी काम, आणखी सुखाचा हव्यास असं हे ‘व्हिशियस सर्कल’ आहे. वाटी आलेल्या आयुष्याच्या तुकड्यातच सुख शोधणार्‍यांच्या जीन्स व टी- शर्टचा शोध घेऊया का?