अवतार बदलला पण ‘दशा’ तीच!

0
195

– लाडोजी परब

नाटक झालं की, सकाळी कलावंत घराच्या दिशेने सुटतो. बायका पोरं वाट बघत असतात. घरी गेल्यावर झोपायला तरी मिळतं? नाही, चला शेतात! दिवसा काबाडकष्ट आणि रात्री कलावंत साकारणे असा त्याचा दिनक्रम. कलेप्रमाणे पैसे मिळतात. दशावतारी कलेला राजाश्रय सोडाच पण राजाचा मान द्या. त्यांची कुटुंबे खंबीरपणे उभी राहतील अशी साथ द्या. दशावतारी कलावंतांच्या जीवनाच्या स्टोरीचा शेवटही भयानक होतो.

रंगभूमीची सेवा करणार्‍या कलावंतांच्या कलेची कदर करणं, हे तुम्हा आम्हा लोकांचे कर्तव्य. कोकणातील दशावतार आज सातासमुद्रापार पोहोचलाय. अवतार बदलला पण ‘दशा’ तीच आहे. परवा गावात एक नाटक होते. दशावतारांतही लोकांना काही हटके हवं असतं. म्हणून दशावतार कंपन्यांनी कथानकामध्ये अध्यात्म आणि ट्रीकसीनची भर घातली. पौराणिक कथांना आध्यात्मिक रूपाची झालर दिली. हा रात्रीचा राजा, दिवसा कामासाठी झुकतो तेव्हा कलावंतांची ही कला त्यांना कुठं नेत आहे, हे दिसून येते.
एका गावात मी नाट्यप्रयोग पाहत होतो. प्रयोग होता, ‘श्री स्वामी समर्थ’ ट्रीकसीनयुक्त. प्रकाशयोजना चांगली होती. मागे पडदे लावले होते. स्वामी समर्थ वारुळातून प्रगट होतात, असा देखावा होता. एका क्षणाला असा प्रसंग आला की, मागचा पडदा पडला. तर पाठीमागे ‘गावातलो बाळगो आणि मायग्या एकमेकांचे मुके घेतानाचा दृश्य’ अरे ह्यो काय चमत्कार? लोकांना वाटले स्वामी समर्थांचाच काही तरी चमत्कार आहे. पण नंतर कळलं पडदा सुटून पडला. मग काय, बाळग्याची भानगड गावासमोर इली.
एका कंपनीने ‘द्रौपदी वस्त्रहरण’ हे नाटक लावले होते. पहिल्यांदाच पांडवांच्या जीवनावर आधारीत हे नाटक पाहायला तोबा गर्दी! शाळेचे ग्राउंड खचाखच भरले. प्रसंग असा होता, द्रौपदीचे वस्त्रहरण होतेय, आणि कृष्ण तिला साड्या पुरवतोय. त्यासाठी पडद्यामागे एक मशीन बसवली होती. पडद्याला भोक पाडून कृष्ण डोकावत होता. व त्याच्या हातातून ती साडी येतेय, असं सुंदर दृश्य होतं. पुन्हा तीच साडी मशीनकडे जात होती. अचानक कथानक सुरू असताना मशीनमध्ये काही तरी बिघाड झाला आणि मशीन जोरात फिरू लागली. झालं असं, साड्या ज्या ठिकाणी जोडल्या होत्या. तिथे एका बाजूने ती तुटली. पुन्हा द्रौपदीकडे साडीच पोहोचेना कृष्णही त्या भोकातून गडप झाला. आणि चक्क द्रौपदीच्या पात्राने नेसलेल्या सर्व साड्या त्या मशीनने ओढून आणल्या. द्रौपदीचं सोडा पण ते पात्र साकारणार्‍याचं खरोखरचं वस्त्रहरण झालं. नाडीच्या चड्डीवर तो व्यासपीठावर! त्याला एवढी लाज झालीय की काही वेळ नाटक बंद ठेवावं लागलं. प्रेक्षकांमध्ये मात्र हशा पिकला.
एका गावात असा प्रसंग आला की देव आणि दानवाचे तुंबळ युद्ध रंगले होते. हातवारे करून ते तलवार फिरवायचे. तबल्यावर जोरदार आणि पेटीवरचे वरचे सूर चांगलेच जुळले. बाकड्यावर उभा राहून राक्षस थयथय नाचत होता. अचानक त्याच्या हातातील तलवार सुटली आणि प्रेक्षकांत बसलेल्या एका वृद्धाच्या डोक्यावर आदळली. भळाभळा रक्त वाहू लागलं. पुढे काय, ते युद्ध थांबलं युद्धाचा नवा अध्याय सुरू झाला. हा झाला विनोदाचा भाग.
दशावतार ही एक पारंपरिक लोककला. देव, दानव, संत, महंत यांच्या कथांवर आधारीत या कलेचं खरं तर जतन व्हायला पाहिजे. पूर्वी जत्रोत्सवात दशावतारी नाटके भरपूर चालायची. गावच्या बायका चटई किंवा चादर पसरून नाटकासाठी आधीच जागा अडवून ठेवायच्या. पण आज तो प्रेक्षक नाही. जत्रोत्सवात नाटके होतात. पण तेवढा जागर होईल, हाच उद्देश. कलावंत जीव ओतून काम करतो. पण त्याची दखल आजच्या प्रशासनाला नाही. कित्येक कलावंत कला साकारत असताना हृदयविकाराच्या झटक्याने गेले. कारण हे नाट्यप्रयोग विशेषत: रात्रीचे उशिरा होत असल्याने निद्रानाश होतोच शिवाय झोपेचं, जेवणाचं पूर्ण वेळापत्रक कोलमडतं. त्यामुळे आरोग्याची मोठी समस्या या कलावंताना आहे. गोव्यात लोककलांची जपणूक करण्यासाठी शासन विशेष योजना राबवते. तालुका स्तरावर कला भवन बांधली आहेत. तशी स्थिती महाराष्ट्रात नाही. दशावतारी नाटके होतात पण कधी मंदिरात, कधी चव्हाट्यावर तर कधी माळरानावर. असे कित्येक युवा कलावंत आज दशावतार साकारतात. प्रशासनाचा मोठा महोत्सव असला की, दशावतारी गणपती दाखवतात. तेवढ्या पुरताच मान.
नाटक झालं की, सकाळी कलावंत घराच्या दिशेने सुटतो. बायका पोरं वाट बघत असतात. घरी गेल्यावर झोपायला तरी मिळतं? नाही, चला शेतात! दिवसा काबाडकष्ट आणि रात्री कलावंत साकारणे असा त्याचा दिनक्रम. कलेप्रमाणे पैसे मिळतात. दशावतारी कलेला राजाश्रय सोडाच पण राजाचा मान द्या. त्यांची कुटुंबे खंबीरपणे उभी राहतील अशी साथ द्या. दशावतारी कलावंतांच्या जीवनाच्या स्टोरीचा शेवटही भयानक होतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. शेवटी काय ‘लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार….अजब तुझे सरकार!’ अशी म्हणण्याची पाळी!
एक दशावतारी कलावंत भेटला, तसा तो चांगला कलाकार. नामवंत दशावतारी कंपन्यांत खलनायकाच्या भूमिका साकारतो. मला म्हणाला, कुठंतरी नोकरी बघ. मी त्याला नोकरीची दिशा दिली खरी पण, या कलावंतांची अशी परिस्थिती बघून, वाईट वाटलं. चेहर्‍यावर रंग चढवल्यावर ज्यांच्या वक्तृत्वाला रंग चढतो, त्यांचे संवाद धारदार तलवारीसारखे तळपतात. बोलण्यातील माधुर्य आणि पौराणिक कथेचा एक आदर्श हे कलावंत घालून देतात. मोबदला कमी मिळाला तरीही त्यांची ही कला अधिक वृद्धिंगत करण्यासाठीच ते प्रयत्नशील असतात. त्या दिवशी गावात एक नाटक होतं. कलावंत रंगून रंगमंचाकडे जात होते. काही वाटेवर थांबायचे. तिथे जात त्या राजाबरोबर फोटो काढून घेत होते. या कलावंतांची कदर रसिकांना आहे. पण त्यांची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे. तोच कलावंत नाटक संपलेलं. लगबगीने रंग फासून घरी जाण्याचा बेत होता. मी तिथं गेलो, विचारलं, काय रे, एवढी घाई का? ‘नाय रे माझा चेडू शिक आसा, तेका डॉक्टरकडे नेवचा आसा’. हाताच्या पोटावर असलेले हे कलावंत! रंग फासल्यावर त्या दिवशीच्या पैसे घेऊन पुन्हा उद्या कुठल्या रंगमंच आपली वाट पाहतोय याचीच जणू प्रतीक्षा! खर्‍या कलावंताला आणखी काय पाहिजे फक्त रंगमंच! धन, प्रतिष्ठेपेक्षा कलेच्या जोरावर तो जगतो.
पूर्वी गॅस बत्तीच्या उजेडातही नाटके व्हायची. रंगमंच नव्हते. बाकडे लावून व्यासपीठ तयार केले जायचे. किंवा कुठल्या तरी झाडाखाली नाट्यप्रयोग व्हायचे. ती परिस्थिती आज नाही, तरीसुद्धा कलावंतांची परवड काही संपलेली नाही. एक बलदंड आत्मविश्‍वास या कलावंतांत आहे. किती काळ या कलेचा वारसा पुढे नेला जातोय, हे येणारा काळच ठरवेल. तबला, पेटी, झांज ही संगीत वाद्ये तर उपहासात्मक शंखासुराला चेतविणारा एक कलाकार नाटकात असतोच. लढाई सुरू झाल्यावर कलावंतांचा जोश काही वेगळाच असतो. पण त्यांच्या आयुष्याची लढाई कधी संपणार? हा एक प्रश्‍नच आहे.