अवघे गरजे पंढरपूर…

0
424
  • रमेश सावईकर

भगवंत नि भक्त कशाचीही तमा, इच्छा, अपेक्षा न बाळगता एकमेकांत हरवून जातात. एकमेकांशी एकरूप होऊन तादात्म्य पावतात. हा ‘सविकल्प समाधी’चा अनुभव आषाढी एकादशीला पंढरपुरी सारे अनुभवतात. ते धन्य होतात. संतांनी विठ्ठलाला आपला मायबाप मानले, तसेच भक्तही मानतात अन् विठ्ठल-विठ्ठल नामाच्या गजराने अवघी नगरी दणाणून जाते.

महाराष्ट्रातील थोर संत मंडळींनी भक्तियोगाचे महत्त्व आपल्या साहित्य रचनेतून सांगितले आहे. संतांचे दैवत म्हणजे पंढरपूरचा श्रीविठ्ठल. या विठ्ठलाप्रति संतांची अपार श्रद्धा. पंढरपूरला तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचे माहात्म्य वाढले ते संतांनी त्या क्षेत्री केलेल्या भक्तीसाधनेमुळे!

रूप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी |
तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ॥
बहुत सुकृताची जोडी | म्हणुनि विठ्ठली आवडी |
सर्व सुखाचे आगरू | बापरखुमादेवीवरू ॥

हा अभंग म्हणजे कलात्मक सौंदर्याचा उत्कृष्ट नमुनाच होय. ‘ज्ञानविज्ञान हरि | नांदे अमुच्या घरी’ .. हे विठ्ठलपर त्यांचे अभंग भागवत धर्मात आजही महत्त्वाचे गणले जातात.
पंढरीचे वाटे अनंत घडती याग |
वैकुंठीचे मार्ग तेणे संगे ॥

अशी ते पंढरीची महती गातात. ‘जाईन गे माय तया पंढरपूरा | भेटेन माहेरा आपुलिया |’ इतक्या जिव्हाळ्याच्या भावना ते पंढरीबद्दल व्यक्त करतात. ज्ञानेश्‍वरांनी सामाजिक एकात्मतेची जाणीव निर्माण केली. जातिभेदरहित विचारांचा पुरस्कार केला. अवघाचि संसार सुखाचा करता यावा यासाठी भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. त्यामुळे सामान्य माणसाला भागवत धर्माच्या शिकवणीतून आत्मविकासाचा मार्ग सापडला. हे कार्य ज्ञानेश्‍वरांनी केले. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया… अशा शब्दांत त्यांच्या भक्तिकार्याचे गुणगान केले जाते.
‘मनाचा मार न करता | आणि इंद्रिया दुःख न देता’… ईश्‍वर आकळिता येतो हे स्वतःच्या उदाहरणाने संत नामदेवांनी दाखवून दिले. ‘देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो |’ .. असा नामदेवांनी दृढ निर्धार केला. ‘सुखाचे हे सुख श्रीहरिमुख’… पाहताच त्यांची तहानभूक हरपते. पंढरीबाबत नामदेवांना मोठा अभिमान आहे. ‘अवघी ही पंढरी सुखाची बोहरी’.. असे सांगून ‘ऐसे तीर्थ कोणी दाखवा गोमटे | जेथे प्रत्यक्ष भेटे परब्रह्म’ असे आवाहन ते करतात.
सावता माळी तर आपला सारा व्यवसाय विठ्ठलमय झाल्याचा आनंद व्यक्त करताना म्हणतात, ‘कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी | लसूण मिरची कोथिंबिरी | अवघा झाला माझा हरी |’
संत एकनाथांनी नामसंकीर्तनाद्वारे हरिदर्शन घडण्यावर भर दिला आहे. ‘हेचि साचे बा साधन | मुखी नाम हृदयी ध्यान |’ श्रीविठ्ठलभक्तीची त्यांची भावना व्यक्त करताना ते म्हणतात, ‘संत भलते याती असो | परी विठ्ठल मनी वसो |’
संसाराची आसक्ती सोडा आणि दीनांचा सोयरा असणार्‍या विठ्ठलाला अनन्यभावे शरण जा.. असे संत तुकोबा सांगतात. विठ्ठल ज्यांचा नाथ, त्यांना कळीकाळाचे भय नाही. ‘आम्ही विठ्ठलाचे वीर | फोडू कळिकाळाचे शीर |’ असा त्यांचा दृढ विश्‍वास आहे. विठ्ठलमूर्तीवर त्यांचे अपार प्रेम आहे. हा विठ्ठलच त्यांचा जीव व भाव आहे. आईबापांचे प्रेम विसरायला लावण्याइतके सामर्थ्य पंढरीत आहे.

ते तीर्थांचे माहेर | सर्व सुखाचे भांडार |
जन्म नाही रे आणिक | तुका म्हणे माझी भाक ॥
काय उणे आम्हा | विठोबाचे पायी |
नाही ऐसे काही | तेथे एक ॥
असा भाव पंढरपुर नि विठ्ठलाबाबत संत तुकाराम व्यक्त करतात.

पंढरपूर नगरीच्या श्रीविठ्ठल दैवताचा महिमा अगाध आहे. या तीर्थक्षेत्री जाऊन त्याचे दर्शन घेतल्याने जीवनातील सारी संकटे दूर होऊन जीवन सुखकर – निरामय होते अन् आपल्याला मोक्षप्राप्ती होते… अशी वैष्णव पंथीय लोकांची दृढ श्रद्धा युगानुयुगे तशीच टिकून आहे… नव्हे, आणखी वृद्धिंगत होत आहे. या पंथाचे श्रीविठ्ठल हे उपास्य दैवत. या पंथाचा भागवत धर्मात अंतर्भाव होतो. संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकोबा आदींनी भागवत धर्माचा पाया घालून तो वाढवला.
‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’.. अशा शब्दांत इतर संतांनी त्यांच्या कार्याची थोरवी गायिली आहे.

वैष्णव आणि शैव पंथीयांना एकत्र आणण्याचे कार्य संतांनी केले. त्यामुळे शिव उपासकही विठ्ठलभक्त बनले. या दोन पंथीयांमधील श्रद्धा-भेद दूर करण्याचे कार्य संत तुकोबांच्या काळात झाले. वारकरी संप्रदायात वैष्णव व शिव पंथीय लोक सामावले गेले. विष्णू अन् शिव हे दोन्ही एकच .. या अर्थीच ‘तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा’ असे संतांनी म्हटले आहे. विठ्ठलभक्त पुंडलिकाने वारकरी पंथाची दिंडी सुरू केली. या पंथाचा उदय इ.स. ११२५ ते ११५० च्या दरम्यान झाला. ही दिंडीची प्रथा आजही एकविसाव्या शतकापर्यंत अखंड चालू आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व गोवा राज्यांतील लाखो वारकरी भक्त संतांच्या पालख्या दिंडीसहीत आषाढी एकादशीला पंढरपूर क्षेत्री एकत्र येतात. सुमारे १२०० पालख्या, पाचहजार दिंड्यांसह ठिकठिकाणांहून पायी चालत पंढरपुरी येतात.

चंद्रभागेतिरी वसलेल्या पंढरपूर नगरात जनसागराचे अगम्य, सुरम्य दर्शन घडते. त्याने डोळ्यांचे पारणे फिटते. भीमा नदीचा प्रवाह या ठिकाणी चंद्रभागाकृत असल्याने तिला चंद्रभागा संबोधले आहे. आषाढात चंद्रभागा दुथडी भरून वाहते. तसेच विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेल्या भक्तांचा महापूर तेथे येतो. संतांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करीत, परमश्रेष्ठ भक्त पुंडलिकाचा ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ असा घोष करीत टाळ-मृदंगाच्या तालावर देहभान विसरून लाखो भाविक नाचतात. ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतूर झालेले असतात.

निरनिराळ्या संतांनी पंढरपूर नगरीचे आणि चंद्रभागा नदीचे महात्म्य आपल्या अभंगातून गायिले आहे. ‘जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले आहे तर चंद्रभागेच्या तीर्थपावित्र्याची महती पुढील शब्दांत वर्णिली आहे… ‘जेव्हा नव्हती गोदा-गंगा, तेव्हा होती चंद्रभागा’. चंद्रभागा विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करीत पुढे वाहते आहे. श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याअगोदर त्याचा परमभक्त पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा वारकरी भक्तमंडळीत व अन्य भक्तांमध्ये आहे. म्हणून ‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा | चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ अशी थोरवी वर्णिली आहे.

पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावरील ‘नामदेवांची पायरी’ म्हणून संबोधिली जाणारी पायरी ही त्यांची समाधी म्हणून ओळखली जाते. संत नामदेवांनी भगवत् म्हणजेच विठ्ठलभक्तीचा महिमा सांगताना भक्ती ही ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ मानली आहे. भक्तिभाव जर ठायी नसेल तर ज्ञान काही उपयोगाचे नाही. सर्व संतमंडळींना ओव्या, अभंग लिहिण्याची स्फूर्ती श्रीविठ्ठलाने दिली. म्हणून संतांनी ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देह विठ्ठल, देवपूजा विठ्ठल!’ असे म्हटले आहे.

आषाढी एकादशीला ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या प्रमुख पालख्या दिंडीसहित वारकरी ठिकठिकाणांहून पायी चालत पंढरपुरी घेऊन येतात. विठ्ठलाच्या दर्शनाची भक्तांना जेवढी आस असते तेवढीच, किंबहुना थोडी जास्तच, आपल्या भक्तांना भेटण्याची आस श्रीविठ्ठलाला लागून राहते. त्याला भक्तांच्या वंदनाची अपेक्षा नसते. श्रीविठ्ठलाचा एवढा विनम्र भाव बघून भक्त अचंबित होतात. हा क्षण म्हणजे भक्तांच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण असतो. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनाचे सार्थक होते. भगवंत नि भक्त कशाचीही तमा, इच्छा, अपेक्षा न बाळगता एकमेकांत हरवून जातात. एकमेकांशी एकरूप होऊन तादात्म्य पावतात. हा ‘सविकल्प समाधी’चा अनुभव आषाढी एकादशीला पंढरपुरी सारे अनुभवतात. ते धन्य होतात. संतांनी विठ्ठलाला आपला मायबाप मानले, तसेच भक्तही मानतात अन् विठ्ठल-विठ्ठल नामाच्या गजराने अवघी नगरी दणाणून जाते.

ज्यांना पंढरपुरी जाणे शक्य होत नाही ते आपल्याच घरी श्रीविठ्ठलाच्या पूजा-उपवासाचे व्रत करून भक्तिभावे त्याची आराधना करतात. साखळीचे विठ्ठलापूर हे गोव्याचे प्रति-पंढरपूर मानले जाते. येथे भक्त पायी प्रवास करीत दिंडीसह येतात. शेकडो वर्षांपूर्वी विठ्ठलभक्त गोव्याहून आषाढीला पंढरपुरी जात असत. त्यांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी साखळी येथील ‘पंढरणी’ स्थळी मूळ विठ्ठल (पांडुरंग – रखुमाई) मूर्तींची स्थापना केली. पुढे नंतर विठ्ठलापूरला मंदिर उभारले. त्यास ५०० वर्षें पूर्ण होऊन पंचशताब्दीही साजरी केली.
गोव्याहून पंढरपूरला वारी करण्याची खंडित पडलेली प्रथा ह.भ.प. उदयबुवा फडके यांनी पुनश्‍च सुरू करण्याला दहा वर्षे होत आलीत. यावर्षी गोव्यातून चार दिंड्या (सुमारे ५५० वारकरी) पायी प्रवास करीत आषाढी एकादशीस पंढरपुरी पोचणार आहेत. ‘ज्याला विठ्ठलाचे दर्शन घडते त्याला वेगळीच अनुभूती येते. ती शब्दबद्ध करणे कठीण. भक्तांनी ती पंढरपुरी जाऊनच अनुभवावी’, असे ह.भ.प. फडके म्हणतात.