अवकाशवीरांसह २०२२ पर्यंत ‘गगनयान’ अवकाश मोहिमेचा संकल्प ः मोदी

0
175

लष्करात महिलांची कायमस्वरूपी भरती आणि २०२२ पर्यंत अवकाशवीरांसह अवकाश मोहीम याबाबतच्या घोषणा ही देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये ठरली. येत्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने मोदी यांचे लाल किल्ल्यावरून झालेले कालचे शेवटचे भाषण आहे. राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या देशाच्या सुपुत्राला किंवा कन्येला अवकाश मोहिमेवर २०२२ पर्यंत पाठवू, असे मोदी म्हणाले. ‘गगनयान’ या नावाने ही मोहीम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘जेव्हा १२५ कोटी लोक आपले लक्ष्य गाठण्यासाठी पुढे सरसावतात त्यावेळी अशक्य असे काही असू शकत नाही. २०१४ साली जेव्हा देशाच्या जनतेने हे सरकार घडवले तेव्हा त्यांनी एकसंधपणे राष्ट्रबांधणीसाठी मार्गक्रमण केले आणि हे काम सुरूच आहे’ असे मोदी यावेळी म्हणाले. आपल्या या भाषणात मोदी यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचा गोषवारा मांडला. आयुषमान भारत आरोग्य योजनेचीही त्यांनी यावेळी घोषणा केली.
‘भारत हा आधी निद्रिस्त हत्तीसारखा होता. मात्र आता भारत जागा होऊन धावू लागला आहे’ अशा शब्दात मोदी यांनी आधीच्या भारतातील राजवटींची खिल्ली उडवली.

आपल्या ८५ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी करदात्यांच्या भूमिकेचे महत्व अधोरेखित केले. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर भरणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. प्रामाणइक करदात्यांमुळे गरिबांना सरकारकडून स्वस्त दरात खाद्यपदार्थांचा पुरवठा करणे शक्य होते, असे ते म्हणाले.
करदात्यांमुळेच जनहिताच्या योजना राबविणे शक्य होते. या योजनांचे पुण्य करदात्यांनाच मिळते याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्यांनंतरच्या ७० वर्षांत जेवढे लोक करप्रक्रियेशी जोडले गेले तेवढेच लोक गेल्या चार वर्षांत करप्रक्रियेशी जोडले गेल्याचा दावा त्यांनी केला. देशात २०१३ मध्ये प्रत्यक्ष कर देणार्‍या लोकांची संख्या ४ कोटी होती. आता ही संख्या सहा कोटी ७५ लाख एवढी झाल्याचे ते म्हणाले.