अल्पसंख्यकांत असुरक्षिततेची भावना वाढतेय ः आर्चबिशप

0
138

मानवाधिकारांवर हल्ले, लोकशाही कमकुवत बनू लागल्याने नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. भारतीय घटनेत फेरफार होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी भीती गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी वार्षिक डायोसेशन संदेशात व्यक्त केली आहे.

आर्चबिशप फेर्रांव यांच्या संदेशाचे राष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटू लागले आहेत. आर्चबिशप यांनी आपल्या संदेशात जगातील व देशातील एकंदर परिस्थितीबाबत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे.

विकासाच्या नावाखाली लोकांची जमीन आणि घरे बळकावली जात आहेत. मानवाधिकारांवर उघडपणे हल्ले होत आहेत. या परिस्थितीत अल्पसंख्याकांत असुरक्षिततेची भावना दृढ होऊ लागली आहे. देशात कायद्याप्रती आदराची भावना लुप्त होऊ लागल्याची चिंता फेर्रांव यांनी व्यक्त केली.

निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदारांची दिशाभूल करतात. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राज्य घटनेप्रती अधिकाधिक जागृती होण्याची गरज आहे. भारतीय घटना धोक्यात आल्याने नागरिकांत असुक्षिततेचे वातावरण पसरणे स्वाभाविक आहे. सामाजिक अन्याय हे दारिद्य्राचे प्रमुख कारण आहे. गोव्यातील ख्रिस्ती बांधवानी हे दारिद्य्र दूर करण्यासाठी आपले योगदान देण्याची गरज आहे, असे या संदेशात म्हटले आहे.

मानवाधिकारांचे हनन होत आहे. लोकांच्या खाण्या-पिण्यापासून ते पुजाअर्चा करण्याच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत. आपल्या अंतरात्म्याला स्मरूनच काम करा. लोकशाहीला मजबूत करा. भ्रष्टाचाराविरोधात लढा द्या, असे संदेशात म्हटले आहे.