अर्धवेळ शिक्षकांचे पर्वरीत धरणे

0
171

सेवेत कायम केले जावे या मागणीसाठी डबल पार्टटाईम शिक्षकांनी पर्वरी येथे सचिवालयाजवळ काल सकाळपासून अर्धा दिवस धरणे धरले. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही सचिवालयाच्या मुख्य फाटकाजवळ धरणे धरले, असे या शिक्षकांनी सांगितले.

या शिक्षकांची एकूण संख्या १०४ एवढी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या सुमारे २३ वर्षांपासून आम्ही उच्च माध्यमिक विद्यालयांत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीचे शिक्षक म्हणून काम करीत आहोत. पण अद्याप आम्हाला पार्टटाईम शिक्षक म्हणून राबवून घेतले जात आहे, असे या शिक्षकांनी नमूद केले. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या व्यावसायिक शिक्षकांना सेवेत वेळोवेळी कायम केले जात असताना आमच्यावर मात्र अन्याय होतो आहे अशी कैफियत त्यांनी मांडली.

कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या शिक्षकांना २००० सालापासून वेळच्या वेळी (५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना) सेवेत कायम केले जाऊ लागलेले असताना आमच्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्षच करण्यात आले असल्याचे या शिक्षकांनी नमूद केले.