अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन उपाय हवेत ः प्रा. वल्लभ

0
100

भारताच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कंपनी कर कमी करण्यासह जी पावले उचललेली आहेत त्याला दीर्घकालीन उपाययोजना म्हणता येणार नाही. कोसळलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेण्यासाठी त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचा दावा काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केला.
या घडीला देशात एकच उद्योग चांगला चालू शकेल आणि तो म्हणजे कुलूप निर्मितीचा. असे नमेविनोदी शैलीत बोलताना वल्लभ म्हणाले. ज्या प्रकारे सध्या केंद्रातील मोदी सरकार काम करीत आहे ते पाहिल्यास देशातील सर्व उद्योगधंद्यांना टाळे ठोकावे लागणार आहे आणि त्यासाठी कुलपांची मागणी वाढणार असल्याचे ते म्हणाले.
कॅगने आपल्या अहवालात आर्थिक तूट ५.८३ टक्के एवढी असल्याचे म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकार आर्थिक तूट ३.३ टक्के एवढीच असल्याचे सांगून फसवणूक करीत असल्याचे वल्लभ यांनी नमूद केले. सध्या देशात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. उद्योगधंदे नुकसानामुळे बंद पडू लागलेले असून त्यामुळे बेरोजगारीत आणखीही भर पडणार असल्याचे ते म्हणाले. बँकांच्या एन्‌पीएन प्रचंड वाढ होऊ लागलेली असून ती धोक्याची घंटा असल्याचे ते म्हणाले.

जी युवा शक्ती मागच्या निवडणुकीत मोदी यांच्या मागे ठामपणे उभी राहिली होती त्या युवा शक्तीला बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याचे वल्लभ यांनी स्पष्ट केले. ज्या बँकांचे दिवाळे निघालेले आहे त्या बँकांचे केवळ विलिनीकरण करून प्रश्‍न सुटणार नसल्याचेही वल्लभ यांनी सांगितले. बँका फायद्यात येण्यासाठी अन्य विविध उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे ते म्हणाले.