अर्थमंत्र्यांनी ठेवले आयकर विवरणांतील विसंगतीवर बोट

0
122

कायद्याचे पालन करीत नियमित आयकर भरणारा मध्यमवर्ग आणि आयकरातून पळवाटा काढणारे धनदांडगे यांचे व्यस्त गणित अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत करांचे प्रमाण खूप कमी असून त्यातही अप्रत्यक्ष करांच्या तुलनेत प्रत्यक्ष करांचे प्रमाण पुरेसे नाही असे सांगताना जेटली म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेचे उत्पन्न आणि क्रयशक्ती यांच्याशी प्रत्यक्ष कर महसुलाचे प्रमाण सुसंगत नाही.

याविषयी अधिक माहिती देताना जेटली म्हणाले की, संघटित रोजगार क्षेत्रामध्ये असलेल्या सुमारे ४.२ कोटी व्यक्तींपैकी केवळ १.७४ कोटी व्यक्ती वेतनातून मिळणार्‍या उत्पन्नावर आयकर विवरणपत्र सादर करतात. याउलट असंघटित क्षेत्रातील वैयक्तिक आस्थापने व छोटे व्यावसायिक या वर्गातही केवळ १.८१ कोटी व्यक्तीच आयकर विवरणपत्र भरतात.
देशात ३१ मार्च २०१४ पर्यंत १३ कोटी ९४ लाख कंपन्या नोंद आहेत, परंतु त्यापैकी ५.९७ लाख कंपन्यांनी सन २०१६-१७ चे विवरणपत्र भरले आहे. त्यातही ज्या ५.९७ लाख कंपन्यांनी विवरणपत्र भरले आहे, त्यापैकी २.७६ लाख कंपन्यांनी शून्य उत्पन्न किंवा तोटा दाखवला आहे.
सन २०१५-१६ मध्ये आयकर विवरणपत्र भरलेल्या ३.७ कोटी व्यक्तींपैकी ९९ लाखांनी अडीच लाखांहून कमी उत्पन्न दाखवले आहे, तर १ कोटी ९५ लाखांनी अडीच ते पाच लाख व ५२ लाख व्यक्तींनी पाच ते दहा लाख उत्पन्न दाखवले आहे. देशातील केवळ २४ लाख व्यक्तींनी दहा लाखांहून अधिक उत्पन्न दाखवल्याचे जेटली म्हणाले. ५० लाखांहून अधिक उत्पन्न दाखवणार्‍या व्यक्तींची संख्या देशात केवळ १ लाख ७२ हजार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, दुसरीकडे, गेल्या पाच वर्षांत एक कोटी पंचवीस लाख कारगाड्या विकल्या गेल्या, तर व्यवसाय वा पर्यटनानिमित्त दोन कोटी नागरिक विदेशांत जाऊन आले या विसंगतीवर जेटली यांनी बोट ठेवले.
भारत हा बव्हंशी करांचे पालन न करणारा समाज असल्याचे जेटली उद्गारले. रोखीच्या व्यवहारांमुळेच या लोकांना करबुडवेगिरी शक्य होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या करबुडवेगिरीचा भार प्रामाणिक करदात्यांवर पडतो असेही जेटली यांनी नमूद केले.