अर्जेंटिनासमोर फ्रान्सचे आव्हान

0
200

>> फिफा विश्‍वचषकाची बाद फेरी आजपासून

रडतखडत बाद फेरीत स्थान मिळविलेला अर्जेंटिना व गटात अपराजित कामगिरी करूनही प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरलेला फ्रान्स यांच्यातील सामन्याने आजपासून फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या ‘अंतिम १६’ फेरीला सुरुवात होत आहे. बाद फेरी असल्याने पराभूत होणार्‍या संघाला घरचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेतील चुरस वाढणार आहे. गट फेरीत एखादी चुक महागात पडली नसेल परंतु, उपउपांत्यपूर्व फेरीत मात्र एखादी लहानशी चूकदेखील संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविण्यास पुरेशी ठरू शकते.

गट फेरीत क्रोएशियाकडून सपाटून मार खावा लागल्यानंतर अर्जेंटिनाच्या आघाडी तसेच बचावफळीतील खेळाडूंच्या लौकिकाला मोठा धक्का बसला होता. अर्जेंटिनाचे फुटबॉलप्रेमीदेखील हा पराभव पचवू शकले नाहीत. या सामन्यात दबावाखाली मेस्सीचा खेळ खालावला होता. नायजेरियाविरुद्ध मात्र मेस्सी लयात आलेला दिसला. मेस्सीने सलामीचा गोल केल्यानंतर मार्कोस रोजो याच्या अप्रतिम गोलमुळे सुदैवाने अर्जेंटिनाच्या संघाला जर्मनीच्या वाटेने जावे लागले नाही. दुसरीकडे फ्रान्सच्या संघाला स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांनी साखळीत अपराजित राहून अपेक्षित खेळ केलेला असला तरी त्यांचा पहिल्या पसंतीचा आघाडीपटू आंतोईन ग्रिझमन याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. डेसचॅम्प्स यांना मात्र गट फेरीतील कामगिरीची चिंता नसून अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शनाचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. फ्रान्सचा संघ सांघिक कामगिरीसाठी ओळखला जातो तर अर्जेंटिनाला मेस्सीवर अवलंबून रहावे लागते. क्लबस्तरावर घवघवीत यश मिळविलेल्या मेस्सीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोेठे यश मिळालेले नाही. त्यामुळे चाहत्यांच्या ओझ्याखाली मेस्सी दबून जातो की त्याचा खेळ अर्जेंटिनाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उरुग्वे-पोर्तुगाल सामना रंगणार
सध्याच्या फिफा विश्‍वचषकातील सर्वोत्तम बचावपटू दिएगो गॉडिन (उरुग्वे) पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो या आपल्या पूर्वीच्या साथीदाराला रोखण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. ३३ वर्षीय रोनाल्डोने सध्याच्या विश्‍वचषकात पोर्तुगालच्या पाच पैकी चार गोलची नोंद केली आहे. त्यामुळे तो भरात आहे. ऍटलेटिको माद्रिदकडून खेळणारा उरुग्वेचा कर्णधार गॉडिन हा आपल्या भक्कम बचावासाठी ओळखला जातो. त्याच्या या कौशल्यामुळे यंदाच्या वर्षी झालेल्या सहाही सामन्यांत उरुग्वेने अजूनपर्यंत गोल स्वीकारलेला नाही. मागील मोसमात क्लब पातळीवर गॉडिनने तब्बल ३४ वेळा आपल्या संघावर गोल होऊ दिलेला नाही. रोनाल्डोच्या खेळण्याच्या शैलीला गॉडिनने जवळून पाहिले आहे. त्यामुळे या द्वयींमधील युद्ध रोमहर्षक ठरणार आहे. याव्यतिरिक्त उरुग्वेकडे लुई सुआरेझ व ऍडिन्सन कावानी यांच्यासारखे दिग्गज आहेत. तर रोनाल्डोला साथ देण्यासाठी बर्नाडो सिल्वा व गोन्झालो गुएडोस ही युवा दुकली आहे.