अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द म्हापशात एफआयआर नोंद

0
97

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काल गोव्यातील निवडणूक अधिकार्‍यांनी म्हापसा पोलिस स्थानकात मतदारांनी कोणत्याही पक्षाकडू लाच घ्यावी अशा आशयाचे वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एफआरआय नोंदविले.

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी याला दुजोरा दिला. भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधी कायद्याखाली हे एफआयआर नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा अहवाल आपण निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. चालू महिन्यातच याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना सदर वादग्रस्त वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. गोव्यातील चार सभांमध्ये केजरीवाल यांनी अशी वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. पाच हजार रुपयांना नकार देऊन दहा हजार रुपयांची मागणी मतदारांनी करावी असेही त्यांनी म्हटल्याचा आरोप आहे. दरम्यान कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी याप्रकरणी केजरीवाल यांच्या अटकेची मागणी केली आहे.
केजरीवालांचे आव्हान
दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही मतदारांना लाच स्वीकारण्याचे आवाहन केल्याबद्दल तक्रार दाखल झाल्याने अरविंद केजरीवाल यांनी आता निवडणूक आयोगाने पर्रीकर यांच्यावर कारवाई करावीच असे आव्हान दिले आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पर्रीकर यांनी उत्तर गोव्यातील चिंबल येथे एका सभेत मतदारांना सांगितले की कोणी तुम्हाला ५०० रुपये देत असल्यास ते घ्या. मात्र मत कमळाला देण्यास विसरू नका.