अयोध्येत राम मंदिराच्या जागी सापडल्या पुरातन मूर्ती

0
157

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना मुभा दिल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरूवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू असून सपाटीकरणासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचप्रमाणे देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तूंंचे अवशेष सापडले आहे.
देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामे ठप्प होती. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना मुभा दिल्यानंतर हे काम सुरू झाले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात येणार्‍या नियोजित ठिकाणी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून हे काम सुरू असून, खांब आणि इतर वस्तू सापडल्या असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले. ते म्हणाले की, जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू केल्यानंतर काही ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष या ठिकाणी सापडले. यात देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश आणि नक्षीदार खांब यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे, अशी माहिती राय यांनी दिली.

शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेबर २०१९ रोजी ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारावे व यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी आयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम सुरू केले आहे.