अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन

0
141
  •  दत्ता भि. नाईक

प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर अयोध्येत भव्य मंदिर उभारणी करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे या समारोहाला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

बळे आगळा राम कोदंडधारी| महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा| प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ असे ज्याचे समर्थ रामदासांनी मनाच्या श्‍लोकांमध्ये वर्णन केले त्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवर अयोध्येत भव्य मंदिर उभारणी करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामुळे या समारोहाला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच वेरावळच्या समुद्रकिनार्‍यावरील भग्न सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झालेले भूमिपूजन तत्कालीन उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाले होते. देशाच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडल्या गेलेल्या सोहळ्यात राजकीयदृष्ट्या अतिमहनीय व्यक्तीच्या सहभागामुळे या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत.

मंदिरमुक्तीसाठी अनेक लढे
सरोवरातून निघालेली म्हणून सरयू किंवा शरयू ही पुण्यसलिला नदी म्हणून ओळखली जाते. तिच्या किनार्‍यावर महाप्रतापी सूर्यवंशीय राजांनी जिला युद्धात हरवता येत नाही अशी अयोध्यानगरी वसवली. या वंशाला ककुत्य, इक्ष्वाकू वा रघुवंश या नावाने ओळखतात. याच राजघराण्यात मनुष्य जीवनाचे व राजघराण्याचे दंडक ठरवणार्‍या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला.

आपले वडील महाराज दशरथ यांचा शब्द राखण्यासाठी राजवैभवाचा त्याग करणारा, माता कैकेयी हीस आपल्या मनात काय आहे ते त्वरित- ‘रामो द्विर्नाभिभाषते’- राम दोनदा बोलत नाही असे स्पष्टपणे सांगणारा, यज्ञसंस्कृतीचा रक्षक असा हा राम या देशातील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात वास करतो याची कल्पना आजच्या अतिविद्वान मंडळीला नसेल, परंतु भारतदेशाची संस्कृती नष्ट करून देशावर कायमचे राज्य स्थापन करण्यासाठी आतुरलेल्या आक्रमकांना याची पूर्ण कल्पना होती. या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आदेशावरून पोर्तुगिजांनी गोवा व केरळमधील मंदिरे पाडली. त्याच सुमारास मोगल आक्रमक क्रूरकर्मा बाबर याच्या आदेशावरून त्याचा सरदार मीर बाकी याने अयोध्येतील राममंदिर उद्ध्वस्त केले व त्या ठिकाणी एक छोटीशी जी इमारत बांधली तिला बाबरी ढाचा किंवा बाबरी मशीद असे म्हणतात. मीर बाकी असेल वा अन्य कुणी, त्याला विरोध झाला नाही असे जे चित्र रंगवले जाते ते पूर्णतः खोटे आहे. राममंदिराच्या रक्षणार्थ मरण पावलेल्या हिंदूंच्या रक्तानेच बाबरी ढाच्याचा चुना कालवला गेला असा इतिहासात उल्लेख आहे.

मंदिराच्या मुक्तीसाठी अनेक लढे झाले, त्यात शिखांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंग यांनी दिलेल्या लढ्याचाही अंतर्भाव आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात हिंदू व मुसलमानांनी एकत्र येऊन राममंदिर मुक्त झाल्याची घोषणाही केली होती. परंतु अखेरीस इंग्रजांचा जय झाल्यामुळे ‘फोडा व झोडा’ या नीतीनुसार त्यांनी पुन्हा हे स्थान मशीद असल्याचे घोषित केले व तेथील महंत व मौलवी या दोघांनाही जाहीरपणे फासावर लटकावले.

आणि कुलूप उघडले गेले
सन १८३६ साली बंगालमधील कामारपुकूर येथे रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला आणि हिंदू समाजाच्या जीवनात एक प्रतिमान परिवर्तन आले. अशा अवतारी पुरुषांचा समाजाची आंतरिक इच्छाशक्ती वाढवण्याच्या कामात फार मोठा वाटा असतो व त्यांच्या जन्मानंतर दीडशे वर्षांनी त्याचा पडताळा येतो असे अनेक सांस्कृतिक विचारवंतांचे मत आहे. १९८४ साली राजधानी दिल्ली येथे धर्मसंसदेचे अधिवेशन ७ व ८ एप्रिल रोजी पार पडले. या अधिवेशनात रामजन्मभूमीच्या आंदोलनाची सूत्रे विविध पंथोपपंथांचे संत, स्वामी, महंत यांनी हाती घेतली. विश्‍व हिंदू परिषदेने सुरू केलेले हे आंदोलन आता अधिक व्यापक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांच्या आग्रहावरून कॉंग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते दाऊ दयाल खन्ना हेही या आंदोलनात उतरले. त्यांच्या पुढाकाराने दि. १८ डिसेंबर १९८५ रोजी श्री रामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली.

त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. सर्वप्रथम रामजन्मभूमीला लावलेले कुलूप उघडावे म्हणून सह्यांची मोहीम राबवली गेली. त्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला व सामान्य माणसापासून उच्च विद्या विभूषितांपर्यंत हा विषय पोहोचला. तत्पूर्वी १५ नोव्हेंबर १९८३ पासून देशाच्या विविध टोकापासून गंगामाता व भारतमाता यांच्या प्रतिमा असलेल्या एकात्मता यात्रांचे आयोजन झाल्यामुळे अवघा हिंदू मानस ढवळून निघाला होता.

२८ जानेवारी १९८६ रोजी फैजाबादच्या न्यायालयात एक आवेदन सादर करण्यात आले. त्यात १९५० पासून रामजन्मभूमीला लावलेले कुलूप कोणाच्या आदेशावरून लावले गेले होते अशी पृच्छा केली होती. त्याचप्रमाणे एक निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त पोलीस अधिकारी व रामजन्मभूमी न्यासाचे प्रतिनिधी जिल्हाधिकार्‍यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटले व त्या वेळेस कुलूप लावण्याचा कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसल्याचे सिद्ध झाले व १ फेब्रुवारी १९८६ रोजी मंदिराचे कुलूप उघडले गेले. एक मार्ग मोकळा झाला.

कोठारी बंधूंचे हौतात्म्य
स्व. राजीव गांधी पंतप्रधान व स्व. नारायण दत्त तिवारी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना देशभरातून रामशिलांचे पूजन करण्यात आले व सर्व विटा अयोध्येला पाठवण्यात आल्या. विवादित ६७.७०३ एकर भूमी सोडून बाहेरच्या बाजूला सरकारने शिलान्यास करण्याची परवानगी दिली. २ नोव्हेंबर १९८९ रोजी शिलापूजन झाले. योगायोगाची गोष्ट म्हणजे या दिवशी ही एक वीट लावली गेली त्याच दिवशी जर्मनीचे अमानुष विभाजन करणार्‍या भिंतीची पहिली वीट काढून टाकली गेली.

३० नोव्हेंबर १९९० ला देवोत्थान एकादशी होती. त्या दिवशी झोपी गेलेले देव उठतात म्हणून अयोध्येत कारसेवेसाठी मुहूर्त ठरवण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष मा. श्री. लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ गुजरातवरून रामरथयात्रेची सुरुवात केली ती ३० नोव्हेंबरपर्यंत अयोध्येत पोहोचणार होती. केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर अधिकारारूढ झालेले व्ही. पी. सिंह यांचे सरकार होते. त्यांच्याच पक्षाचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये अवंतीपूर येथे २२ ऑक्टोबर रोजी अटक करून रथयात्रा बंद पाडली. याचा परिणाम म्हणून भाजपाने व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला व केंद्रात कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर आले. इतके असूनही ३० ऑक्टोबर रोजी कारसेवा करण्याचे ठरले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नहीं मारेगा|’ अशी फुशारकी मारत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लाखोंच्या संख्येने देशभरातून निघालेले स्वयंसेवक वाटेतच अडकले तरीही सर्व बंधने झुगारून काहीजण बाबरी ढाच्यावर चढले. तीन दिवसांनी वातावरण शांत झाल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार केला त्यात कोठारी बंधू व इतर काहीजण मरण पावले.
मध्यंतरी श्रीराम पादुकापूजन, रामज्योत यात्रा, रामनाम जप यज्ञ असे विविध कार्यक्रम वेळोवेळी झाले.

अखेर रामलल्लाचा विजय
नंतरच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात श्री. कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे व केंद्रात स्व. नरसिंह राव यांचे कॉंग्रेसचे सरकार स्थानापन्न झाले. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी गीताजयंती होती. महाभारतीय युद्ध सुरू झाले तो हा दिवस मोक्षदा एकादशी. या दिवशी संतप्त झालेल्या कारसेवकांनी बाबरी ढाचा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी तात्पुरते राममंदिरही उभारले. कारसेवकांवर एकही गोळी झाडणार नाही अशी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी यावेळी घोषणा केली होती व ढाचा उद्ध्वस्त होताच या घटनेची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला. नंतरचा देशाचा राजकीय इतिहास सर्वज्ञात आहे.
उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० रोजी दोन तृतीयांश भूमी राममंदिरास मिळेल असा निकाल दिला. दोन्ही बाजूंना हा निकाल मान्य नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर हा विषय गेला. मध्यंतरी समेटाचे प्रयत्नही झाले. ८ मार्च २०१९ रोजी न्या. फकीर मोहमद इब्राहिम, श्री श्री रविशंकर व ज्येष्ठ वकील श्रीराम पाचू यांची एक समेटासाठी समिती नेमण्यात आली. परंतु यात काहीही निष्पन्न न झाल्याचे त्यांनी १३ जुलै २०१९ रोजी दिलेल्या निष्कर्षात नमूद केले होते.

अखेरीस रोज नियमितपणे खटला चालवला गेला व ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण विवादित जमिनीवर ‘रामलल्ला विराजिन’चा अधिकार मान्य केला व मुसलमान समाजाला मशीद उभारण्याकरिता पाच एकर जमीन अयोध्येजवळील छन्नीपूर या गावात मुक्रर केली. हिंदूंच्या बाजूने निकाल लागल्यास देशात दंगली माजलीत अशा धमक्या देणार्‍या तथाकथित विचारवंतांची यामुळे तोंडे बंद झाली. ५ ऑगस्ट या दिवशी श्रावण कृष्ण अष्टमी आहे. तसा हा फार मोठा इतिहास असलेला मुहूर्त नाही. त्या दिवशी रवी कर्क राशीत, चंद्र धनिष्ठा नक्षत्रात आहे. शोभन योग, तेतिल करण असा हा शुभ दिवस आहे. या प्रसंगी देशभरातील पवित्र नद्यांचे जल व तीर्थक्षेत्रांची माती आणून ती भूमिपूजनाच्या प्रसंगी अर्पण केली जाणार आहे. ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा इत्यादी जनजातीबहुल प्रदेशांतूनही जल व मृत्तिका पाठवली जाणार आहे. तरीही गर्दी टाळून या कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थित केले जाणार आहे.