अम्मा ते चिन्नम्मा

0
72

तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा जयललितांची घनिष्ठ सखी शशिकला नटराजन यांच्याकडे आपसूक चालून आली आहे. भारतीय जनतेच्या मानसिकतेची ही कमाल आहे. जयललितांच्या माघारी त्यांचा कोणी वारस नसल्याने त्यांच्यासमवेत त्यांच्या घरात वास्तव्य असलेल्या शशिकला यांच्याकडेच तामीळनाडूच्या जनतेने वारस म्हणून पाहिले आणि आता अभाअद्रमुकच्या आमदारांनी त्यावर जणू शिक्कामोर्तब केले आहे. या अचंबित करणार्‍या घटनाक्रमाचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे जयललितांनी आपल्या हयातीत आपल्या पक्षामध्ये दुसर्‍या फळीचे नेतृत्व उभे राहू दिलेच नाही. समोर होते ते सगळे भगतगण आणि त्यांच्यापुढे जयललिता स्वतःचे देवीरूप मिरवीत राहिल्या. त्यामुळे मध्यंतरी जेव्हा बेहिशेबी संपत्ती प्रकरणात कर्नाटक न्यायालयाने जयललितांना दोषी धरले आणि त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली, तेव्हा त्यांच्या जागी आले ते आधुनिक भरताचे जणू रूप असलेले पनीरसेल्वन. खिशात जयललितांचा फोटो काय, शपथ घेताना आलेली आसवे काय, पनीरसेल्वन यांनी रामाच्या सिंहासनावर पादुका ठेवून भरताने जसे राज्य चालवले तसे तामीळनाडूचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आणि जयललितांना न्यायालयाचा दिलासा मिळताच त्यांच्या हवालीही केले. जयललितांच्या मृत्यूपश्चात् तात्पुरती व्यवस्था म्हणून पनीरसेल्वन यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद आले तेव्हाही हे इंद्राचे आसन डगमगतेच आहे याची त्यांना आणि तामिळी जनतेलाही पूर्ण जाणीव होती. त्यामुळे शशिकलांभोवती आमदारांचे मोहोळ गोळा होऊ लागताच त्यांनी काय घडते आहे हे ताडले आणि आधीच आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. शशिकला यांना शिंगावर घेण्याची त्यांची प्राज्ञा नव्हतीच. त्यामुळे मुकाट्याने अपमान गिळून त्यांनी ही तडजोड मान्य करून टाकली, इतकेच नव्हे, तर उगवत्या सूर्याला दंडवतही ठोकला!. अभाअद्रमुक पक्ष एकत्र राहायचा असेल तर त्यासाठी जयललितांचा वारसा सांगणारे कोणी नेतृत्व पुढे येणे आवश्यक होतेे. लालूप्रसाद यादवांनी आपण चारा घोटाळ्यात अडकल्यानंतर राबडीदेवीचे नाव पुढे केले होते आणि आपला अस्सल ग्रामीण शहाणपणा दाखवत राबडींनी बिहारचे मुख्यमंत्रिपद निभावून नेले होते. शशिकला यांना राजकीय पार्श्वभूमी काय किंवा पक्षामध्ये त्यांनी आजवर एक तरी राजकीय जबाबदारी पेलली आहे काय, असा सवाल करणार्‍यांनी राबडीदेवीचे उदाहरण विसरू नये. ज्या व्यक्तीला लोकांचा कौल मिळालेला नाही अशी एखादी त्रयस्थ व्यक्ती आगंतुकपणे येऊन सत्तासूत्रे हाती घेते हे अचंबित करणारे जरी असले, तरी तामिळी जनतेच्या एकंदर भावूक मानसिकतेकडे पाहिले तर जनतेला त्यात काही फार खटकेल असे वाटत नाही. एका सुहास्यवदनी स्त्रीची जागा घेण्यास दुसरी सुहास्यवदना आल्यागत तामीळनाडूची जनता अम्माच्या ऐवजी चिन्नम्माच्या भजनी लागेल. शशिकला यांना अडथळा आहे तो केवळ त्यांच्याविरुद्धच्या न्यायालयीन खटल्यांचा. अनेक प्रकरणांत जयललितांबरोबर न्यायालयाने त्यांना दोषीही मानलेले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालय अशाच एका प्रकरणाची प्रलंबित सुनावणी आठवड्याभरात हाती घेणार आहे. दुसरीकडे, अभाअद्रमुकची आणि तामीळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे शशिकला यांच्याकडे जाण्यासंदर्भात नाराजीचे, विरोधाचे आणि टीकेचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. एकेकाळची एक व्हिडिओ कॅसेट विक्रेती केवळ जयललितांचा सहवास लाभला म्हणून आता थेट राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर जाऊन बसते आहे हे अनेक लोकांच्या पचनी पडलेले नाही. फटका बसेल तो अर्थात जनतेला. प्रशासकीय आणि राजकीय बाबी शशिकला कशा हाताळू शकतील याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचे उत्तर जोवर अजून मिळायचे आहे!