अमेरिकेतील ‘रोड शो’चा खर्च पर्यटन खात्याने जाहीर करावा

0
114

>> कॉंग्रेस पक्षाचे पर्यटन मंत्र्यांना आव्हान

पर्यटन खात्याने पर्यटनाच्या प्रचारासाठी अमेरिकेमध्ये आयोजित केलेल्या ‘रोड शो’च्या खर्चाचा तपशील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत काल केली.

पर्यटन खात्याच्या अमेरिकेमध्ये गेलेल्या पथकामध्ये पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या नातेवाइकांचा समावेश होता. या दौर्‍यामध्ये केवळ चार जणांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पर्यटनमंत्री आजगावकर यांच्या नातेवाइकांच्या खर्चाचा भार कुणी उचलला याच्या स्पष्टीकरणासाठी खर्चाचा तपशील जाहीर करण्याची गरज आहे, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार दयानंद सोपटे आणि अमरनाथ पणजीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी अमेरिकेतील दौर्‍यामुळे काहीच फायदा होत नसल्याने दौरे बंद करण्याची सूचना केली होती. पर्यटनमंत्री आजगावकर यांनी अमेरिका दौर्‍यामुळे गोव्याला किती फायदा होऊ शकतो ते जाहीर करावे. तसेच पर्यटन खात्याच्या अमेरिका दौर्‍याचे आयोजन करणार्‍या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आपला एक वर्षाचा हिशोब जनतेसमोर ठेवावा, असे पणजीकर यांनी सांगितले.
पर्यटन खात्यातील अधिकार्‍यांकडून टूर ऑपरेटर्सकडून ३० टक्के कमिशन मागितले जात आहे. पर्यटन खात्यातील गैरव्यवहारांना आळा न घातल्यास पुराव्यासह गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यात येतील, असा इशारा आमदार सोपटे यांनी दिला.
पेडणेतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मोठमोठे बिल्डर पेडणे परिसरात हॉटेल्स उभारण्यासाठी प्रयत्नात आहेत. मात्र, पर्यटन खात्याने आपल्या हॉटेलची जागा एका व्यक्तीला पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी भाडेपट्टीवर दिली आहे, अशी टीका आमदार सोपटे यांनी केली.