अमृताहुनी गोड असे ऍड. कासार

0
216
  • सुरेश वाळवे

अमृत सह्रदयी होता, संवेदनशील होता आणि हळवा, भावनाप्रधानही होता. गप्पागप्पांत कष्टाचे जुने दिवस आठवून अनेकदा त्याचा कंठ दाटून येई. ही वॉज द सेल्फ मेड मॅन…

ऍड. अमृत कासार आणि माझी दोस्ती डिचोलीच्या अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूलमध्ये आम्ही विद्यार्थी होतो, तेव्हापासूनची – म्हणजे ५५ वर्षांपासूनची. त्यामुळे अमृत पुढे ज्येष्ठ विधिज्ञ बनला, तरी आमचे संभाषण ‘अरे – तुरे’ तच चालायचे. नंतर म्हापशाच्या सेंट झेवियर कॉलेजमध्येही आम्ही बरोबर होतो. अर्थात, दोन्ही ठिकाणी तो मला सिनियर होता, परंतु वैचारिक बैठक जुळली की, ज्येष्ठ – कनिष्ठतेचे अंतर उरत नाही.
अमृतची बालपणापासूनची वाटचाल; वाटचाल कसली, जी धडपड होती – आणि पुढची व्यावसायिक घोडदौड यांचा मी साक्षीदार आहे. अमृतचे पितृछत्र त्याच्या लहानपणी हरवले, तेव्हा आईने काबाडकष्ट करून त्याचे पालनपोषण केले. अमृत मुळात अभ्यासू असल्याने शिक्षकवर्गाचा, खास करून अवर लेडी हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर आंतोन पेरेर यांचा आवडता विद्यार्थी होता. म्हणून ते त्याच्या धडपडीकडे कौतुकाने आणि सहानुभूतीने पाहात. त्यापोटीच फादरनी अमृतला पदवीनंतर शिक्षकीचा प्रस्ताव दिला होता, पण महत्त्वाकांक्षी अमृतला जीवनात आणखी काही करून दाखवायचे होते, म्हणून त्याने संधी मिळताच पुणे गाठले आणि मिळेल ती नोकरी पत्करून कायदा शिक्षण पुरे केले.
पुण्यनगरीत थोरामोठ्यांची व्याख्याने ऐकून अमृतचा वैचारिक पिंड बनला आणि त्याला व्यासंगाची जोड लाभल्याने पुढे तो येथील पुरोगामी कार्यकर्त्यांचा आधार ठरला. अर्जुन जयराम परब, देवेंद्र कांदोळकर, दादू मांद्रेकर, यज्ञेश्वर निगळे आदी अंधश्रद्धा विरोधक अमृतकडे हक्काने जात आणि मार्गदर्शन घेत. मात्र, असे असले तरी अमृत अगदी नास्तिकही नव्हता. पण देवाधर्माचे अवडंबर आणि जातीपातीची कुंपणे त्याला मान्य नव्हती. काही जणांचा त्याच्याविषयी गैरसमज होता की, तो भटा – बामणांच्या विरोधात आहे. मला एकदा कळवळून विचारता झाला, ‘सुरेश, तुला पण मी तसा वाटतो का रे?’ वस्तुस्थिती माहीत असल्याने मी ठामपणे ‘नाही’ म्हटले.
सहा – सात महिन्यांच्या आजारानंतर गेल्या ऑगस्ट अखेरीस अमृत पनवेलच्या कन्येकडून पर्वरीला परतला. पहिला फोन मला. म्हटले ‘वेलकम, बॅक होम’. दुसर्‍या दिवशी भेटायला गेलो तेव्हा तो खूप उत्साही वाटला. भविष्यकालीन योजनांविषयी चर्चा झाली. नवप्रभातील ‘धर्मक्षेत्रे विधीक्षेत्रे’ ही लेखमाला त्याला ग्रंथरूपाने प्रसिद्ध करायची होती. यंदाची श्रीगणेश चतुर्थी चुकली याची रुखरुख त्याला असावी. भाद्रपद शुक्ल चतुर्थी हुकली; आता मी येत्या २३ रोजी आश्विन शुक्ल विनायक चतुर्थी पाळणार आहे, असे म्हणून दीड दिवसाच्या गणेशपूजनाचे निमंत्रणही त्याने मला दिले होते. पण हाय रे दैवा!
अमृतचे कष्टप्रद जीवन हा खरे तर सध्याच्या तरुणांना आदर्श ठरावा. त्याची धडपड किती व विविध क्षेत्रांतील वावर सुद्धा किती सहज! वकील बनून परतल्यानंतर अचानक त्याचे भाग्य फळफळले आणि मगोतर्फे उत्तर गोव्याची लोकसभा उमेदवारी लाभली. कॉंग्रेसच्या पुरुषोत्तम काकोडकरांचा पराभव करून तो खासदार बनला. ही गोष्ट आणीबाणीनंतरच्या ७७ च्या निवडणुकीची. मधू दंडवते, मधू लिमये, बापू काळदाते वगैरे जनता पक्षीय नेत्यांशी अमृतचे चांगले संबंध होते, पण मोरारजी, चरणसिंह, जगजीवनराम आदी मोठ्या नेत्यांचे मतभेद इतके विकोपास गेले की, जनतेने दिलेला कौल मधील लाथाळ्यांनी अक्षरशः लाथाळला गेला. परिणाम? अर्ध्यावरच लोकसभा बरखास्त. (पुढे हाच दुर्दैवी अनुभव प्रा. गोपाळराव मयेकर आणि ऍड. रमाकांत खलप यांनाही आला.)
अमृत दिल्लीहून गोव्यात परतला तो त्रिशंकू सारखी अवस्था होऊन. वकिलीत जम बसायच्या काळात राजकारणात प्रवेश आणि तेथे हा दारुण अनुभव. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न म्हणून श्रीगणेशापासून सुरुवात. थोडी तरी मिळकत हवी म्हणून त्याने डिचोलीत छोटा प्रिंटिंग प्रेस घातला आणि टॅब्लॉईड आकाराचे पाक्षिकही सुरू केले. पण व्यापार, धंदा हा त्याचा पिंड नव्हता. तरी पितळी वस्तू निर्मितीचा प्रयोगही त्याने करून पाहिला. पण अनुभव तोच. मग पूर्णवेळ वकिलीकडे वळण्याविना अन्य पर्याय राहिला नाही. त्याचा हा निर्णय मात्र अचूक ठरला. डिचोलीहून पर्वरीला स्थलांतर केले, अन् वरिष्ठ कोर्टातही त्याला संधी लाभली.
घटनेचा विशेष अभ्यास असल्याने पत्रकार तर संविधानात्मक बाबींसाठी त्याचेच मत घेत. अशा प्रकारे प्रसिद्धी लाभून अमृतचा वकील म्हणून बोलबाला झाला. पर्ये – सत्तरी येथील श्री भूमिका आणि मडकईची नवदुर्गा या वादांत अमृतने ग्रामस्थांची बाजू इतक्या तयारीने न्यायालयात मांडली की, महाजनांना दोन्ही ठिकाणी पीछेहाट पत्करावी लागली. या दोन दाव्यांनी अमृतचे नाव सर्वतोमुखी होऊन गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा वकील अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.
दुसरा कोणी असता, तर याचा व्यावसायिक लाभ उठवता, पण अमृत धंदेवाईक वकील नसल्याने त्याने ही अनुकूलताही ‘कॅश’ करणे नाकारले.
अमृत मिरामारच्या साळगावकर कायदा महाविद्यालयात शिक्षक बनला नसता, वकील झाला नसता, तर मग काय झाला असता? उत्तर आहे – लेखक. त्याला साहित्याची फार आवड होती. मराठी – कोकणी वादात त्याने कोणतीही बाजू घेऊन डोकेफोड केली नाही, कारण मराठीविषयी त्याला जेवढे ममत्व होते, तेवढीच ओढ कोकणीबद्दलही होती. ‘कशाला हे भांडण?’ असे तो म्हणायचा. दोन्ही गटांमध्ये त्याचे निस्सीम चाहते आणि मित्र होते, परंतु ‘मी तुमच्याच बाजूने’ असली ढोंगबाजी अमृतने केली नाही. उलट ढोंगबाजी, बुवाबाजी याचा तो निषेध करीत असे. म्हणून प्रागतिक विचारांचे लोकही त्याला आपला मानत.
१९८० साली डिचोलीत गोमंतक मराठी साहित्य संमेलन भरले होते. तीन दिवसांचा हा वाङ्‌मयीन यज्ञ यशस्वी करण्यास म. प. कें. चे प्रभाकर भुसारी यांचा सिंहाचा वाटा होता, तसाच कार्याध्यक्ष अमृतचा सुद्धा. पं. महादेवशास्त्री जोशींच्या अध्यक्षतेखालील हे संमेलन कार्यक्रम, चर्चा आणि उपस्थिती या बाबतीत अपूर्व ठरले. डिचोलीत तेव्हा निवासाच्या फारच अपुर्‍या सोयी होत्या, परंतु त्यावर मात करून पाहुण्यांची सरबराई आणि आदरातिथ्य यात ग्रामस्थ कोठेही उणे पडले नाहीत. पं. भीमसेन जोशींची अभंगवाणी होती. पंडितजी आणि साथींची उतरायची व्यवस्था खुद्द अमृतच्या (भाड्याच्या) घरी.
अमृत सह्रदयी होता, संवेदनशील होता आणि हळवा, भावनाप्रधानही होता. गप्पागप्पांत कष्टाचे जुने दिवस आठवून अनेकदा त्याचा कंठ दाटून येई. ही वॉज द सेल्फ मेड मॅन. धंदा, राजकारण यात अपयश आले तरी कटुता नव्हती. १९७९ साली ऍड. दिलखुश देसाई आणि ऍड. दयानंद नार्वेकर या दोन मगो आमदारांनी मुख्यमंत्री शशिकलाताईंविरुद्ध बंड पुकारले. पुढे वास्कोचे ऍड. शंकर लाड यांनी त्यांना साथ दिली म्हणून सरकार कोसळले. त्यावेळी खासदार म्हणून अमृतची सहानुभूती बंडखोरांकडे होती, पण त्यामागे स्वार्थभाव नव्हता. उलट संघटनात्मक बांधणीत मगो मागे पडतोय ही त्यांची भूमिका होती. ताईंना अमृतने अनेकदा सुचवूनही पाहिले, पण पालथ्या घड्यावर पाणी. पुष्पशील केरकर वगैरेंनी आपल्याविषयी श्रीमती काकोडकरांचे मत कलुषित केले असा अमृतचा समज. सत्तरीतील मोकासे हा मुद्दा घेऊन तो पुढे सरसावला आणि नेतृत्वापासून दुरावला. त्याने माथानी वगैरेंना घेऊन गोमंत लोकपक्ष काढला. पण तो रापणकारांपुरता मर्यादित उरला आणि कालांतराने अस्तंगत झाला.
अमृत राजकारणापासून दूर झाला तो पंधरा वर्षांनी, १९९६ साली पुन्हा एकदा लोकसभेची (यावेळी कॉंग्रेसची) उमेदवारी मिळेपर्यंत. गंमत म्हणजे त्यावेळी मी देखील कॉंग्रेसच्या तिकिटाचा एक इच्छुक होतो, परंतु त्याचा आमच्या मैत्रीत वा संबंधात अडसर आला नाही. अर्थात, त्याचे अधिक श्रेय अमृतच्या निरपेक्ष दोस्तभावनेला जाते. त्या निवडणुकीत भाई खलप मगोतर्फे विजयी होऊन देवेगौडा, गुजराल सरकारात मंत्री बनले. आज त्यांची राजकारणात व पक्षात असूनही नसल्यासारखी अवस्था झाली आहे, तशीच अमृतचीही झाली असती, म्हणून त्याने आधीच माघार घेऊन केवळ वकिली आणि त्याद्वारे समाजहिताकडे लक्ष वळवले. पुत्र विवेकही वकील झाला. असे सारे सुरळीत चालले असता अचानक असाध्य आजाराने अमृतला गाठले आणि काल तर साक्षात् काळाने.
आपल्या आजारामुळे गेले सहा महिने विवेकची धावपळ आणि तारांबळ उडत आहे यामुळे तो व्यथित व्हायचा. अमृतची उणीव केवळ कायदा क्षेत्रालाच नव्हे, तर गोव्यालाही दीर्घकाळ जाणवेल यात शंका नाही.