अमृत(वि)योग!

0
127

गोमंतकीय समाजजीवनामध्ये काही ठोस जीवननिष्ठा घेऊन जगणारी माणसे हळूहळू पडद्याआड जाताना दिसत आहेत ही बाब विलक्षण खंत देणारी आहे. सतीश सोनक गेले. र. वि. जोगळेकर गेले. आता ऍड. अमृत कासार यांच्यासारखा एक विचारवंतही आपल्यातून निघून गेला आहे. एक यशस्वी कायदेतज्ज्ञ, संविधानतज्ज्ञ अशी त्यांची ओळख तर गोमंतकाला होतीच, परंतु त्याहून एक अत्यंत व्यासंगी, चिकित्सक, बुद्धिवादी विचारवंत म्हणून ऍड. कासार यांचे महत्त्वाचे सामाजिक योगदान होते. मिळणार्‍या पैशांचा विचार न करता दीनदुर्बलांचा कैवार घेऊन न्यायदेवतेच्या पुढे त्यांच्या समस्या धसाला लावण्यासाठी झटणारा एक सच्चा समाजकार्यकर्ताही त्यांच्या रूपाने आपल्यातून निघून गेला आहे. या भूमीतील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपले कायदेविषयक ज्ञान पणाला लावून त्या तडीस लावणारे ऍड. कासार हे त्यांचा आधार होते. कूळ – मुंडकारांच्या जमीन जुमल्याच्या किचकट खटल्यांना धसास लावण्यात ते कधी मागे हटले नाहीत. मये स्थलांतरितांच्या गुंतागुंतीच्या विषयाला तडीस नेण्यासाठीही त्यांनी सरकारला योग्य मार्गदर्शन केले होते. बालपणी पितृछत्र हरपलेल्या कासारांना त्यांच्या मातोश्रीने काबाडकष्ट करून वाढवले. शिष्यवृत्तीच्या आधारे त्यांचे शालेय शिक्षण झाले होते. पुढे जिद्दीने त्यांनी पुण्यात जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले. आपली ही गरीबीतून वर आल्याची पार्श्वभूमी ते कधी विसरले नाहीत. त्यामुळे पद, प्रतिष्ठा, पैसा यांचा माज त्यांच्यात कधीच उतरला नाही. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी आदराने वागणारे – मार्दवी बोलणारे ऍड. कासार त्यामुळे सर्वांनाच आपलेसे वाटत असत. वेठबिगारीपासून मोकासदारीपर्यंतच्या शोषणाविरुद्ध लढणारे लढवय्ये ही देखील कासार यांची एक ओळख सांगता येईल. जी अल्पकालीक खासदारकी त्यांना लाभली, त्यातही या विषयाचा पाठपुरावा त्यांनी सतत केला होता. भारतीय संविधानाचा त्यांचा अभ्यास तर सखोल होता. दुहेरी नागरिकत्वासारखे विषय जेव्हा गोव्यात ऐरणीवर आले, तेव्हा नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व यातील सूक्ष्म भेद समजून घेण्यासाठी ऍड. कासारांकडेच धाव घेतली जात असे. आपल्यापरीने ते अशा प्रकारच्या विषयांची उकल करीत असत. राजकारणाशी त्यांचा काही काळ संबंध जरूर आला, परंतु त्यांचा खरा पिंड राजकारण्याचा नव्हताच. राजकारण्याला आवश्यक असलेल्या लांड्या-लबाड्या त्यांना कधीच जमल्या नसत्या. एक सच्छील, सज्जन असे हे व्यक्तिमत्त्व होते आणि सदैव आपला आब राखूनच ते राजकारणामध्येही वावरले. त्यामुळे आपल्या राजकीय विरोधकांचाही आदर आणि त्यांची मैत्री त्यांना सदैव लाभू शकली. एका वैचारिक उंचीवर वावरणार्‍या कासारांना राजकारणाच्या दलदलीत खालच्या पातळीवर उतरणे कधीच जमले नसते. त्यांचे विचार पुरोगामी आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यामुळे पुरोगाम्यांना ते आपले वाटत, परंतु त्यांचे हे पुरोगामित्व टोकाचे व अतिरेकी स्वरूपाचे नव्हते. ते संतुलित आणि संयमित होते. धर्माच्या अवडंबराला त्यांचा विरोध होता, परंतु त्यात टोकाची नास्तिकता नव्हती. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात आणि सुवर्णमध्य कोठे तरी मध्ये दडलेला असतो याचे भान त्यांनी सदैव बाळगले. गोव्याच्या सामाजिक जीवनात उभी भेग पाडणार्‍या कोकणी – मराठी वादाच्या संदर्भात देखील ऍड. कासारांचे हे संयमित आणि संतुलित भूमिका घेऊन वावरणे दिसून आले. कोकणी आणि मराठी या दोन्ही भाषा भगिनींविषयी त्यांना ममत्व होते. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून ते वावरले होते, तसे कोकणी भाषा मंडळाच्या कार्यकारिणीतही त्यांचा पूर्वी अंतर्भाव होता. ते स्वतः जेवढ्या उत्तम प्रकारे कोकणी बोलत, तेवढीच उत्तम मराठी बोलत. कोकणी मराठी वा इंग्रजीच काय, फ्रेंच आणि पोर्तुगीज भाषाही त्यांना अवगत होत्या. त्यांचे वाचन आणि व्यासंग अव्वल होता व त्यांच्यात एक साहित्यिकही दडलेला होता. आपल्या वकिली व्यवसायाच्या धबडग्यात त्यांना भले त्यासाठी वेळ काढता आला नसेल, परंतु तरीही अधूनमधून ते आपला हा लेखनाचा छंद जोपासत. सुरवातीच्या काळात त्यांनी ‘बहुजनवाणी’ हे पाक्षिक चालवले होते. नवप्रभेतून त्यांनी ‘धर्मक्षेत्रे विधीक्षेत्रे’ ही लेखमाला लिहिली होती. पुन्हा तशी लेखमाला लिहिण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केलेली होती. त्यांचा नवप्रभेवरील लोभ कायम होता. दरवर्षी वर्धापनदिनाला ते अगत्याने उपस्थित असत. यंदा मात्र, त्यांच्या गंभीर आजारपणामुळे ते घडले नाही. खरी विद्वत्ता आणि नम्रता हातात हात घालून वावरत असते. अत्यंत विनयशील आणि स्नेहार्द व्यक्तिमत्त्वाच्या, परंतु विलक्षण वैचारिक उंचीच्या ऍड. अमृत कासार यांचा वियोग आणि त्यांची उणीव गोमंतकीयांना दीर्घ काळ जाणवत राहील.