अमिरातीमध्ये होणार आयपीएल

0
140

>> केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

यंंदाची इंडियन प्रीमियर लीग टी-ट्वेंटी स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार आहे आणि आम्ही भारत सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. आम्ही आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत पुढील कार्यवाही विषयी चर्चा करू, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. सोमवारी आयसीसीने टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत स्थगित केल्यावर सप्टेंबर-नोव्हेंबरच्या विंडोचा उपयोग करुन यावर्षी आयपीएलला संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थानांतरित करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तयार आहे. पटेल यांनी यापूर्वी पुष्टी केली होती की आयपीएल प्रशासकीय समितीची दहा दिवसांत बैठक होईल आणि पुढील कार्यवाहीची योजना आखतील.

प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीनंतर स्पर्धेच्या तारखा, वेळापत्रक, ठिकाणे यांची घोषणा केली जाणार आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी मिळावी लागणार आहे. आयपीएल स्पर्धा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटेल यांनी सांगितले की, ‘युएईकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. हॉटेलची विस्तृत निवड आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१४ मध्ये एकदा त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे त्यांना आमच्या अपेक्षांची कल्पना आहे. दुबई, अबुधाबी व शारजा या तीन मैदानांवर प्रामुख्याने सामने होतील. आयपीएल खेळवायचा निर्णय आता भारत सरकारवर अवलंबून असेल. सरकारने विनंती मान्य केली तरच आयपीएल खेळवता येऊ शकते. भारत सरकारने आयपीएलला मान्यता दिल्यावरच वेळापत्रक तयार केले जाणार आहे.’

दुसरीकडे, आयसीसीच्या निर्णयापूर्वीच आयपीएलची तयारी सुरू झाली होती. टी-ट्वेंटी विश्‍वचषक पुढे जाण्याची कल्पना बीसीसीआयला होती. आयपीएल फ्रेंचायझींना आपल्या करारबद्ध खेळाडूंना लयीत परत येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा कालावधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय लवकर अपेक्षित आहे. दरम्यान, परदेशी खेळाडूंचे त्यांच्या देशांमधून थेट युएईमध्ये उड्डाण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.