अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : कॉंग्रेस

0
164

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचा एका प्रकरणी प्रसारमाध्यमांसमोर येऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बचाव केल्याने गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत की जय शहांचे प्रवक्ते असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला. तसेच या प्रकरणी अमित शहा यांनी भाजपाध्यक्षपदाचा राजिनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? असा सवालही शर्मा यांनी केला. याआधी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण, नितिन गडकरी भाजपाध्यक्षपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असता त्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे आता अमित शहांनीही राजीनामा द्यावा असे शर्मा म्हणाले. जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एंटरप्रायजेस या कंपनीची उलाढाल गेल्या वर्षभरात ५० हजार रुपयांवरून थेट ८० कोटी रुपयांवर गेली असल्याबद्दलचे वृत्त एका डिजिटल वृत्त वाहिनीवरून प्रसिध्द झाले होते. या खळबळजनक वृत्तानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जय शहांप्रकरणी बचावासाठी प्रसारमाध्यमांसमोर धाव घेतली.