अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीची चौकशी व्हावी : कॉंग्रेस

0
209

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या टेंपल एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ हजार पटींनी आपल्या नफ्यात अविश्‍वसनीय अशी वाढ केल्याने या कंपनीच्या या ‘नेत्रदीपक’ विकासप्रकरणी जय शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी अशी मागणी काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल तसेच आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून केली. केंद्रातील सत्ताबदलानंतर म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान व अमित शहा भाजपाध्यक्ष बनल्यानंतर जय शहा यांनी हा विकास साधला असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे.

कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा यांच्या वरील कंपनीने यंदा ८०.०५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही उलाढाल १६ हजार पटींनी वाढली आहे. या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा मालमत्ता नसतानाही त्यांनी हा स्तिमित करणारा विकास कसा काय साधला असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. केंद्रातील सत्ताबदलानंतर हा विकास झाला असल्याने याला भांडवलदारांची कंपूशाही असे म्हणावे लागेल अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.

आता पंतप्रधान या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देणार का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा पंतप्रधान दाखवतील का? असे सवाल सिब्बल यांनी केले.

अमित शहा हे शहा-इन-शहा : राहुल
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा हे नोटाबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी ठरल्याची टीका केली आहे. अमित शहा हेच नोटाबंदीचे ‘शहा-इन-शहा’ आहेत अशी कोटीही त्यांनी केली आहे. सिब्बल म्हणाले की पंतप्रधान मोदी स्वत:ला प्रधान सेवक संबोधतात व भांडवलदारी कंपूशाहीबद्दल बोलत असतात. कोणावर दहा लाख रुपयांचा आरोप असला तरी संबंधितांच्या मागे सीबीआयला सोडले जाते. मात्र आता पंतप्रधान बोलणार नाहीत. कारण हे प्रकरण त्यांच्या पक्षाध्यक्षाच्या मुलाविरुध्द आहे.

अब्रुनुकसानीचा दावा
करणार : जय शहा
आपल्या कंपनी विरोधात वृत्त प्रसिध्द करून आपली बदनामी केल्याप्रकरणी जय शहा यांनी ‘द वायर’ या वेबसाईट विरुध्द १०० कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे जय शहा यांनी म्हटले आहे. आपल्याविरुध्द आरोपांविषयी चर्चा किंवा संदर्भ घेणार्‍या संघटनांवरही अशीच कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वेबसाईटवरील सदर वृत्त बदनामीकारक असून भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोचणारे असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जय शहा यांच्या कंपनीकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिला आहे.