अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री

0
204

>> राजनाथ यांना संरक्षण तर, अर्थमंत्रिपदी

>> एस. जयशंकर परराष्ट्रमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप काल दुपारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपला सलग दुसर्‍यांदा अभूतपूर्व यश मिळवून देण्याबरोबरच गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोदींचे अत्यंत विश्‍वासू सहकारी अमित शहा यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्रिपदी वर्णी लागली असून निर्मला सीतारामन यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याकडील जबाबदार्‍या ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्या आहेत. तर मोदी मंत्रिमंडळातील नवीन चेहरे माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे अपेक्षितपणे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे व कॉमर्स व इंडस्ट्री खाते, प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खाते, स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण व वस्त्रोद्योग खाते सोपविण्यात आले आहे. नरेंद्र सिंह तोमर यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा रमेश पोखरियाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राम विलास पासवान यांच्याकडे ग्राहक संरक्षण खाते, रवीशंकर प्रसाद यांच्याकडे विधी खाते व ग्रामविकास खाते, हरसिमरत कौर यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग खाते, थावर सिंग गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय व सबलीकरण खाते सोपवण्यात आले आहे. सदानंद गौडा यांच्याकडे खते व रसायन, प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाम व खाण तर महेंद्र नाथ पांडे यांच्याकडे कौशल्य विकास खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अर्जुन मुंडा यांच्याकडे आदिवासी कल्याण खाते, डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान खाती, धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम गॅस व पोलाद खाते, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खाते, प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज खाते व महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे कौशल्य विकास खाते सोपवण्यात आले आहे. गिरीराज सिंह यांच्याकडे पशूपालन, दुग्धविकास, मत्स्यपालन तर जलसंपदा खात्याचा पदभार गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसर्‍यांदा शपथ घेतली होती.

डॉ. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
मोदींच्या मंत्रिमंडळातील नवा चेहरा असलेले पद्म पुरस्कार प्राप्त माजी परराष्ट्र सचिव डॉ. सुब्रमण्यन जयशंकर यांच्याकडे अपेक्षितपणे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. जयशंकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जयशंकर यांच्या कामकाजाचा अनुभव पाहता त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. जयशंकर माजी परराष्ट्र सचिव होते, त्यामुळे त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी दिल्या जाण्याची शक्यता होतीच. त्यांची परराष्ट्र धोरणांवर चांगली पकड आहे. त्यात यंदा माजी परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज मंत्रिमंडळात नसल्याने या शक्यतेला अधिक वाव होता. जयशंकर यांनी अमेरिकेबरोबर एटमी व्यवहाराचा मार्ग मोकळा करून देण्यात व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सीतारामन यांनी रचला पुन्हा एकदा इतिहास
माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्री बनवण्यात आले आहे. देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला स्वतंत्र कार्यभार असलेल्या अर्थमंत्री बनल्या आहेत. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यांनी देखील अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला होता. पण त्या त्यावेळी पंतप्रधान देखील होत्या. याआधी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सीतारामन संरक्षणमंत्री होत्या. तेव्हा देखील त्यांनी इतिहास रचला होता. संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला होता. सीतारामन यांच्यापुढे मोठी आव्हान असणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे. पुढील महिन्यात त्या अर्थसंकल्प देखील सादर करणार आहेत. महागाई, तेलांचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

श्रीपाद नाईक यांना
आयुष आणि संरक्षण

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्याकडे आयुष मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्याबरोबरच संरक्षण राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना खातेवाटप काल केले. उत्तर गोव्याचे खासदार नाईक यांना यावेळी कोणते खाते मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात नाईक यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या दुसर्‍या पर्वात नाईक यांच्याकडे आयुष मंत्रालय कारभाराबरोबर संरक्षण राज्य मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मंत्रालयात जाऊन काल कार्यभार स्वीकारला आहे. संरक्षण सचिव संजय मित्रा यांनी स्वागत केले. केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी कार्यालयातील अधिकार्‍यांशी संवाद साधला.
आयुष मंत्रालयाचे कार्यआणखीन वाढविण्याची संधी मिळाली आहे. योगाचा इतर देशात प्रसार करण्यावर भर देणार आहे. संरक्षण राज्य मंत्रिपदाचा मोठी जबाबदारी देण्यात आली असून ही जबाबदारी योग्य तर्‍हेने निभावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी कार्य केलेल्या संरक्षण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.