अमानुष..

0
126

वास्कोतील दुहेरी खून प्रकरणाचे धागेदोरे अखेर धाकट्या सुनेपर्यंत येऊन पोहोचले आणि तिने पोलिसांच्या अथक प्रयत्नांअंती गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी आपल्या सासूची आणि जावेची हत्या करणार्‍या प्रतिमा नाईकच्या रूपात जणू घरोघरी पाहिल्या जाणार्‍या कलह – कारस्थानांच्या दूरचित्रवाणी मालिकांतील कारस्थानी सूनच अवतरली आहे. एका सरळमार्गी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असे काही घडू शकते याचा कोणी विचारही करू शकत नाही एवढी ही घटना दुर्दैवी आणि विदारक आहे. केवळ एक कुटुंब या घटनेतून पुरते उद्ध्वस्त झाले आहे असे नव्हे, तर संपूर्ण गोमंतकीय समाजजीवनाला बसलेला हा एक मोठा हादरा आहे. कोणी विचारही करू शकत नाही अशा प्रकारची कलाटणी मिळण्याचे हे काही पहिले उदाहरण नव्हे. ज्या वास्कोत प्रतिमाने चोरीचा बनाव रचून आपल्या जावेचा आणि सासूचा काटा काढला, त्याच शहराने यापूर्वी याहून भीषण अशा कटकारस्थानांच्या घटना पाहिल्या आहेत. पन्नास लाखांच्या खंडणीसाठी कोवळ्या मंदार सुर्लकरला वास्कोतून उसकईला पळवून नेऊन बेसबॉलच्या बॅटचा प्रहार करून निर्दयपणे ठार मारणारे आणि त्याचा मृतदेह आर्ल – केरीला फेकून देणारे त्याचे मित्रच होते. रोहन धुंगटसारखा सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगाही त्या कटात सामील होता. डॉ. श्रीकांत वेरेकर या वास्कोतील नामांकित डॉक्टर व समाज कार्यकर्त्याला त्यांच्याच जावयाने गुंडांकरवी ठार मारून मृतदेह कासावलीत फेकून दिला होता. वास्कोतील सध्याची घटनाही अशाच निर्दयतेची आणि निर्ढावलेपणाची साक्ष देते. या हत्येमागील हेतूंसंबंधी वेगवेगळ्या कथा पुढे आल्या आहेत. प्रतिमाच्या चारित्र्यापासून सासू – सुनेच्या झगड्यापर्यंत आणि ऐषारामाच्या हव्यासापासून स्वैर वागणुकीपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सध्या चालली आहे. पुढील तपासात यावर नेमका प्रकाश पडेलच, परंतु ज्या सराईतपणे प्रतिमाने आपल्याच कुटुंबातील सदस्यांचा काटा काढला, ते पाहिले, तर आजच्या एकूण समाजव्यवस्थेतील अंधार्‍या कोपर्‍यांकडे लक्ष वेधले जाते. जीवनाचा केंद्रबिंदू बनत चाललेली पैशाची हाव, विसविशीत झालेले कौटुंबिक नातेसंबंध, अहोरात्र चालणार्‍या दूरचित्रवाणी मालिकांनी त्यांना घातलेले खतपाणी, समुपदेशन व्यवस्थेचा पूर्ण अभाव या सार्‍यातून जीवनातील गुंतागुंत वाढत चाललेली आहे. वरकरणी सारे काही आलबेल वाटत असलेल्या कुटुंबांमध्येही खोलवर काही बिनसलेले असते. धुसफुसत असते, धगधगत असते. मग एखादी वेळ अशी येते जेव्हा ही खदखद उफाळून वर येते आणि सारे होत्याचे नव्हते होऊन जाते. एखाद्याशी मतभेद असणे इथवर समजून घेता येते, परंतु मतभेदांची परिणती म्हणून त्याचा कायमचा काटा काढावासा वाटणे आणि नुसते वाटणे नव्हे, तर ते अत्यंत धूर्तपणे प्रत्यक्षात उतरवणे, त्याला लागणारे दगडाचे काळीज आणि तेही एका स्त्रीने हे सगळे आपल्या समाजाला पचवणे जड जाईल. प्रतिमाचा हा गुन्हा तिने कबूल केला असला तरी तो न्यायालयात शाबूत करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. गोव्यात गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या जबरी चोर्‍यांच्या घटना घडत आल्या. घरच्या व्यक्तींना मारबडव करून लुटण्याच्या घटना सातत्याने घडत आल्या. त्यामुळे आपला गुन्हाही चोरीचा बनाव केला की सहज पचून जाईल असे प्रतिमा हिला वाटले असावे. परंतु तसे झाले नाही. तिने चोरीचा बनाव करून दिलेली जबानी, चोरट्यांच्या येण्याची सांगितलेली वेळ आणि प्रत्यक्ष दोघींचा मृत्यू झाला ती वेळ यातील तफावत, मिरचीपूड फेकण्याचा बहाणा, यापूर्वी केलेली बांगड्यांची चोरी, झोपेच्या गोळ्या अन्नातून देण्याचा केलेला प्रयत्न या सार्‍या गोष्टी तिच्या विरोधात गेल्या. चोरीचा बनाव रचण्यासाठी आपल्या भावोजीला बोलावून घेऊन त्याला दागिन्यांची पिशवी सोपवण्यापर्यंत या बाईची मजल गेली. अनेक अंगांनी अद्याप तपास होणे बाकी आहे, परंतु तपास योग्य दिशेने सुरू असल्याने या हत्या कटाचे सगळे धागेदोरे गवसतील अशी आशा आहे. या हत्या कटासंबंधीच्या बळकट साक्षीपुराव्याअंती कदाचित न्यायालय शिक्षाही देईल, परंतु एका कुटुंबाची झालेली ही वाताहत एका व्यापक सामाजिक वास्तवाकडे पुन्हा पुन्हा अंगुलीनिर्देश करते आहे. त्यासंबंधी आपण काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.