अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षान्तिः आर्जवम्…

0
563

– प्रा. रमेश सप्रे
‘ज्ञान समाज’ (नॉलेज सोसायटी) असं आजच्या जनजीवनाला उद्देशून म्हटलं जातं. याचा अर्थ ज्ञानाचा पाया असलेला समाज म्हणजे सामाजिक संस्था-संबंध-जीवनशैली अशा सर्वांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाया ज्ञान हाच असतो. समाज हा अखेर माणसांचाच बनलेला असतो. ‘ज्ञानसमाजा’साठी व्यक्ती ज्ञानसंपन्न असणं आवश्यक असतं. अशा ज्ञानी व्यक्तीची लक्षणं भगवंत सांगताहेत. पूर्वी ‘श्रवण’ ही ज्ञान मिळवण्याची महत्त्वाची पद्धती होती. कारण विहिण्या-वाचण्याच्या साक्षरतेचा तेवढा प्रसार झाला नव्हता. विविध विषयांवरचं ज्ञान श्रवण करून ज्ञानी बनलेल्या व्यक्तीला ‘बहुश्रुत’ म्हटलं जात असे. आज मात्र लेखन-वाचनाचा प्रभाव सर्वत्र जाणवू लागलाय. दुर्दैव हे की वाचून-ऐकून ज्ञान मिळवण्यापेक्षा माहिती अधिक मिळू लागलीय. त्यामुळे आजचा सामान्य माणूस सर्व क्षेत्रातली माहिती मिळवून स्वतःला ज्ञानी समजू लागला. ही धोक्याची गोष्ट आहे. माहितीचं आयुष्य अल्प असतं. सध्या अशा माहितीला ‘सर्वांत नाशिवंत वस्तू’(मोस्ट पेरिशेबल कमॉडिटी) समजलं जातं. अशा माहितीचं ज्ञानात रुपांतर करणं अशक्य नसलं तरी अवघड निश्चित आहे. यासाठी कोणते गुण उपकारक व आवश्यक आहेत याची चर्चा भगवंत करताहेत. सर्वप्रथम काही महत्त्वाचे गुण सांगितले आहेत.
अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षांतिः आर्जवम्‌॥
आजच्या काळातही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, काहीतरी भरीव कामगिरी करण्यासाठी या गुणांचा खूप उपयोग आहे. अशा गुणांचा विकास स्वतःच्या आयुष्यात घडवणं; या गुणांना आपल्या व्यक्तिमत्वाचा व स्वभावाचा भाग बनवणं आवश्यक आहे. यातच भगवंताला अपेक्षित व आपल्याला (केवळ अर्जुनालाच नव्हे!) लाभदायक असं प्रभावी समुपदेशन दडलेलं आहे. यावर क्रमानं सहचिंतन करूया.
१. अमानित्वम् – मान, अपमानच नव्हे तर संकुचित स्वाभिमान व अतिदुरभिमान सार्‍या अनर्थाचं मूळ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आपला अहंकार लगेच दुखावला जातो. आपली भाषा, धर्म, देश इ. गोष्टींबद्दलची अस्मिता इतकी प्रखर असते की दुसर्‍याची भाषा, धर्म, देश इ.बद्दल आपण खूप द्वेष करू लागतो. हा अत्यंत दुःखद पैलू आपल्या जीवनाचा, त्यातील सर्व कृतींचा असतो.
त्याचबरोबर आपला गौरव झाला, सत्कार संपन्न झाला की त्या सन्मानानं आपण अतिशय फुलून जातो. आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीवच राहात नाही. एवढंच काय पण ज्या यशासाठी वा पराक्रमासाठी आपल्याला सन्मान लाभला त्यात इतर अनेक जवळच्या, दूरच्या संबंधित व्यक्तींचा व घटकांचा सहभाग होता याचाही आपल्याला विसर पडतो. एका दृष्टीनं ही कृतघ्नता आहे.
भगवंत सुचवताहेत की मान व अपमान याच्या पलीकडे एक अशी अवस्था आहे की कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल जात नाही. आपण शांत, समाधानी राहू शकतो. संत गोस्वामी तुलसीदासांच्या शब्दात ‘सबही मानप्रद आपु अमानी’ अशी अवस्था मनाचं संतुलन टिकवणारी व जीवन यशस्वी बनवणारी आहे. सर्वांना मान दिला पाहिजे (सबहि मानप्रद). यात सर्व पशुपक्षी मानवप्राणी सर्व आले. त्यांनी अप्रतिम उदाहरण दिलंय दुर्वांचं! सर्वांच्या पायाखाली तुडवली जाणारी हरियाली(गवत) स्वच्छ धुवून-पुसून दुर्वा बनून पवित्र मनोभावानं गणेशाच्या डोक्यावर विराजमान होते. हा दुर्वांना (म्हणजे प्रत्यक्षात अतिसामान्य गवताला) लाभलेला सर्वोच्च बहुमान आहे. पण दुसर्‍याच दिवशी निर्माल्य बनून याच दुर्वा पुन्हा दूर फेकल्या जातात. क्वचित पायदळीही तुडवल्या जातात. पण त्या शांत असतात. आदले दिवशीचं तुडवलं जाणं त्यांना दुःखी बनवत नाही. आजचं गणपतीच्या मस्तकावर विराजमान होणं त्यांना अत्यानंदी बनवत नाही. म्हणूनच उद्याचं निर्माल्य बनणंही त्यांना उदास बनवत नाही. ना मानसन्मान ना अपमान तर अमानाचं (अमानित्वाचं) त्या आदर्श उदाहरण बनतात. यावरून विवेकी मानवानं प्रेरणा घेऊन ‘अमानित्व’ प्राप्त करून घेतलं पाहिजे.
* समुपदेशन :
= यासाठी सर्वांत लाभदायक आहे सज्जनांची संगत (सत्संग) केवळ समवयस्क, समविचारी व्यक्तींचीच नव्हे तर वयानं ज्येष्ठ व अनुभवानं; गुणांनी, कर्तृत्वानं श्रेष्ठ अशा व्यक्तींच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
= आपल्या जीवनातील दोषांवर लक्ष केंद्रित करून ते बाहेर काढण्यासाठी योग्य ते चिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ व भावस्थिर राहण्याचा अभ्यास केला पाहिजे.
= यासाठी पूरक व उपकारक म्हणजे सर्वेजनांची सेवा. साने गुरुजींसारख्या आजच्या काळातील संतप्रकृती व प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या चरित्रांचा अभ्यास व चिंतन अमानित्वाचा, नम्रतेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त पडू शकतात.
२. अदंभित्वम् ः दंभ म्हणजे ढोंग, दिखावटीपणा, आपण आहोत तसे न दिसणं व आपण नाहीत तसे दिसण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात दंभ किंवा दंभित्व! याच्या उलट जसे आहोत तसेच प्रामाणिकपणे लोकांसमोर किंवा समाजात दिसणं व त्यानुसार सच्चा व्यवहार सर्वांशी करणं हे अदंभित्व आहे. यात कदाचित आदरसत्कार होणार नाही पण अपमान, स्वतःची फसवणूक (आत्मवंचना) तरी घडणार नाही. पितळ नावाच्या धातूनं आपण स्वतःला सोनं समजणं त्याप्रमाणे वागणं नि सहवासात येणार्‍या सर्वांना आपण सुवर्ण असल्याचं भासवणं, तसा आभास निर्माण करणं हे आत्महत्या करण्यासारखं. दुसरी मंडळी यामुळे फसतील किंवा फसणार नाहीतही आपण मात्र आपला आत्मनाश घडवत असतो. असा दिखाऊपणा किंवा ढोंग (हिपॉक्रसी) आपल्या वर्तनात व दुसर्‍याच्या कृतींचा अर्थ लावण्यात (इंटरप्रिटेशन) नसणं हे मोठं वरदान आहे.
* समुपदेशन :
= आपलं ध्येय स्पष्ट व ते गाठण्यासाठीचे प्रयत्न व प्रयोग अतिशय प्रामाणिक नि पारदर्शक असणं आवश्यक आहे. ध्येयशून्य व्यक्तीला ना दंभाची जाणीव ना अदंभित्वाचा अभिमान असतो.
= आपल्या प्रत्येक कृतीबद्दल, कर्माबद्दल आपण अतिशय सावध, दक्ष असायला हवं. कारण यातूनच आपल्या जीवनाला आकार येत असतो. आपली स्वप्न सत्यात उतरणार असतात. उच्च पातळीवरचे विचारवंत, धर्मोपदेशकच नव्हेत तर समाधिमग्न अवस्थेत रात्रंदिवस प्रयोगशाळेत संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांनासुद्धा या दंभदोषापासून सावध राहायला हवं.
= यात स्वतःचा दोष झाकणे हे अभिप्रेत (अपेक्षित) नसून त्यावर नीट, सखोल चिंतनमनन करून दंभ, अहंकार, खोटेपणा, दिखावटीपणा अशा दुर्गुणांना कायमचं जीवनातून हद्दपार करणं आवश्यक असतं. यासाठीही वाचन, चिंतन, सत्संग, उपासना अतिशय प्रभावी ठरू शकतात.
३. अहिंसा : या शब्दाचा ढोबळ अर्थ – दुसर्‍यांना त्रास न देणं, त्यांच्या भावना न दुखावणं एवढाच नाही. ही नकारात्मक बाजू झाली. आज सर्वत्र सुरू असलेला हिंसेचा थयथयाट नि थैमान बघितलं तर भगवंतानं रणभूमीवरही आग्रहानं सांगितलेल्या अहिंसा तत्त्वाचा अर्थ अधिकच स्पष्ट होतो.
भगवंतांना भित्र्या व्यक्तीची म्हणजेच अतिसामान्य जनांची म्हणजेच भ्याडाची अहिंसा नको. ते तर युद्ध सोडून अरण्यात जाणार्‍या अर्जुनाला अशा अति-आत्मघातकी अहिंसा विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करताहेत. तो प्रयत्न अतिशय यशस्वी बनून अर्जुन कृष्णभावनेनं युद्ध करून जिंकतही आहे. पण उठसूट हिंसा करणं, काया-वाचा-मनानं इतरांना दुखवणं याचा त्याग करायला भगवंत आग्रहानं सांगताहेत.
महात्मा गांधीही नेहमी म्हणायचे माझी अहिंसा नकारात्मक नाही. ती वीरांची आहे. एका गालावर थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करणं सोपं नाही. लहान मूलही असं करू शकणार नाही. त्याचा अहंकार (इगो) लगेच दुखावला जाऊन तो दुसरा गाल तर पुढे करतच नाही पण मारायला एकदम हात उगारतो.
गौतम बुद्ध, महावीर हे विशेषत्वानं अहिंसेचा पुरस्कार करतात. अगदी टोकाची अहिंसा पाळा याचा आग्रह धरतात. पण त्यांनाही अपमानास्पद हिंसा काहीही झालं तरी सहन करा असं सुचवायचं नसतं. पण अकारण, अनावश्यक हिंसा टाळण्यावर मात्र त्यांचा कटाक्ष असतो.
अहिंसेचे शास्त्रकारांनी चार प्रकार सांगितलेत.
१. देश(स्थान)गत हिंसा – म्हणजे तीर्थक्षेत्रात म्हणजे पवित्र भूमीवर व जलाशयाच्या ठिकाणी पशूंचा बळी देणं, इतर अघोरी प्रकार धार्मिक व्यवहार, कर्मकांड म्हणून करणं पूर्ण त्याज्य असलं पाहिजे.
२. कालगत अहिंसा – विशिष्ट तिथी, पर्व, शुभ दिवस या काळात हिंसा टाळायची असते. श्रावण महिना, रमजान, ख्रिस्ती बांधवांचा लेंट म्हणून असलेला गुड फ्रायडेपूर्वीचा काळ या कालावधीत मांसाहार, मद्यप्राशन टाळण्याचं व्रत अनेकांचं असतं. यामुळे शांत स्वभाव राहून हिंसा टाळली जाते.
३. समयगत अहिंसा – अनेकजण पुत्रजन्म, संतसाधूंची भेट, भागवत-गुरूचरित्र इ. ग्रंथांचा सप्ताह अशा प्रसंगी शांत राहून, मांसाहार टाळून, कुणाचंही मन न दुखवून अहिंसेचं पालन करतात.
४. व्यक्तिगत अहिंसा – गाय, हरीण असे पशु यांची हत्या न करणं, माता-पिता-गुरू-वडील मंडळी अशांची मनं न दुखवणं, त्यांना शारीरिक त्रास न देणं उलट त्यांची सेवा करणं हे अहिंसापालनच होय. अहिंसापालनाचा सर्वोच्च आदर्श घालून देणार्‍या महावीरांचा एक चिंतन करण्यायोग्य विचार आहे. – सर्वांत वाईट हिंसा म्हणजे आयुष्याचा नाश घडवणं, व्यर्थ वेळ घालवणं (किलिंग टाइम).
* समुपदेशन :
= अहिंसा हे सुसंस्कृत मानवासाठी सर्वोच्च मूल्य (सुप्रीम व्हॅल्यू) आहे. आहारातली हिंसा (मांसाहार) टाळणं एकवेळ सोपं आहे. पण खरी हिंसा तर आपण काया-वाचा-मनोभावे करीत असतो. अशा प्रसंगी सावध राहून अहिंसापालन केलं पाहिजे. यात ‘सर्वेजनः सुखिनो भवन्तु’ या प्रार्थनेचा प्रत्यक्ष आचार आहे.
= सुसंस्कार, योग्य दिनचर्या, आत्मसंयम, मनोनिग्रह यातूनच खरी अहिंसा साकारते. ज्ञानेश्‍वरांची यासंबंधीची दृष्टी खूप खोल व व्यापक आहे.
४. क्षांतिः – म्हणजे क्षमा व सहनशीलता. महाभारतातील ‘यक्षप्रश्‍न’ प्रसंगी विचारलेल्या प्रश्‍नाला युधिष्ठिराचं विचारपूर्वक उत्तर आहे- ‘क्षमा म्हणजे सहनशीलता. सर्व प्रकारच्या द्वंद्वात (शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान इ.) शांत, स्थिरचित्त राहणं म्हणजे क्षमा!)’ चुका, अपराध घडणं हा मानवी स्वभाव आहे पण क्षमा करणं हे दिव्य वर्तन असतं.
* समुपदेशन :
= क्षमेच्या अभ्यासासाठी वाचन – चिंतन – सत्संग-आत्मपरीक्षण उपयोगी पडतं.
= महान व्यक्तींच्या चरित्रापासून प्रेरणा घेणं व आपल्या वर्तनात परिवर्तन घडवणं आवश्यक आहे.
५. आर्जवम् – म्हणजे स्वभावाचा सरळपणा, निर्व्याजता, निरागसता. मोठ्या माणसाच्या जीवनात याचा खूप अभ्यास करावा लागतो. एखादा साधा भोळा वारकरी पंढरपूरच्या वारीला जातो, तिथल्या भक्तिभावपूर्ण वातावरणानं भारावून जातो. तो घरी परततो तो स्वभाव बदलूनच. ही उदाहरणं अपवादात्मक वाटली तरी आपल्याच अवतीभवती असतातच.
* समुपदेशन :
= सरळ, सुंदर, साधं राहणीमान व जीवनशैली आपल्याला आर्जवी (नम्र व प्रेमळ) बनवते.
= स्वतःच्या दोषाचं गवत उपटून मनाची मशागत करणं, ऋजू बनणं हे ध्येय असलं पाहिजे.
ज्ञानदेवांचं पसायदान हे आपणां सर्वांसाठी भगवंतानं आग्रहपूर्वक सांगितलेल्या या गुणांचा विकास घडण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. खळांची व्यंकटी (स्वभावाचा वाकडेपणा) जाऊन त्यांना सत्कर्माची गोडी लागणं नि सर्व चराचर प्राण्यांत-सृष्टीत परस्पर प्रेमाचं ‘मैत्र’ घडो असं त्यांनी मागून काय उपयोग? आपण या गुणांचा विकास स्वतःच्या जीवनात निग्रहपूर्वक करायला नको का?