अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा

0
196

>> मगो केंद्रीय समितीच्या बैठकीत ठराव

पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. राम मनोहर लोहीया, डॉ. टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारणे, राज्यातील राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे द्यावीत आणि शिक्षण क्षेत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्थरावर योगाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे ठराव मगोपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत काल संमत करण्यात आले.

मगोपचा स्थापना दिवस १० मार्च रोजी धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. फर्मागुडी येथे मुख्य सभा घेतली जाणार आहे. मगोप पक्षाच्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका आणि एक फिल्म तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिमगोत्सवानंतर १७ मार्चनंतर तालुका पातळीवर सभा घेण्यात येणार आहेत. तसेच म्हापसा येथे महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या महामेळाव्यात पक्षाच्या कार्यात योगदान दिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

मगोपच्या नावावर विरोधक चर्चा करीत आहेत. काही पक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करीत आहेत. मगोपला बहुजन समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे गोवा मुक्तीपासून आजपर्यंत मगोपचे अस्तित्व कायम आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव बदनाम करण्याचे काही जणांकडून प्रयत्न केले जात आहेत. काही राजकारणी केवळ मतांसाठी नको ‘ते’ विषय हाती घेत आहेत. या लोकांनी जनतेसाठी काहीच केलेले नाही, अशी टिका अध्यक्ष ढवळीकर यांनी केली.
पुतळे उभारण्यासाठी खास उद्यान तयार केले जाऊ शकते. पणजीपासून पंधरा किलो मीटर अंतरावर अशा उद्यानासाठी एक जागा उपलब्ध आहे. त्याठिकाणी स्वातंत्र्य लढा, जनमत कौल यामध्ये योगदान दिलेल्या लोकांचे पुतळे उभारले जाऊ शकतात. तसेच राज्यातील जुनी मंदिरे, चर्च, मशिदी यांच्या प्रतिकृती असलेला आगळावेगळा प्रकल्प उभारला जाऊ शकतो, असे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

नाव बदलण्याची गरज नाही : सुदिन
मगो पक्ष नावाला महत्त्व देत नाही. तर कामाला महत्त्व देत आहे. त्यामुळे मगोपच्या नावात बदल करण्याची गरज नाही, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल विरोधकांना मारला. गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय असा भेदभाव करणे अयोग्य आहे. आपण प्रथम भारतीय आहोत. त्यानंतर गोयकार आहोत, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले. जनमत कौलानंतर सुध्दा १९६८ च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने मगोपला पुन्हा बहुमताने निवडून दिले होते याची आठवण त्यांनी केली.