अभिनव प्रयोग

0
208

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक नवा अनोखा अध्याय काल मुंबईत शिवतीर्थावर लिहिला गेला. सत्तेपासून दूर राहून प्रसंगी केवळ रिमोट कंट्रोल ठेवण्याची ठाकरे घराण्याची परंपरा मोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तेही समविचारी भाजपच्या बळावर नव्हे, तर विरोधी विचारांच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठबळावर. मागल्या दाराने सत्तास्थापन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न हाणून पाडून केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस आणि इतर छोट्या पक्ष व अपक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे हे सरकार आहे, त्यामुळे विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकला असे जरी म्हणता येणार नसले, तरी एकूणच देशाच्या राजकीय इतिहासातील हा एक अत्यंत अभिनव प्रयोग आहे आणि त्याच्या यशापयशावर देशातील इतर राज्यांतील सत्तासमीकरणेही ठरणार आहेत. तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार बनवले असल्याने ही ‘तीन पायांची शर्यत’ असे आम्ही यापूर्वी म्हटलेच आहे. एकमेकांच्या पायांत पाय न घालता पाच वर्षे सरकार चालवणे ही खरोखरच सोपी गोष्ट नाही. त्यातही टोकाचे वैचारिक मतभेद असलेल्या पक्षांसाठी आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी तर ही गोष्ट फारच कठीण आहे, परंतु या सर्वांना एकत्र आणणारा आणि बांधून ठेवणारा एक भक्कम दुवा ही उद्धव यांच्यासाठी जमेची बाजू आहे तो दुवा म्हणजे शरद पवार! या सरकारच्या जडणघडणीचे सर्व श्रेय खरे तर शरद पवार यांना आहे. अगदी शत्रूच्या गोटात डेरेदाखल झालेल्या आपल्या पुतण्याला परत आणण्यापासून तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचे वातावरण निर्माण करून शिवसेनेलाच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यासाठी राजी करण्यापर्यंत जी कामगिरी शरद पवारांनी पार पाडली, तिला खरोखर तोड नाही. बाळासाहेबांशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. अगदी सुरवातीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी जेव्हा ‘फ्री प्रेस’ सोडला तेव्हा पवारांसोबत भागीदारीत एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रसिद्ध करायचा प्रयत्न त्यांनी केला होता हे अनेकांना ठाऊक नसेल. सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले तेव्हा बाळासाहेबांना हे कळताच आपल्या अंगाखांद्यावर वाढलेल्या या मुलीच्या विरोधात शिवसेना व भाजप उमेदवार उभा करणार नाही याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. उद्धव यांना मुख्यमंत्रिपदासाठी भक्कम पाठिंबा देऊन पवारांनी जणू बाळासाहेबांचे हे ऋण सव्याज फेडले आहे. मुख्यमंत्रिपदी अनपेक्षितपणे विराजमान झालेले उद्धव ठाकरे हे व्यक्तिशः एक अतिशय सुसंस्कृत, सज्जन गृहस्थ आहेत. प्रत्यक्ष भेटींमध्ये आमच्याही हे अनुभवास आलेले आहे. बाळासाहेबांचे ते तिसरे चिरंजीव. मोठे बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले, जयदेवचे बाळासाहेबांशी पटले नाही, परंतु उद्धव यांनी मात्र बाळासाहेबांचा वारसा पेलण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्यासारखा मोहरा गमावल्यानंतर शिवसेनेचे अस्तित्व आता राहणार का अशी शंका घेतली जात असताना त्यांनी भाजपच्या झंझावातामध्येदेखील ते टिकवले आणि वाढवले. शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षसंघटनेला त्यांनी बाळासाहेबांनंतर एक वेगळे रूप दिले. केवळ मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेमध्ये मुंबईतील परप्रांतीयांनाही सामावून घेण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी ‘मी मुंबईकर’ सारखे उपक्रम राबवले. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यांस उपस्थित राहण्यापासून दाक्षिणात्यांच्या चंडावादनाने आपल्या प्रचाराची सुरूवात करण्यापर्यंत अनेक प्रकारे त्यांनी शिवसेनेचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी हिंदुत्वाचाही व्यापक आधार घेतला. मात्र आता या आघाडी सरकारमध्ये आपले हिंदुत्व पाच वर्षे गुंडाळणे त्यांना भाग आहे. अर्थात, ठाकरे घराण्याला प्रबोधनकारांचाही वारसा आहे हे विसरून चालणार नाही. प्रबोधनकारांचा मृत्यू झाला तेव्हा उद्धव अवघे तेरा वर्षांचे होते, परंतु आजोबांच्या वारशाची जाणीव त्यांना नक्कीच आहे. मूलतः त्यांचा पिंड एका कलाकाराचा आहे. उपयोजित कलेमधील बीएफएची पदवी घेतलेले उद्धव एक उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. चौरंग नावाच्या जाहिरात एजन्सीचेही काम ते सुरवातीला पाहायचे. ‘सामना’च्या जबाबदारीद्वारे त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि हळूहळू त्यांचे नेतृत्व आकारास आले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनीच त्यांचे नाव कार्याध्यक्षपदासाठी कसे सुचवले आणि पुढे त्यांच्याशीच त्यांचा संघर्ष कसा झडला हे तर जगजाहीर आहे. परंतु या सगळ्या वादळांतून तावून सुलाखून निघालेले उद्धव मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची धुरा पेलण्यास सज्ज झालेले आहेत. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. सामान्य माणसाच्या कल्याणाची त्यांची प्रामाणिक आस आहे. फक्त प्रश्न आहे तो तीन पक्षांचे हे सरकार ते कितपत समन्वयाने चालवू शकतील हा! परंतु येणार्‍या काळामध्ये ते एक उत्तम सरकार महाराष्ट्राला देतील आणि ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असे म्हणण्याची वेळ जनतेवर येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा आहे!