अबू सालेमला जन्मठेप, दोघांना फाशी

0
121

 

>> मुंबईतील १९९३चा साखळी बॉम्बस्फोट खटला
>> २४ वर्षांनंतर टाडा न्यायालयाचा निकाल

मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेला कुख्यात गुंड अबू सालेम व करीमुल्लाला जन्मठेप तर फिरोज खान व ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अन्य एक दोषी रियाज अहमद सिद्दिकीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. तब्बल २४ वर्षांनंतर विशेष टाडा न्यायालयाने काल हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

काल सकाळी अबू सालेमसह फिरोज खान, मोहम्मद तारीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या, करीमुल्ला खान व रियाज अहमद सिद्दिकी यांना विशेष टाडा न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षकारांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शिक्षेवर सुनावणी झाली. सालेम व करीमुल्लाला जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सालेमला बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. तर बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी व शेखाडी बंदरावर आरडीएक्स स्फोटके उतरविल्याप्रकरणी करीमुल्लाला दोषी ठरविण्यात आले आहे.
सालेम १३ वर्षेच कारागृहात
पोर्तुगाल व भारत यांच्यातील करारानुसार सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. त्यामुळे त्याला जन्मठेप द्यावी, अशी विनंती विशेष सीबीआय वकिलांनी विशेष टाडा न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रत्यार्पण कायद्यानुसार अबू सालेमला २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही. त्यानुसार त्याला २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून यामधील १२ वर्षांची शिक्षा त्याने आधीच भोगली आहे. त्यामुळे अजून पुढची १३ वर्षे त्याला कारागृहात घालवावी लागणार आहेत. मात्र, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास अबू सालेमला आजन्म जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. १६ जूनला विशेष टाडा न्यायालयाने १९९३ साखळी बॉम्बस्फोटांच्या दुसर्‍या टप्प्यातील आरोपी अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवले होते. त्यात २८ जून रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या मुस्तफा डोसाचाही समावेश होता. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली होती. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ लोक ठार तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणी पहिल्या टप्प्यातील खटल्यात अभिनेता संजय दत्त याच्यासह शंभर आरोपींना ‘टाडा’ न्यायालयाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी शिक्षा दिली होती.