अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत

0
133

शामार्ह ब्रूक्सने आपल्या कारकिर्दीत नोंदविलेले पहिले शतक आणि ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवेलने दोन दिवसात मिळविलेल्या १० बळींच्या जोरावर भारत दौर्‍यावर असलेल्या वेस्ट इंडीज संघ अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी जिंकण्याच्या उंरबठ्यावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानची दुसर्‍या डावात ७ बाद १०९ अशी स्थिती झाली असून दुसर्‍या दिवस अखेरपर्यंत त्यांना केवळ नाममात्र १९ धावांची आघाडी मिळालेली आहे.

अफगाणिस्ताने आपल्या पहिल्या डावात सर्व गडी गमावत १८७ धावा केल्या होत्या. ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवेलने अफगाणिस्तानला रोखताना ७ बळी मिळविले होते.
प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाच्या २ बाद ६८ धावांवरून पुढे खेळताना वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात २७७ अशी धावसंख्या उभारली. त्यामुळे त्यांना ९० धावांची आघाडी मिळाली. शामार्ह ब्रूक्सने १५ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने आपल्या कारकिर्दीतील पहिली शतकी खेळी करताना १११ धावांचे योगदान दिले. जॉन कॅम्पबेलने ५५ तर शेन डावरिचने ४२ धावा जोडल्या. अफगाणकडून आमिर हामजाने ५ तर कर्णधार रशीद खानने ३ तर झहीर खानने २ बळी मिळविले.

प्रत्युत्तरात खेळताना दुसर्‍या डावांतही अफगाणी फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही व दुसर्‍या दिवस अखेरपर्यंत त्यांची स्थिती ७ बाद १०९ अशी बिकट झाली आहे. त्यांना केवळ १९ धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. जावेद अहमदी (६२), इब्राहीम झद्रान (२३) आणि नासिर जमाल (१५) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. अन्य फलंदाज कॉर्नेल आणि रॉस्टन चेस यांच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरले. कॉर्नेल व चेस यांनी प्रत्येकी ३ बळी मिळविले.