अफगाणिस्तानने जिंकली टी-२० मालिका

0
79

अफगाणिस्तानने दुसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ६ गडी व ७ चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १३४ धावा केल्या. अफगाण संघाने विजयी लक्ष्य १८.५ षटकांत गाठले. राशिद खानने आपल्या चार षटकांत केवळ १२ धावा मोजून ४ गडी बाद केल्यानंतर गोलंदाजीत दोन बळी घेतलेल्या अष्टपैलू मोहम्मद नबी याने केवळ १५ चेंडूंत नाबाद ३१ धावा चोपून आपल्या संघाला विजयी केले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून तमिम इक्बाल (४३), मुश्फिकुर रहीम (२२) व तळाला अबू हैदर (२१) याचा अपवाद वगळता इतरांनी निराशा केली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला शहजादने चांगली सुरुवात करून दिली. परंतु, दुसरा सलामीवीर गनी याने २१ धावांसाठी ३१ चेंडू वाया घालवताना दबाव वाढवला. अफगाणिस्तानला शेवटच्या १२ चेंडूंत २० धावांची आवश्यकता होती. मोहम्मद नबीने रुबेल हुसेनने टाकलेल्या डावातील १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार व दुसर्‍या चेंडूवर षटकार ठोकला. रुबेलने तिसरा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नबीने पहिल्या दोन चेंडूंची पुनरावृत्ती करत संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. झिंबाब्वे वगळता इतर देशांविरुद्ध द्विपक्षीय टी-२० मालिकेत मिळविलेला अफगाणिस्तानचा हा पहिलाच मालिका विजय ठरला.