अफगाणविरुद्ध रहाणे कर्णधार

0
100

>> कोहली, बुमराह, रोहित, भुवीला विश्रांती

अफगाणिस्तानच्या शुभारंभी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा व भुवनेश्‍वर कुमार यांना स्थान देण्यात आलेले नाही. विराट कोहली काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळायला जात असल्याने त्याच्या जागी अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आलेले चारही खेळाडू बीसीसीआयने नव्याने तयार केलेल्या ए प्लस श्रेणीतील आहे. रोहित शर्मा वगळता उर्वरित तिन्ही खेळाडू भारतासाठी तिन्ही प्रकारात सातत्याने खेळत आले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी निवडलेला शिखर धवन हा ए प्लस श्रेणीतील एकमेव खेळाडू आहे. बंगळुरू येथे १४ ते १८ जून या कालावधीतील सदर सामना रंगणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये सध्या यॉर्कशायर व ससेक्स संघाकडून खेळत असलेल्या चेतेश्‍वर पुजारा व इशांत शर्मा यांना संघात स्थान मिळाले आहे. भुवी व बुमराहच्या अनुपस्थितीमुळे उमेश यादव, इशांत व मोहम्मद शामी यांच्यासह मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. वृध्दिमान साहाच्या रुपात केवळ एकमेव स्पेशलिस्ट यष्टिरक्षक संघात आहे. मागील वर्षी जून महिन्यात आंतरराष्ष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानला कसोटी दर्जा दिला होता. भारताविरुद्ध आपला शुभारंभी कसोटी सामना खेळणारा अफगाणिस्तान हा चौथा देश बनणार आहे. यापूर्वी पाकिस्तान, झिंबाब्वे व बांगलादेशने भारताविरुद्ध आपल्या कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता.

भारतीय कसोटी संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शामी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा व शार्दुल ठाकूर.