अपस्मार लक्षणे व पारंपरिक उपचार

0
537
  • डॉ. प्रदीप व्ही. महाजन

सर्व मानवी लोकसंख्येमध्ये अपस्माराचे झटके हे मज्जासंस्थेच्या विकारांचे सर्वाधिक आढळणारे लक्षण आहे. अपस्मारात झटका येऊन व्यक्ती जमिनीवर कोसळते आणि आचके देऊ लागते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, हे अपस्माराचे केवळ एक लक्षण आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.

आज आपण अपस्माराबद्दलच्या काही मूलभूत बाबींवर प्रकाश टाकू आणि या अवस्थेतून बाहेर येण्यास प्रभावीपणे मदत करू शकणार्‍या उपचारपद्धतीबद्दलही जाणून घेऊ.

मेंदूमध्ये चेतापेशी एकमेकींशी संवाद साधून माहितीचे वहन करतात. चेतापेशींना होणार्‍या हानीमुळे होणार्‍या मज्जासंस्थेच्या विकारांमध्ये चेतापेशीत अतिरिक्त विद्युत स्राव सुरू होतात आणि त्याचे पर्यवसान आकडी येण्यात होते. कॉर्टिकल स्वरूपाच्या चेतापेशींमधून होणार्‍या हायपरसिंक्रोनस (चेतापेशींमधील अतिसमक्रमितता दाखवणार्‍या) तसेच अतिरिक्त प्रमाणातील स्रावामुळे मेंदूच्या कार्यात आलेला तात्पुरता अडथळा अशी अपस्माराच्या झटक्याची व्याख्या करता येईल. झटका येण्याचा धोका वाढवणारे हे काही घटक …

– वैद्यकीय घटक : वाढलेला ताप, प्रादुर्भाव, रक्तातील साखरेची पातळी घसरणे, मेंदूतील गाठी इत्यादी.
– पर्यावरणातील घटक : मोठा आवाज, प्रखर प्रकाश, प्रदूषण इत्यादी.
– पोषणाचा अभाव आणि मद्य, तंबाखूसारख्या विषजन्य घटकांचे सेवन
– हार्मोन्समधील असंतुलन : वैद्यकीय किंवा मानसशास्त्रीय कारणे, तणाव इत्यादी.
झटक्याच्या सुरुवातीला होणार्‍या विकासावरून तसेच कारणांवरून त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे (इंटरनॅशनल लीग अगेन्स्ट एपिलेप्सी २०१० क्लासिफिकेशन) :
– केंद्रस्थ झटके : जागृतावस्था किंवा जाणीव कायम राहून किंवा न राहता येणारे झटके, बायलॅटरल सीझर (मेंदूच्या दोन्ही बाजूंवर परिणाम करणारे झटके).
– सामान्यीकृत (जनरलाइझ्ड) झटके : यामध्ये टॉनिक-क्लॉनिक सीझर्स (संपूर्ण मेंदूवर परिणाम करणारा झटका), अबसेन्स सीझर्स (यामध्ये लघुकाळासाठी व्यक्तीला अंधारी येते किंवा ती एका ठिकाणी टक लावून बसते), मायोक्लोनिक सीझर (स्नायूंना धक्के देणारा झटका), ऍटॉनिक सीझर (यामध्ये विकलांगता येण्याची शक्यता असते) आणि अज्ञात प्रकारचे झटके.

ऍबसेन्स सीझरमध्ये एरवी प्रामुख्याने दिसणारे आचक्यांचे लक्षण दिसून येत नाही. यामध्ये रुग्णाचे भान अचानक जाते आणि काही काळाने परत येते. काही वेळा हा झटका येऊन गेल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळतही नाही. मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागावर परिणाम होतो आणि कितपत परिणाम होतो यावर अशा प्रकारच्या झटक्याचे वैद्यकीय स्वरूप अवलंबून असते. काही वेळा यामुळे गतीविषयक (मोटर) कार्यावर, संवेदनेवर, सावधतेवर, आकलनावर, स्वयंचलित कार्यांवर किंवा या सर्वांवर परिणाम होऊ शकतो.

अपस्मारावर केल्या जाणारे पारंपरिक उपचार प्रामुख्याने लक्षणात्मक (सिम्प्टोमॅटिक) प्रकारचे आहेत. यात झटके दाबणारी अपस्मार प्रतिबंधक औषधे दिली जातात. विकाराचे स्वरूप खूपच टोकाचे असेल, तर शस्त्रक्रियात्मक उपचार करून या झटक्यांसाठी कारणीभूत ठरणारी चेतासंस्थांची उत्तेजना दूर केली जाते. अर्थात, एपिलेप्टोजेनेसिस अर्थात अशा प्रकारच्या विचित्र विद्युत हालचालीच्या निर्मितीला प्रतिबंध करण्यासाठी कोणताही प्रभावी उपचार नाही.

अपस्मारावरील पेशीआधारित उपचारपद्धतीचे कार्य
उपचार करता येऊ शकत नाहीत, अशा पूर्वीच्या अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे रिजनरेटिव्ह (पुनरुज्जीवनावर आधारित) वैद्यकशास्त्र आणि पेशींवर आधारित उपचारपद्धती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मेंदूतील काही विशिष्ट पेशींचे नुकसान, यामुळे अपस्माराचे एक कारण आहे, हे तर ज्ञात आहे. मानवी शरीरातील मेसेन्चिमल पेशी स्वत:ची नवनिर्मिती करण्यास सक्षम असतात आणि त्या पेशी अन्य प्रकारांत स्वत:चे विभाजनही करतात. या क्षमतेची मदत ऊतींची समस्थिती (होमिओस्टेसिस) राखण्यासाठीही होते आणि नष्ट झालेल्या चेतापेशी पुन्हा निर्माण करण्यासाठी व नुकसान पोहोचलेल्या ऊतींमध्ये दुरुस्ती करण्यासाठीही होते. मेसिन्चिमल पेशींमध्ये मज्जासंस्थेतील आपल्या आजूबाजूच्या पेशींचे कार्य सुधारण्याची पॅराक्राइन क्षमता असते आणि स्वत:मधून वाढणारे (एण्डोजेनस) घटक पुरवून या पेशी अपस्माराला कारणीभूत ठरणार्‍या घटकांना अटकाव करू शकतात.

पेशीआधारित उपचारपद्धतीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे यात शस्त्रक्रिया खूप कमी आहे. यामध्ये रुग्णाच्या स्वत:च्याच पेशी वापरल्या जात असल्याने (ऑटोलॉगस) ती सुरक्षित आणि प्रभावी आहे. मेसिन्चिमल पेशी हानी झालेले ठिकाण (अपस्मारजन्य घटकांचा भाग) शोधून तिथे स्थलांतर करू शकतात आणि तेथील पेशी व ऊतींचे पुनरुज्जीवन करतात. मेसिन्चिमल पेशींच्या विभाजनातून परिपक्व चेतापेशी तयार होतात आणि त्या नष्ट झालेल्या पेशींची जागा घेऊन अपस्माराच्या झटक्यांवर नियंत्रण मिळवतात. शिवाय, मज्जासंस्थेतील ऊतींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणारे घटक निर्माण करून मज्जासंस्थेचे संरक्षण करणार्‍या घटकांना या पेशी उत्तेजन देतात; त्याचप्रमाणे अपस्माराच्या रुग्णांमधील झटके व आकलनविषयक बिघाडांवर नियंत्रण मिळवून देण्यासाठी रोगप्रतिकार यंत्रणेला मदत करतात.

चेतापेशींवर आधारित उपचारपद्धतींनी झालेले लाभ दीर्घकाळ टिकणारे ठरतात. कारण, ते केवळ लक्षणे नाहीशी करून थांबत नाहीत तर परिणाम झालेल्या संपूर्ण संरचनेचे पुनरुज्जीवन करतात. शरीरातील आण्विक यंत्रणा अधिक चांगल्या समजून घेऊन आणि पेशी, पेप्टाइड्स व वाढीसाठी कारणीभूत घटकांचा वापर करून आपण व्यक्तीनुसार चेतापेशी आधारित उपचारांमध्ये बदल करू शकतो.