अपराजित भारताची लढत आज बांगलादेशशी

0
163

>> अंडर-१९ विश्वचषक

गट फेरीतील तीनही सामने सहज जिंकत अपराजीत वाटचाल करीत असलेल्या पृथ्वी शॉच्या नेतृत्वखालील भारतीय युवा संघाची आज अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशशी लढत होणार आहे.

भारताने गट फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी मात केली होती. त्यांनंतर दुसर्‍या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा धुव्वा उडविला होता तर तिसर्‍या व शेटवच्या लढतीत झिम्बाब्वेच्या संघाला सहज नमवित उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात धडक मारली होती. आता आज होणार्‍या उपांत्यपूर्व लढतीत पृथ्वीच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघ बांगलादेशलाही नमवित स्पर्धेतील आपले विजयी अभियान कायम राखण्यासाठीच मैदानावर उतरणार आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर ३० जानेवारी रोजी त्यांची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाविरुद्ध होणार आहे.

आज होणार्‍या लढतीत विद्यमान उपविजेता भारतीय संघाची भिस्त आपल्या फलंदाजांवर असेल. संघाचे नेतृत्व समर्थपणे करीत असलेल्या पृथ्वी शॉने आतापर्यंत खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यात १०८.६३च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा बनविलेल्या आहेत. दुसरा सलामीवीर शुबमन गिलवरही मोठी जबाबदारी असेल. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ६३ धावांची अर्धशतकी खेळी होती. तर झिम्बाब्वेविरुद्ध ९० धावा नोंदवित संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
गोलंदाजीच्या विभागात के. एल. नागरकोटी आणि शिवम मावी चांगला मारा करीत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागरकोटीने ४ गडी बाद केले होते. परंतु तो आपल्या लाईन लेंथवर संघर्ष करताना दिसून येत आहे. फिरकीच्या विभागात डावखुरा गोलंदाज अनुकूल रॉयवर मोठी जबाबदारी असेल. रॉयने पापुआ न्यू गिनीविरुद्ध ५ तर झिम्बाब्वेविरुद्ध ४ बळी मिळविले होते.

दुसर्‍या बाजूने बांगलादेशनेही स्पर्धेतील आपली सुरुवात चांगली केली होती. पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर मात केली होती. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता त्यांचा सामना स्पर्धेतील बलाढ्य संघापैकी एक असेलेल्या भारतीय संघाशी होणार आहे. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या द्रुतगती गोलंदाजांविरुद्ध सावध खेळावे लागेल. विशेष करून तौहिद हिरदॉय आणि असिफ हुसैन हे चांगली गोलंदाजी करीत आहेत.

संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः भारत : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमन गिल, आर्यन जुयाल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, हार्विक देसाई, मनजोत कालरा, कमलेश नागरकोटी, पंकज यादव, रियान पराग, ईशान पोरेल, हिमांशु राणा, अनुकूल रॉय, शिवम मावी, शिवा सिंग.

बांगलादेश : सैफ हुसैन (कर्णधार), अफिफ हुसैन, अमिनुल इस्लाम, हसन महमूद, माहिदुल इस्लाम अंकोन, मोहम्मद नईम, मोहम्मद रकिब, नाईम हसन, पिनाक घोष, काजी ओनिक, रोबिउल हक, रोनी हुसैन, शकील हुसैन, टीपू सुल्तान, तौहिद हिरदॉय. दरम्यान, आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीरोजी बंगळुरुत होणार आहे आणि त्यात भारताच्या अंडर-१९ संघातील काही खेळाडूंना चांगल्या रकमेची बोली मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.