अपना घरमधून पळालेल्या मुलांना ९ तासांत ताब्यात

0
220

ओल्ड गोवा पोलिसांनी मेरशी येथील अपना घरातून पलायन केलेल्या सहा मुलांना जलदगतीने कृती करून साधारण ९ तासांत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहेत. अपना घरासाठी बांधण्यात आलेल्या नवीन सुसज्ज इमारतीतून मुलांनी पलायन करण्याची ही पहिली घटना आहे. मुलांनी साधारण २० फूट उंचीच्या भिंतीवर चढून पलायन केले.

सहा मुलांनी पलायन करण्यासाठी खिडकीचा ग्रील्स काढला आणि पहिला मजल्यावरून बेडशीटचा वापर करून तळमजल्यावर उतरले. त्यानंतर २० फूट उंच संरक्षक भिंतीवर चढण्यासाठी बेडशीटचा वापर केला. मुलांनी पलायन करण्यापूर्वी केअर टेकर राहत असलेल्या डॉमेट्रीला टाळे ठोकले. त्यामुळे केअर टेकर आतमध्ये अडकून पडले, अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांनी दिली.

दि. १८ फेब्रुवारीला रात्री पावणेदहाच्या सुमारास ६ मुलांनी पलायन केले. त्यानंतर रात्री १०.३० वाजता ओल्ड गोवा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई, पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकामाला सुरुवात केली. मध्यरात्री २ च्या कदंब पठारावरील गेरा स्कूलजवळ पळालेल्या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पलायन केलेले अन्य तिघे रेल्वेने मुंबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. बुधवारी सकाळी रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सहा जणांची पुन्हा अपना घरात रवानगी केली. कळंगुट पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी सहाही जणांना पकडून अपना घरात दाखल केले होते, अशी माहिती देसाई यांनी दिली.

अपना घराच्या बाहेरच्या बाजूची अपूर्णावस्थेतील संरक्षक भिंत बांधणे, कुंपणावर गोलाकार लोखंडी तारा बसविणे आणि अपना घराच्या मुख्य इमारतीच्या बाहेरच्या बाजूला विजेची सोय करण्याची सूचना संबंधितांना केली जाणार आहे, असेही देसाई यांनी सांगितले.