अनेक राज्यांतील एटीएममध्ये खडखडाट

0
186

उत्तर प्रदेशसह देशातील ९ राज्यांमध्ये चलनतुटवडा निर्माण झाला आहे. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड आदी राज्यांतील अनेक एटीएमबाहेर ‘नो कॅशचे बोर्ड’ लागले आहेत. अचानक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली असून रोकड असलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने काही ठिकाणी रक्कम पोहचवण्यात येणार्‍या अडचणींमुळे रोख चलनाचा तुटवडा होत असल्याचे स्पष्टीकरण दिले असून नोटा छपाईचा वेगही वाढवण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

भोपाळ, पाटणा, लखनऊ आणि अहमदाबादेतील कित्येक एटीएममध्ये ठणठणाट आहे. यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकार्‍यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेकडून रोखीचा प्रवाह थांबल्याने ही परिस्थिती तयार झाली. ती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे एका बँक अधिकार्‍याने सांगितले.

हैदराबादेत एटीएममध्ये पैसे न असल्याची लोकांच्या तक्रारी आहेत. काही नागरिक शहरातील अनेक परिसरांतील एटीएममध्ये गेले, परंतु कुठेही पैसे काढता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात काही ठिकाणी एटीएममध्ये नोटांची कमतरता आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यामागे मोठे षड्‌यंत्र असल्याचा आरोप आहे.

गुजरातेतही बँकांमध्ये रोखीची चणचण आहे. फक्त १० दिवसांपूर्वीच हे संकट गुजरातच्या उत्तर गुजरातेतून होते. परंतु आता पूर्ण राज्यात याचा परिणाम आहे. बँकांनी नगदी काढण्यासाठी मर्यादा ठरवली आहे. बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. लग्न आणि शेतकर्‍यांना पिकांचा मोबदला मिळण्याची वेळ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. बिहार, झारखंडमध्ये नगदीची कमतरता आहे.

तात्पुरती परिस्थिती : जेटली
देशात रोखीच्या चलनाचे कुठलेही संकट नाही. बाजारात आणि बँकांमध्येही पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. काही ठिकाणी नोटांची मागणी अचानक वाढल्याने एटीएममधील रोकड संपली आहे. मात्र, ही तात्पुरती परिस्थिती आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असा खुलासा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.

गोव्यात परिणाम नाही
देशातील काही राज्यांमध्ये चलन तुटवडा निर्माण झालेला असला तरी तूर्त गोव्यात चलन तुटवड्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. राजधानीतील एटीएमच्या काल रात्री करण्यात आलेल्या एका पाहणीत चलन उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. पणजी, म्हापसा, मडगाव, फोंडा, वास्को येथील एटीएममध्ये आवश्यक कॅश होती. कुठेच पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा नव्हत्या.