अनुभूतीची ‘चिगूर’ फुले

0
388

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

संजीवनी तडेगावकर या नव्या पिढीतील नामवंत कवयित्री. ‘शब्द व्हावे अमृताचे गीत हे गगनातले’ हे ब्रीद घेऊन त्या कवितेच्या क्षेत्रात उतरल्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पाऊलखुणा त्यांनी उमटविल्या.

संजीवनी तडेगावकर या जालन्याच्या. नव्या पिढीतील त्या नामवंत कवयित्री. ‘शब्द व्हावे अमृताचे गीत हे गगनातले’ हे ब्रीद घेऊन त्या कवितेच्या क्षेत्रात उतरल्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या पाऊलखुणा त्यांनी उमटविल्या. स्त्रीमनाचे पापुद्रे उलगडून दाखविणारी त्यांची मनस्वी कविता स्वतःचा चेहरा घेऊन आली आहे. ‘फुटवे’ या कवितासंग्रहात हे रंगतरंग उमटले आहेत.

तडेगावकरांनी ललितनिबंधही लिहिले आहेत. ‘चिगूर’ हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. या ललितनिबंधांत शैलीदृष्ट्या काव्यात्म वृत्ती मुरवून घेतली आहे. ‘चिगूर’मध्ये तेरा ललितनिबंध आहेत. ते स्त्रीच्या भावविश्‍वाभोवती गुंफलेले आहेत. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका बोलकी आहे. तिच्यात तडेगावकरांनी म्हटले आहे- ‘‘गाववडाच्या पारंब्या ज्यांच्या हातून निसटल्या त्या सर्व मुलींना…’’ त्यांच्या ललितनिबंधलेखनामागची प्रेरणा कोणती? या लेखनाची सृजनप्रक्रिया कशी चालते याविषयीचे कुतूहल आपल्या मनात निर्माण होते. लेखिकेचे मनोगत यासंदर्भात महत्त्वपूर्ण ठरते. ती म्हणते ः
‘‘माझा भूतकाळ, वर्तमानकाळ, भोवताल, माझं अनुभवविश्‍व, माझ्यापुरतं संपन्न, समृद्ध. म्हणून मी कुरूपतेतही सौंदर्य न्याहाळते. हे कलासक्त मनच माझ्या सौंदर्यासक्तीची भूक भागवीत असते. ‘डोळे सगळ्यांनाच असतात, दृष्टी फारच क्वचितांना असते’ असं काहीतरी गुरुजींनी वर्गात सांगितलं होतं. त्यामुळंच काळ्या मातीतले हिरवे कोंभ माझ्या अंतरी सुख-दुःखाची पेरणी करीत असतात. त्याचं तरारलेपण, झुलणं, फुलणं, रंगरूपातून आकाराला येणं, हे मी खूप बारकाईनं पाहते.’’

एका परीने लेखिकेने आपल्या संवेदनस्वभावामुळे वाचकाला मर्मदृष्टी दिलेली आहे. तिच्या ललितनिबंधांचे अंतरंगदर्शन घेताना ती सहाय्यभूत ठरते. दिव्याविषयीचे लेखिकेला फार आकर्षण. पण त्याच्या प्रकाशापेक्षा दिव्याचे जळणे तिला अधिक भावते, छळतेदेखील. ‘दिव्यासारखं जळावं लागतं तेव्हा कुठं कळतं’ या विधानातील ‘कळतं’ या शब्दातील व्याप्ती खरं तर जळण्यात सामावली होती. जीवजाळी, पोटजाळी अशा वाक्प्रचाराचे संसाररूपी अर्थ मला सापडले, तेसुद्धा दिव्यातच. ‘‘पावसाळी दिवसांत आभाळ भरून येत असे. काळ्याकुट्ट अंधारात जवळचं दिसेनासं होई; पण घरातल्या चिमणीवर झडप घेऊन मरून पडलेल्या पाकोळ्यांचा तडफडाट मला उसवून टाकी. पहाटच्या झाडलोटीत मी जड अंतःकरणानं झडल्या पंखपाकोळ्यांना ढकलीत असे. त्यांची मरणवेदना मी जवळून पाही.’’

माणसांसाठी जळणार्‍या तेलवाती लेखिकेने अनेक ठिकाणी जळताना पाहिल्या; पण नवरात्रासाठी जळणारी दीपमाळ आठवली की काळजात घर करून बसलेले गावचे शिवार उजळून निघते, असे लेखिका उद्गारते. या सार्‍या आत्मलेखनाला चिंतनगर्भ शैलीची तेवढीच आत्ममग्न डूब मिळालेली आहे. आत्मनिर्भर शब्दांत ती जे उद्गार काढते त्यांत लोभसवाणा स्वर सामावलेला आहे ः
‘‘मी कधी कुणाच्या मुळावर उठले नाही. ठरवूनही कुणाला काही मागितलं नाही. जळणं, जाळणं मला जमलं नाही. न मागता मी आयुष्याला देत राहिले. सुख-दुःखातही स्वतःला उजळून- पाजळीत राहिले, दिव्यासारखं. दिवा माझा जिवलग म्हणून मी जिवापाड जपला आहे.’’

हिरवी पाने कोणत्या संवेदनशील, रसिक माणसाला आवडणार नाहीत? लेखिका तर हिरव्या रंगात आणि हिरव्या पानांत जीवनाचे रहस्य उलगडते. ती म्हणते ः ‘‘मला झाडवेली आवडतात त्याच मुळी पानांमुळं. हिरव्या रंगाच्या नाना छटा मी विविध रूपांच्या, आकारांच्या पानांत पाहते. हिरव्या पानातली कोवळी लुसलुशी तर मला चैतन्यदायी वाटते.’’ या हिरव्या वैभवाचे आल्हाददायी दर्शन तिच्या शब्दाशब्दांमधून घडते. लेखिका काव्यात्म शैली आपल्या लेखनात मुरवून घेते याचे वानगीदाखल एक उदाहरण ः
‘‘झाडाची चैतन्यमयी सळसळ पानापानांतून तरारते तेव्हा जणू पानंच गातात. अंतर्बाह्य जीवनरसाची गाणी आणि तिथंच मला कविता सापडते. जीवन म्हणजे ‘भल्या पहाटे पानावर सांडलेलं पाणी, आयुष्य म्हणजे सळसळती गाणी.’ न सांगता ओघळून जाणं हा पाण्याचा गुणधर्म; पण काहीकाळ दव होऊन धरून ठेवणं हे फक्त पानांनाच ठाऊक.’’
आयुष्यातील हिरव्या पानांच्या आठवणी आंजारत-गोंजारत लेखिकेच्या या हिरव्या गानाचा निवेदनप्रवाह पुढे सरकतो. निसर्गाची ल्हादैकमयी रूपकळा चित्तवृत्ती प्रसन्न करते. अधूनमधून लेखिकेचे कृतज्ञतेने ओथंबलेले शब्द येतात ः
‘‘…मग त्या हिरव्या शालूवर फुला-फळांची कुठलीही रंग-नक्षी निघो, मला त्याचं काहीच वाटत नाही. अजूनही जेव्हा-केव्हा माझ्यासाठी पानापानांतून मनभरल्या हिरवाईचं उधाण येतं, तेव्हा तेव्हा माझ्या कवितेचं गाणं होतं.’’
‘चिमणी’ या ललित निबंधात चिमण्यांचे जग लेखिकेने आपल्या काव्यात्म शैलीत सजग केले आहे. या अनुषंगाने तिने आपल्या गोदेकाठच्या माहेराच्या आठवणीही जागवल्या आहेत. त्या मुळापासून वाचणे हा एक आनंदानुभव आहे. ती म्हणते ः ‘‘…उंबराच्या वाढत्या सावलीनं घरअंगणातील माणसांना आधार दिला. पावसाळी दिवसांत त्याला आलेली बारीक उंबरफळं आणि त्यासाठी गावभरच्या चिमण्यांचा चिवचिवाट त्याच्या अंगाखांद्यावर खेळत असे.’’
चिमण्यांच्या क्रीडाविलासाचे लेखिकेने तन्मयतेने केलेले वर्णन आपल्याला एका निरागस विश्‍वात घेऊन जाते. तिने रंगविलेल्या तपशिलांमधून तिची निरीक्षणशक्ती प्रत्ययास येते.

पावसाचे आणि लेखिकेचे अभिन्न नाते. पहिलाच संदर्भ येतो तो आईच्या उद्गाराचा. लेखिकेच्या पहिल्या बाळंतपणी तिला न्हाऊ घालताना ती म्हणाली होती ः ‘‘तू जन्माला आली तीच मुळी पाऊस घेऊन.’’ लेखिका म्हणते ः ‘‘हाडामांसाच्या माझ्या गोळ्यानं ओठांवर पडलेला पाऊसथेंब चुंबला होता. तेव्हापासून पाऊस माझ्या आत आणि मी पावसात असा प्रवास सुरू झाला.’’ पुढे ती असेही उद्गारते ः ‘‘कुठल्या जन्माचा ऋणानुबंध होता त्याचा माझ्याशी, अजूनही कळत नाही; पण अशा खूप गोष्टी आहेत. तो जेव्हा मला यावा असं वाटतं तेव्हा पाऊस माझ्याभोवती निनादत राहतो.’’
लेखिकेच्या अंतर्मनात पावसाळी सांज दाटून येते… तिलाही कुठल्या भूतस्मृतीचे मनात एकाएकी दाटून येते… तसे आतले आभाळ फाटते…. ओळी पाझरायला लागतात. कविता लिहून होते ः
झाले मी पाऊसपक्षी मुक्त गाते नित्य गाणे
झोलते मी पावसाच्या अक्षतांचे लक्ष दाणे

धारेत मी पावसाच्या पाय सोडून राहते
नक्षत्र मी पावसाचे क्षितिज माझ्यात नाहते
अशी ही पावसाची कविता. असा हा कवितेतील पाऊस सचैल स्नान घडविणारा… सुवासिनींच्या जीवनात कुंकवाचे महत्त्व काय असते त्याचे वर्णन ‘कुंकू’ या ललितनिबंधात येते. लेखिका म्हणते ः
‘‘दूरच्या प्रवासात तहानेला भेटावा पाणोठा आणि उन्हाला सापडावी सावली तसं आयुष्याच्या प्रवासात मला वेगवेगळ्या ठिकाणी कुंकू भेटत गेलं. वटसावित्रीच्या पुनवेचं व्रतवैकल्य अनुभवताना खणानारळाची ओटी आणि झाडखोडाला बांधलेला दोरा. त्या गुंतावळीत गावभरच्या आयाबाया बारमाही गुंतत. त्या झाडाखाली उभं राहून कुंकवाचं अहेव लुटताना मी खूपदा पाहिलं.’’
लेखिकेचे वडील शेतकरी. त्यामुळे मातीमाणसाचे तिच्यावर संस्कार झाले. तसेच संतसाहित्याचेही. वारकरी संप्रदाय तिच्या वडिलांनी जपला होता. ते आषाढी-कार्तिकीच्या वारीला जात. पंढरपूरहून येताना पडशीत लाह्या-बुक्क्याच्या प्रसादासोबत तुकारामांच्या दुःखवेदनेची गाथा त्यांनी आणली होती. त्यांच्या पायावर श्रद्धेने माथा टेकवून लेखिकेने विचारले होते ः ‘‘दाजी, माझ्यासाठी काय आणलं?’’ तेव्हा पडशीतून रंगाच्या आणि सोनेरी बुट्टी काढलेल्या लाखाच्या बांगड्या त्यांनी बाहेर काढल्या. लेखिकेला मांडीवर घेऊन त्यांच्या हातानेच तिच्या चिमुकल्या हातांत घातल्या. तेव्हापासून तिला बांगड्यांचे रंग-आकार आणि त्यावरील सोनपिवळ्या नक्षीचे वेड लागले. ते पुढेही टिकले.
या बांगड्यांच्या अनुषंगाने लेखिकेच्या चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. जीवनाच्या विविध क्षेत्रांत ती वाचकाला हिंडवून आणते.

संजीवनी तडेगावकरांच्या ललितनिबंधांतील भावविश्‍वात त्यांचे शालेय जीवन आहे. काठोकाठ समृद्धीने भरलेले बालपण आहे. कुटुंबवेल्हाळ जीवनाची नितांत रमणीय संस्मरणे आहेत. ‘घागर’ ही संज्ञा उच्चारल्याबरोबर अनेक भावस्पंदने मनात जागी होतात. ती जलप्रवाहात बुडताना निर्माण होणारी वलये दृग्गोचर होतात. नादवलये आठवतात. घागर अधांतरी राहूच शकत नाही. ‘घागर’ या ललितनिबंधातील

लेखिकेच्या मनात निर्माण झालेले संवेदन पाहा ः
‘‘मला भरून ठेवलेला हरभर्‍याचा डबा हवा होता आणि त्याच्या शोधात रिकामी घागर हाताला लागली. तिच्या भावविश्‍वात मी बुडाले. लगोलग घागरीची होऊन हरवलेल्या काळासोबत पाझरत राहिले. एखादा चित्रपट पाहताना एकानंतर एक प्रसंग पाहून डोळे ओले व्हावेत तशी मी घागर होऊन आठवणींच्या बारवेत उतरले खोल, तशी सापडत गेली माझ्या जिवाला तिच्या पाझरांची ओळ.’’
स्त्री आणि घागर… दोहोंमध्ये आढळणारी एकात्मता… तिच्यातून व्यक्त होणारी स्त्री-जाणिवेची पृथगात्मता. या चिंतनातून लेखिकेला गवसलेले भावसत्य… ‘जळणार्‍या बाईला विझवते ती फक्त घागरच.’
– आणखीन एक अनुभव… लेखिका दो जिवाची होती. पाणी भरण्यासाठी घागर घेऊन ती निघाली तेव्हा पाण्यात पाहणारी सासूही तिला म्हणाली, ‘‘भरल्या घागरीचं अवजड ओझं आता तू उचलू नकोस.’’ लेखिकेला क्षणभर वाटले आता यापुढे पाणी ती भरील. पण तिने घागर घेऊन लेखिकेच्या हाती कळशी दिली. उरलेल्या महिन्यांत ती कळशीनं रांजण भरण्याचा खेळ खेळत राहिली.
‘आंब्याची कोय’ या ललितनिबंधात सृजनाचा कोवळा कोंभ रुजल्याची अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती आहे. लेखिका उद्गारते ः
‘‘मातीपावसाच्या नात्याप्रमाणे घट्ट माझे आंब्याशी ऋणानुबंध. सणावारालाही तो माझ्या दारावर हिरव्या पानांच्या तोरणात झुला होऊन झुलत राहतो. आनंदाची माझ्या अंगणात बारमाही गुढी उभारतो.’’
‘ऊन’ या ललितनिबंधात निवेदन येते ः
‘‘एकदा चित्रकलेच्या वर्गात गुरुजींनी उन्हाचा सूर्य काढायला सांगितला होता, तर मी माझ्या इच्छेनं सावलीचं झाड काढलं. रागानं वैतागून गुरुजींनी मला शिक्षा म्हणून शाळेपुढं उन्हात उभं केलं. त्याचे अंगाला चटके आणि पायपोळ खूप असह्य झाली. या त्रासदायी उन्हामुळेच तर मी सावलीचं झाड काढलं होतं. माझं काय चुकलं?’’
या ललितनिबंधाचा शेवट बघावा. चिंतनाच्या परमोच्च बिंदूला लेखिकेने तो नेऊन भिडविला आहे.
झुलाविषयी मुलींना वाटणारे आकर्षण अत्यंत नैसर्गिक. झुल्यासारखेच तरल मन या वयात तिला लाभत असते. माहेरवाशीण मुले-नातवंडे झाली तरी तेथील झुल्याच्या आठवणी विसरत नाही. त्या झुल्यावर ती झुलत राहते.

लेखिकेचे चिंतन आणि संवेदन पुढील निवेदनात एकवटून येते ः
‘‘माझं बालपण त्याच वडाच्या पारुंबीला झोका घेत झुलत राहिलं. त्यानंही खूपदा लडिवाळपणे मी न झोका घेताच झुलविलं. त्याच्या पारुंबीच्या झोक्यावर झोके देता-घेताच मी लहानाची मोठी झाले. माझ्या आधीच्या अनेक लेकीबाळीसारखंच मलाही त्यानं वाटी लावलं.
मी सासरची झाले. अजूनही माझं मन माहेराला जातं आणि वडाच्या पारुंब्यांचे दोन झोके घेऊन येतं. नवलाईच्या दिवसांत मला नवतीची पालवी फुटली. त्यामुळं माझ्याआतला झुला कविता होऊन झुलत राहिला.’’
असे मागच्या आठवणींचे अनेक झोके या ललितनिबंधात लेखिकेने घेतले आहेत. ते हृद्य वाटतात. स्त्रीमनाच्या कोवळ्या पापुद्य्रांचे दर्शन घडवितात.
फुलांविषयीचे लेखिकेचे ममत्व अशाच उत्कटतेचे. तिच्याच शब्दांत ते समजून घ्यायला हवे. ‘‘रातराणी, चमेली, मोगरा, जाई, जुई या फुलांच्या गंधाशिवाय स्त्रीचं दरवळणं म्हणजे फुलाशिवाय फुलपाखरू. म्हणून ती माळलेल्या फुलात गुंतून राहते. तो गुंता तिनं ठरवलं तरी उकलविता येत नाही. तिच्या मनाचे अगणित पीळ बहुधा उकलत असतील ते फक्त उमलत्या पाकळ्यांतून.’’
फुलांचे कितीतरी संदर्भ लेखिकेने काळजाच्या कुपीत बंद केले आहेत. अनेकांत एक असतो असा पुरून उरलेला फुलांचा एक अनुभव. लेखिकेच्या शब्दांतूनच तो टिपावा लागतो… सांगावा लागतो. असे हे या लेखिकेचे हळुवार मन.
फुलपाखराच्या आठवणी अशाच अलगद लेखिकेने टिपलेल्या आहेत. ‘फुलपाखरू’ या ललितनिबंधात त्या नखशिखान्त पाहाव्यात. लेखिका म्हणते ः
‘‘फुलपाखरांना आवडतात फुलं म्हणून मी मुद्दामच अंगणात लावते फुलझाडं. सांज-सकाळ पाहते वाट फुलपाखरांची. एखादं येतं, बसतं, जवळ दिसतं. अगदी त्याच्यासारखंच माणसाचा पुनर्जन्म नाकारणारी मी वेडेपणानं पुनर्जन्म स्वीकारते. जणू त्यानं मला अजून सोडलं नाही.’’
शेवटचा ‘घर’ हा ललितनिबंध मनात घर करणारा. घराविषयीचे अनेक भावसंदर्भ येथे आलेले आहेत. लेखिकेचे मन, तिची संवेदनशीलता आधुनिक आहे. पण तिचा मनःपिंड घरपरंपरेने घडविला आहे. म्हणूनच ती घराचे संचित पुनः पुन्हा आठवते. इथे फक्त एकच घर नाही. अनेक घरे आहेत. अनेक गृहकळा आहेत. त्यामुळे यातील निवेदनाला स्वप्नसृष्टीचा सुवास आहे; तसाच वास्तवाचा कठोर वारा आहे. गावनदीच्या महापुरामुळे पळविलेली घरेदेखील येथे आहेत. लेखिकेचा करुणामय हात अनेक मानवी अनुभवांवरून सहजगत्या फिरलेला आहे. त्यादृष्टीने ‘घर’मधील तपशील पाहावेत. डोळ्यांचे काठ ओले होतील. अंतःकरण द्रवेल.

आजच्या आधुनिकीकरणाच्या जमान्यात अनेक ‘घरे’ मोडली जाताहेत. अशावेळी लेखिकेचे प्रगल्भ चिंतन नवी दिशा देणारे आणि अंतर्मुख करणारेही…
‘‘गावभरची स्वतंत्र अस्तित्व नसलेली आणि एकमेकांत मिसळलेली अशी कितीतरी घरं अजून आठवतात. एकमेकांना आधार देत-घेत जणू गावाचं गावपण त्या घरांमुळंच. त्यातले कितीतरी अलग-विलग आणि कितीतरी एकमेकांवर रेलून सगळे मातीचे म्हणून मातीचाच आधार. म्हणून माझं घरही मनासारखं.’’
लेखिका घर बांधून फाटकाआत बंदिस्त आणि चिमणी घरटं सोडून मुक्त. अशा क्षणी लेखिकेच्या मनात तरंग उमटतात ः
‘‘तिला घरटं सोडून जाताना पाहिलं तेव्हा क्षणभर वाटलं जन्म घ्यावा तर तो फक्त चिमणीचा. भयमुक्त आभाळ पंखावर घेऊन झाडफांदीला नित्य नवं घरटं बांधण्यासाठी.’’
‘चिगूर’मधील भावविश्‍व आत्मनिर्भर वृत्तीने अभिव्यक्ती करणारे आणि आधुनिक काळात स्त्रीमनाचा शोध घेणारे. या अभिव्यक्तीचा गोडवा काव्यात्म आशयामुळे दुणावला आहे.