अनिल काकोडकर यांच्या कार्यनिष्ठेचा आदर्श

0
533

एडिटर्स चॉईस
– परेश प्रभू

सुविख्यात अणुशास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांचे त्या क्षेत्रातली योगदान नेमके काय आहे, किती आहे आणि त्याचे मोल काय आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर काकोडकरांचे ‘फायर अँड फ्यूरी’ हे आठवणीपर पुस्तक वाचायलाच हवे.

सुविख्यात अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण अनिल काकोडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हा गोमंतकीयांना निश्‍चितच अभिमान आहे. ते मध्य प्रदेशात जन्मले असले आणि महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी राहिली असली, तरी गोवा मुक्तिलढ्यातील एक स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम काकोडकर यांचे ते सुपुत्र असल्याने गोव्याशीही त्यांचे दृढ नाते आहे. २०१० सालच्या ‘गोमंतविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करून गोव्यानेही त्यांच्या कर्तृत्वाविषयीचा हा अभिमान व्यक्त केलेला आहे. मात्र, अणुऊर्जा क्षेत्रातील काकोडकर यांच्या कार्याविषयी गोमंतकीयांना मोघम माहिती असली, तरी प्रत्यक्षात हे योगदान नेमके काय आहे, किती आहे आणि त्याचे मोल काय आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर प्रकाशनाच्या वाटेवर असलेले काकोडकरांचे ‘फायर अँड फ्यूरी’ हे आठवणीपर पुस्तक वाचायलाच हवे.
काकोडकर २००९ साली राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी आपल्या एकूण कारकिर्दीच्या आठवणी या पुस्तकाद्वारे जनतेपुढे आणल्या आहेत.

आई कमला काकोडकर हिचे आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान, पतीला गोवा मुक्तिलढ्यात भाग घेतल्याबद्दल झालेल्या नऊ वर्षांच्या शिक्षेनंतर आणि पुढील काळात पतीशी विसंवाद झाल्यानंतर तिने एकटीने आपल्या मुलांसह केलेल्या जीवनसंघर्षाची कहाणीही काकोडकरांनी यात सांगितली आहे. वर्ध्याच्या सेवाग्राममधील महिलाश्रमामध्ये वास्तव्य करीत असतानाच तिने कर्वे विद्यापीठातून मॅट्रिक्युलेशनची परीक्षा दिल्याने हे आश्रमजीवनाच्या संकेतांशी विसंगत असल्याने तिच्यावर टीका होते, गांधीजींपर्यंत तक्रार जाते, तेव्हा गांधीजी मूकपणे तिच्या तोंडात मिठाईचा तुकडा ठेवून हा वाद कसा मिटवतात तेथून या आठवणी आपल्या मनाची पकड घेत जातात.
काकोडकरांचा अंगभूत स्वाभिमान, बाणेदारपणा, कार्यनिष्ठा, खंबीरपणा आणि भारताच्या अणुऊर्जेतील स्वयंपूर्णतेमध्ये त्यांनी दिलेले योगदान याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून आपल्याला घडते.

अभियांत्रिकी शिक्षणानंतर खासगी नोकर्‍या चालून येत असताना केवळ तेथे मालकांची रोज हांजी हांजी करावी लागेल म्हणून ते त्या काळात तुच्छ गणल्या जाणार्‍या सरकारी नोकरीचा पर्याय स्वीकारतात आणि भाभा अणुसंशोधन केंद्राचा पर्याय निवडतात. वैयक्तिक उत्कर्षासाठीच त्यांची ही निवड सार्थ ठरते असे नव्हे, तर एकूण राष्ट्रीय अणुऊर्जा कार्यक्रमामध्येही एक शास्त्रज्ञ म्हणून मोठे योगदान देण्याची संधी त्यामुळे काकोडकरांना लाभते. हा सगळा प्रवास या पुस्तकामध्ये शब्दांकित करण्यात आला आहे.

सर्व काही शिकून घेण्याची आणि नवे काही करण्याची आस त्यांना भोवतालच्या नकारात्मकतेचा सामना करण्याची प्रेरणा देते. तत्कालीन अपुर्‍या साधनसामुग्रीनिशी ते आपल्यावर सोपवलेल्या जबाबदार्‍या पार पाडत जातात. वरिष्ठांचा विश्वास आणि प्रेम संपादन करतात. अणुभट्‌ट्यांची रचना करण्यामध्ये, त्यांच्यात निर्माण झालेले दोष सोडवण्यामध्ये ते योगदान देतात. ‘ध्रुव’ हा भारताचा पहिला रिसर्च रिऍक्टर निर्माण करण्याची कामगिरी ते यशस्वीपणे पार पाडतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे १९७४ साली झालेल्या पहिल्या अणुचाचणीमध्ये आणि नंतर वाजपेयींच्या काळात ९८ साली झालेल्या दुसर्‍या अणुचाचणीमध्येही योगदान देण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला येते. तो सारा अनुभव वाचनीय आहे.
भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने कठोर निर्बंध लादले, तारापूरच्या अणुप्रकल्पाचा युरेनियम पुरवठा बंद पाडला जातो, देशांतर्गत युरेनियमच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर गंभीर समस्या उभी राहते तेव्हा पर्यायी इंधनाचे प्रयोग ते करतात. त्यात यशस्वीही होतात. पुढे युरेनियमऐवजी थोरियमचा इंधन म्हणून वापर करण्याचा प्रयोग केला जातो आणि यशस्वीही ठरतो.

९८ च्या अणुचाचणीवेळी आंतरराष्ट्रीय शक्तींना थांगपत्ता लागू न देता पूर्वतयारी कशी केली गेली, त्याचा तपशील रंजक तर आहेच, परंतु शास्त्रज्ञांच्या कार्यनिष्ठेचाही दाखला आहे. मोठा गाजावाजा न करता ती अणुचाचणी करण्यासाठी पोखरणमध्ये पूर्वीचे दोनच शाफ्ट उपलब्ध असतात तेव्हा त्या परिसरातील कोरड्या विहिरींचा शोध घेतला जातो. त्या मोहिमांसाठी पाळली गेलेली गुप्तता, अडचणींचा करावा लागणारा सामना, कुशन नसलेल्या जीपमधून करावा लागलेला प्रवास, जीपचा फॅन बेल्ट तुटताच वाळवंटातील वनस्पतींचाच दोर बनवण्याची वेळ वाचवण्यासाठी लढवलेली शक्कल हे सगळे प्रत्यक्ष अनुभव अलीकडेच येऊन गेलेल्या ‘पोखरण’ चित्रपटावरही वरताण करणारे आहेत. वेगळ्या नावाने लष्करी गणवेशात वावरतानाही एके ठिकाणी आपले धारण केलेले नाव स्वतःच विसरल्याने व दुसर्‍या एका ठिकाणी एका व्यक्तीने ओळखल्याने उडालेला गोंधळ अशा गमतीजमतीही वाचनीय आहेत.

पारंपरिक अणुचाचणीसोबतच थर्मोन्युक्लियर चाचणीचा आग्रह ते धरतात. डॉ. कलाम यांना ते पटवून दिल्यानंतर तो स्वीकारला जातो. चाचण्या यशस्वी होतात आणि भारतीय सैन्यदलांना अण्वस्त्रांची एक नवी मालिका बनवण्याची संधी त्याद्वारे निर्माण होते, त्याचा त्यांना सार्थ अभिमानही वाटतो. भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने केलेल्या अणुचाचण्या त्यांनी दावा केला त्याहून कमी क्षमतेच्या तर होत्याच, परंतु त्यामध्ये प्लुटोनियमचा झालेला वापर चीनच्या त्यातीस सहभागाची शक्यता दर्शवतात असे मतही काकोडकर यांनी आपल्या या पुस्तकामध्ये मांडले आहे.

काकोडकरांच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा म्हणजे भारत – अमेरिका नागरी अणुसहकार्य करारासंदर्भात त्यांनी स्वीकारलेली भारताच्या अणुकार्यक्रमाची धोरणात्मक स्वायत्तता जपण्याची कणखर भूमिका. सर्व थरांतून विरोधाचे सूर उमटत असताना आणि दबाव असतानाही काकोडकर आपल्या भूमिकेवर ठाम राहतात. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंगही त्यांच्या पाठीशी राहतात. ‘‘काकोडकर नाही म्हणत असतील तर आपण पुढे जाऊ शकत नाही’’ अशी ठाम भूमिका घेतात. ही एकप्रकारे काकोडकरांच्या प्रामाणिक भूमिकेची पोचपावतीच असते. या पुस्तकाला प्रस्तावनाही डॉ. मनमोहनसिंग यांची आहे.

नागरी अणुकरार करीत असताना आपला लष्करी अणुकार्यक्रम हा त्यापासून पूर्ण विभक्त ठेवला गेला पाहिजे, शिवाय नागरी आणि लष्करी अणुकार्यक्रम कोणता हे ठरवण्याचा अधिकारही भारताकडे राहिला पाहिजे असा ठाम आग्रह काकोडकर शेवटपर्यंत धरतात आणि शेवटी अमेरिकेला तो मान्य करावा लागतो. शेवटी करारावर सही करण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश जेव्हा भारतात येतात, तेव्हा काकोडकरांना पाहिल्यावर ‘तुम्हीच का ते काकोडकर? तुम्ही खूश आहात ना?’ असा खोचक प्रश्न करतात!
भारताची अण्वस्त्रसज्जता आणि अणुऊर्जेची आवश्यकता या दोन्ही आघाड्यांवर काकोडकर यांचे योगदान किती मोठे आहे याचे दर्शन या पुस्तकातून घडते. मात्र, या कथनामध्ये कोठेही यत्किंचितही बडेजाव नाही. सामोर्‍या आलेल्या नकारात्मकतेविषयीही त्यांनी फार संयमानेच लिहिले आहे. या सार्‍या कारकिर्दीमध्ये जणू अडथळ्यांची शर्यतच त्यांना पार करावी लागते, परंतु त्याविषयी अकांडतांडवही नाही. जे घडले ते इतिहासकथनाच्या वस्तुनिष्ठ नजरेतून त्यांनी सांगितले आहे आणि या पुस्तकाचे सहलेखक सुरेश गणगोत्र यांनी ते शब्दांकित केले आहे.
पुढील काही प्रकरणांमध्ये काकोडकर यांनी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याची गरज व्यक्त करणारे जे मूलभूत चिंतन मांडले आहे तेही विचारप्रवृत्त करणारे व उद्बोधक आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शेती व इतर क्षेत्रांतील कार्याची माहितीही येथे आपल्याला मिळते.

शेवटी काकोडकरांच्या पत्नी सुयशा काकोडकर आणि भगिनी जान्हवी गांगल यांनी त्यांच्याविषयी भरभरून लिहिले आहे, ज्यातून काकोडकरांच्या व्यक्तिमत्त्वावर अधिक प्रकाश पडतो. अबोल आणि अंतर्मुख वाटणारे काकोडकर आपल्या कुटुंबाप्रती किती संवेदनशील आहेत, त्यांची कार्यनिष्ठा किती अस्सल आहे याची अनेक उदाहरणे त्यांनी त्यामध्ये दिलेली आहेत. केरळमध्ये कौटुंबिक सहलीवर असतानाच दक्षिणेत आलेल्या त्सुनामीमुळे कल्पक्कमच्या शास्त्रज्ञ वसाहतीत पाणी घुसून हानी झाल्याचे त्यांना कळताच ते तडक पुढच्या रेल्वेने तेथे रवाना होतात. याच कल्पक्कमच्या अणुभट्टीत एकदा बिघाड होतो तेव्हा त्याच्या दुरुस्तीसाठी एका दिवसासाठी म्हणून गेलेल्या काकोडकरांना तेथेच आठवडाभर मुक्काम ठेवावा लागतो, तेव्हा रोज रात्री आपले कपडे धुवून वाळवून दुसर्‍या दिवशी तेच घालून पुन्हा अविरत कामाला लागल्याची आठवण त्यांच्या पत्नीने सांगितली आहे. मोठी माणसे ही उगाच मोठी होत नसतात. त्यांच्यामागे अशी कार्यनिष्ठा असते, अशी समर्पितता असते. ध्यास असतो, मेहनत असते याची साक्ष या सार्‍या आठवणी देतात. जीवनामध्ये काही करू इच्छिणार्‍या नव्या पिढीपर्यंत काकोडकर यांचे हे पुस्तक गेले पाहिजे. त्यांनाही त्यापासून नक्कीच प्रेरणा मिळेल!