अधुरी एक कहाणी…

0
161

– लाडोजी परब

पूर्वी गजबजून जाणारं घर आज अगदी सुन्न! कुठलाही विजय अंतिम नसतो आणि पराभव म्हणजे शेवट नसतो. कुठल्याही परिस्थितीत धैर्य हे महत्त्वाचं असतं आणि तेच आयुष्यात कामी येतं. शशिकलाच्या तुटलेल्या आयुष्याला ठीगळं म्हणून कुठं लावणार? धैर्याने, जिद्दीनं तिच्या मुलांनी आता पुढं यायला हवं. तरच एक विश्‍वासरावांचं स्वप्न आणि पिंडदानादिवशी दिलेला शब्द सार्थ ठरेल.

धगधगत्या आयुष्याला मानवी मनाच्या आधाराची किनार लाभली तर होरपळणारे जीवन अर्थपूर्ण बनते. शाळेत जाणार्‍या मुलांना शाळा, मित्र आणि अभ्यास या पलीकडे जग नसतं. माझ्या बघण्यातील विश्‍वासराव, अगदी समंजस, श्रीमंत. एक मुलगा आणि मुलगी आणि पत्नी शशिकला, असा त्यांचा संसार. शेतीवाडी कसण्यास दिलेली. घर निटनेटकं, मुलगा शाळेतही अपटूडेट, चांगले पॉलिस्टर कपडे, बूट, महागडे दप्तर, अडीअडचणींच्या वेळी विश्‍वासराव स्वत: धावायचे. त्यांच्याकडेही उसनवारीसाठी शेजारचे लोक यायचे. मान, सन्मान तर त्या पैशातूनच त्यांना मिळाला होता. मुलगा आता दहावीत होता. पुढे त्याला डॉक्टर करण्याची वडिलांची मनिषा! पण दैव किती अविचारी… शशिकलाचा संसार अर्ध्यावरच मोडला! एका आयुष्याच्या या अधुर्‍या कहाणीने मन सुन्न बनलं, अपेक्षांचे डोंगर कोसळले, आये…माझे बाबा खयं गेले? परत कधी येतले? मुलाच्या आर्त हाकेने आईचं काळीजही पिळवटलं. एका नव्या जीवनाला त्यांना सामोरं जायचं होतं.
दिवस होता आषाढी एकादशीचा! सकाळी विठ्ठलाच्या मंदिरात अभिषेक करून विश्‍वासराव स्वत:च्या कारने तालुक्याच्या ठिकाणी निघाले. दुपारच्या दरम्यान मला फोन आला. विश्‍वासरावांना कँटरनं ठोकरलं. जागीच गेले. प्रेत ताब्यात घ्या. त्यांच्या नातेवाईकांना कळवा. तालुका इस्पितळात त्यांना ठेवलंय. घरात आषाढीचा बेत असल्याने शशिकलाने गोडधोड केलेलं. उपवास धरून शेजारच्यांना रात्री जेवण वाढायचं हा तिचा बेत. गुलाबजाम, जिलेबी, पुरणपोळ्या अन् बरंच काही…चेहर्‍यावर तिच्या अपूर्व आनंद, दाराच्या पायरीशी गेलो तर मुलगा आईला सांगत होता. ‘आई, उद्या रविवार आसा, बाबांका घेवन आम्ही आंबोलीक जावया. आणि येताना वाडीच्या बाजारात माका कपडे घेवचे आसत. त्यावर आई म्हणते, ‘होय रे सोन्या, आता चतुर्थी जवळ येता माझा मंगळसूत्र जरा सोनाराकडसून मोठा करून घेवचा आसा. येताना मावशेकडे जावया, तिच्या चेडवाक झिल झालो, बारसो आसा.’ लाव बाबांका फोन खय पर्यंत इले बघ. तेवढ्यात मी हाक दिली. ‘अरे स्वप्निल खयं तू, आज रात्री जेवणाक ये’ होय, म्हणण्याआधीच मी म्हणालो, ‘तुझ्या बाबांचो फोन इलेलो जरा लेट होतला त्यांका’ ‘अरे पन आमच्या घरातल्या फोनार फोन कित्या करूक नाय तेंच्यानी’, काय उत्तर देणार? मी सांगेपर्यंत वाड्यातली जाणती मंडळी गोळा व्हायला लागली होती. शशिकलाला काय समजेना, पिठाचा हात घेऊनच ती बाहेर आली. काही वेळातच, ऍम्बुलन्स दारात आली. ‘आये कोन आसा गे तेच्यात? म्हणण्याआधीच शशिकलानं कपाळाच्या कुंकवाला पिठाचा हात पुसला. तिकडे मंदिरात आषाढी निमित्त भजनाच्या टाळांचा येणारा खणखणाट बंद झाला. शरीर बधीर झालं. मुलानं वडिलांच्या पायाला मिठी मारत हंबरडा फोडला. छोट्या बहीणीच्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहू लागले. एका क्षणात आनंदी संसाराला दृष्ट लागली. विश्‍वासरावांच्या खिशात मोटरसायकलचं कोटेशन सापडलं. ते आणायलाच ते गेलेले. मुलगा रवीला यंदा ते स्कूटर घेऊन देणार होते. मोबाईल खिशातून बाजूला पडला. स्क्रीनवर शशिकला, रवी आणि लहान बहीणीचा एकत्रित फोटो पाहून तेथे असणार्‍यांचे डोळेही पाणावले. पिंडाला कावळा काही केल्या शिवेना. शेवटी शशिकला आणि छोट्या बहिणीला मी सुखात ठेवेन असं रवीनं सांगितल्यावर कावळा शिवला एकदाचा.
यावर्षी आषाढीला एक वर्ष पूर्ण झालं. मुलगा रवी दहावी पास होऊन अकरावीत गेला. सायन्सकडे घालून डॉक्टर बनवण्याची विश्‍वासरावांची इच्छा अधुरीच राहिली. संसाराचा रथ रूतून बसला होता. उरले सुरले पैसे वर्षभरात सरले. रोज कामानिमित्त ये-जा असणार्‍यांची वर्दळ कमी झाली. शशिकला मनानं खचली. मुलाला शिकवायचं की मुलीच्या लग्नासाठी पुंजी जमवायची? काय करावं, हे तिला सुचेना. एकेकाळी पंचपक्वान, मासे, मटण आणि गोडधोड खाणारे हे कुटुंब एकवेळच्या अन्नालाही महाग झालं होतं. ‘अरे, सोन्या तुझो बापूस आसलेलो तर तुका शिकवल्यान असत्यान, आता बारावी कर आनी नोकरी धर’ शशिकलानं रवीना सुनावलं. इच्छा असूनही रवी शिक्षणाला मुकला. एकंदरीत आपल्या दु:खाची किंमत बाजारात शून्य असते. प्रत्येक दिवस हा चांगला असेलच असे सांगता येत नाही. पण प्रत्येक दिवसांत काही तरी चांगलं असतं ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. बापाच्या विरहानंतरचं आयुष्य अगदी पोरकं, पोरकट असतं, तेच आयुष्य रवीच्या वाट्याला आलं, ‘सोन्या आज तुला काय आणू? उद्या आम्ही फिराक जावया’ असं सांगणार्‍या बाबांकडून मिळणारं सुख आईकडून मिळणार नव्हतं. आई केवळ मायेच्या पदराखाली त्याला जखडून ठेवेल. ममतेच्या दरबारात छोट्या मुलीनं आणि मुलानं आईला आधार दिला. रात्री एकटक ती दरवाजाकडे मुलांना थोपटत बघत बसायची. त्या दिवशी मी गेलो तर ‘अरे, ह्यांचा वर्ष घालूचा आसा, जरा भटाकडे जाशीत? माझ्याकडे पैशे सुद्धा कमी आसत, पोस्टात थोडे आसत, ते विचारून ये’ म्हणून सांगितलं. पोस्टात गेलो, तर खात्यावर फक्त पाच हजार रूपये होते, विश्‍वासरावांनी वारस घातलाच नव्हता. आमच्या हेडऑफिसला जा, असं सांगण्यात आलं. कसंबसं वर्ष घातलं. आता मुलाच्या अपेक्षांवरच आई आणि एक मुली जगते आहे. मुलीचं निदान बारावीपर्यंत तरी शिक्षण आणि लग्न या दोन मोठ्या जबाबदार्‍या शशिकला समोर आहेत. त्या मुलाला बारावी नंतर नोकरी मिळणार या आशेवर ती जगताहेत. नोकरी मिळाली, तर कसली मिळणार? आणि कुठे? या स्पर्धात्मक युगात उच्च, तांत्रिक शिक्षणाशिवाय रोजगाराची संधी मिळेल काय? की त्यालाही वेठबिगारी बनावं लागेल? शशिकलासमोर अनंत प्रश्‍न आहेत. पण ती काय करणार? नियतीपुढं तिने हात टेकलेत. वय झालं, थकलीय बिचारी, मन म्हणतं काही तरी करावं, अजूनही आपल्या मुलांसाठी पण, एका बाजूने शरीराच्या वेदनांनी ती फार त्रासून गेलीय. नवर्‍याच्या विरहाचं दु:ख एकवेळ पचेलही पण मुलीच्या आयुष्याचं दु:ख तिला पेलवणार नाही. ‘माझ्या पोराचा फाल्या कसा होतंला?’ याच विचाराने ती खचलीय. पूर्वी गजबजून जाणारं घर आज अगदी सुन्न! कुठलाही विजय अंतिम नसतो आणि पराभव म्हणजे शेवट नसतो. कुठल्याही परिस्थितीत धैर्य हे महत्त्वाचं असतं. आणि तेच आयुष्यात कामी येतं. शशिकलाच्या तुटलेल्या आयुष्याला ठीगळं म्हणून कुठं लावणार? धैर्याने, जिद्दीनं तिच्या मुलांनी आता पुढं यायला हवं. तरच एक विश्‍वासरावांचं स्वप्न आणि पिंडदानादिवशी दिलेला शब्द सार्थ ठरेल.